Skip to main content
x

माकणे, विश्वनाथ ग्यानोबा

          विश्वनाथ ग्यानोबा माकणे यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील आलगरवाडी येथील एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. वडील अल्पभूधारक शेतकरी होते. चार मुलांमध्ये विश्‍वनाथ हेच थोरले होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चाकूर येथे झाले. त्यांनी १९६६मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांकाने शालान्त परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे त्यांनी परभणी येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला व १९७०मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी द्वितीय वर्गात उत्तीर्ण झाले. सुरुवातीची दोन वर्षे त्यांनी खासगी शाळेत शिक्षकाची नोकरी केली. त्यांनी १९७२मध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत लातूर येथे तेलबिया संशोधन केंद्रात कामास सुरुवात केली. त्यांनी १९७६ ते ७८ काळात एम.एस्सी. (कृषी) पदवी मिळवली व तेथेच साहाय्यक प्राध्यापक म्हणून कामास सुरुवात केली. त्यांनी १९८० ते १९८२ काळात धारवाड येथील कृषी विद्यापीठाच्या पीएच.डी.साठी बौद्धिक कार्यक्रम पूर्ण करून पुढील संशोधन परभणी कृषी विद्यापीठात पूर्ण केले आणि १९८७मध्ये पीएच.डी. (कृषी) पदवी प्राप्त केली. माकणे यांनी आपल्या कार्यकाळात सूर्यफुलाचे चार वाण, भुईमुगाचे चार वाण आणि जवस पिकाचा एक वाण यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच खासगी व आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पात सहयोगाची भूमिका बजावली. डॉ. माकणे यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून मराठवाडा कृषी विद्यापीठार्फे १९९६मध्ये प्रशस्तिपत्र दिले.

          सूर्यफुलातील संशोधनाबद्दल त्यांना हेक्समार फाऊंडेशनमार्फत दिला जाणारा पुरस्कार प्राप्त झाला. २००३ साली हा पुरस्कार घेताना त्यांनी सूर्यफुलात केवडा प्रतिबंधक वाणनिर्मितीचा विशेष उल्लेख केला आहे. याविषयीच्या संशोधनाबद्दल त्यांना २००७मध्ये राधाकिशन शांती मल्होत्रा पारितोषिक (रु. १०,०००-रोख) मिळाले. त्यांनी बीजनिर्मितीसाठी महाराष्ट्र बीज महामंडळाशी सहकार्य केले. त्यांनी आठ विद्यार्थ्यांना एम.एस्सी. व दोन विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले आहे. डॉ.माकणे यांनी विविध संशोधनांवर आधारित ७५हून अधिक शास्त्रीय लेख प्रसिद्ध केले आहेत. त्यांनी तांत्रिक ज्ञान देणाऱ्या पुस्तिका प्रसिद्ध केल्या आहेत.

- डॉ. नारायण कृष्णाजी उमराणी

माकणे, विश्वनाथ ग्यानोबा