Skip to main content
x

माळी, अनंत मल्हार

            नंत मल्हार माळी यांचा जन्म कोल्हापुरात झाला. त्यांचे वडील कोल्हापुरात चित्रे काढण्याचे काम करीत असत. याशिवाय कोल्हपूर येथील कलात्मक वातावरणाचाही त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यामुळे अनंतही लहान वयातच चित्र काढू लागला. आपल्या वडिलांचे मार्गदर्शन व स्वत:च्या मेहनतीने वास्तववादी आकृती रेखाटण्याचे अथवा व्यक्तिचित्रणाचे कौशल्य त्यांनी साध्य केले. परंतु कोल्हापुरात राहून चित्रकलेवर अर्थार्जन करणे कठीण असल्यामुळे त्यांनी पुण्यातील ‘चित्रशाळा प्रेस’मध्ये चित्रकाराची नोकरी काही वर्षे केली; पण त्यांचे मन या नोकरीत रमत नव्हते. म्हणून त्यांनी १९११ च्या सुमारास मुंबईस जाण्याचा निर्णय घेतला.

            मुंबईत आल्यावर माळी यांची चित्रकार ए.एच. मुल्लर यांच्याशी मैत्री झाली. त्या काळी मुंबईत चित्रकलेचे शिक्षण देणारी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ही एकमेव संस्था होती. त्यामुळे चित्रकलेचे शिक्षण देण्यासाठी १९१२ मध्ये या दोघा मित्रांनी सॅण्डहर्स्ट रोडवरील रामचंद्र इमारतीमध्ये चित्रकलेचा वर्ग सुरू केला. ए.एम. माळी व ए.एच. मुल्लर या वास्तववादी शैलीत उत्तम काम करणाऱ्या कलाशिक्षकांमुळे हा वर्ग चांगलाच लोकप्रिय ठरला. याच काळात माळी यांनी‘मनोरंजन’, ‘नवयुग’, ‘करमणूक’ अशा मासिकां-साठी धार्मिक व पौराणिक विषयांवरील मुखपृष्ठे व चित्रे तयार केली. त्यांतून अर्थार्जनाबरोबर प्रसिद्धीही मिळाली.

            चित्रशाळा प्रेसमधील अनुभवामुळे १९१६ च्या दरम्यान माळी यांना घाटकोपर येथील एका विख्यात प्रेसमध्ये चांगली नोकरी मिळाली. मुल्लर हेदेखील नावारूपाला येऊन, त्यांना पेन्टिंगची कामे मिळू लागली होती. त्यामुळे १९१६ मध्ये हा वर्ग बंद करून दोघांनीही स्वतंत्रपणे व्यवसायास प्रारंभ केला. याच दरम्यान माळी यांचे कोल्हापुरातील मित्र, छायाचित्रकार कोलवालकर मुंबईस आले व त्यांनी प्रिन्सेस स्ट्रीटवर ‘गुरुदास फोटो स्टूडिओ’ काढला.

            एव्हाना ए.एम. माळी यांनाही चांगली कामे मिळू लागली होती. दोघा मित्रांनी ग्रँट रोडच्या पुलाजवळ एक घर घेतले व त्या घरात दोन्ही कुटुंबे राहू लागली. माळी यांनी या घरात मोठमोठी चित्रे व व्यक्तिचित्रे रंगविली. यात प्रतिष्ठित व्यक्ती व राजेमहाराजे यांच्या व्यक्तिचित्रांचा, तसेच प्रसंगचित्रांचाही समावेश होता.

            ए.एम. माळी यांनी काढलेल्या पौराणिक चित्रांपैकी गाजलेली चित्रे म्हणजे ‘जटायू-वध’, ‘अज-विलाप’ व औंधच्या संग्रहालयात असलेले ‘निद्रिस्त राजकन्या’ ही होत. ‘जटायू-वध’ या चित्रात हातात खड्ग घेतलेल्या रावणाचा उन्माद, जटायूची असाहाय्यता व सीतेची शोकमग्न अवस्था यांचे आकार, रंग, रेषा व अवकाशाच्या मांडणीतून प्रत्यंतर येते.

            औंध येथील संग्रहालयात १९१८ मध्ये ‘यक्षाची सहचरी’ (यक्षाज कन्सॉर्ट) यामध्ये रंगविलेल्या चित्रात पलंगावर निद्रिस्त असलेली, उंची व तलम वस्त्रे ल्यालेली सुंदर राजकन्या दाखविली असून पार्श्‍वभूमीला राजप्रासादाचा सौध व त्यापलीकडचा निसर्ग दिसतो. राजकन्येच्या तलम वस्त्राच्या सुंदर चुण्या, खाली पडलेला मोरपिसांचा पंखा, जमिनीवर असलेल्या चौरंगावरील नक्षीदार सुरई व फळे छायेत दाखविली आहेत. या सर्वांचे चित्रण कौशल्याचे व बारकाव्याचे आहे. या चित्रावर व्हिक्टोरियन काळातील पौर्वात्य अभ्यासपद्धतीचा (ओरिएंटलिस्ट) प्रभाव आहे. तिच्या गळ्यातून ओघळणारी मोत्यांची माळ, शुभ्र वस्त्र व पाठीमागचे रात्रीचे निसर्गदृश्य यांमुळे हे चित्र अधिक आकर्षक झाले आहे. या दोन्ही चित्रांवरून माळी यांचे मानवाकृती रेखाटण्याचे कसब व त्याचबरोबर निसर्गदृश्याचे चित्रण करण्यातील कौशल्य प्रत्ययास येते.

            माळी यांनी निसर्गदृश्येही चित्रित केली. त्यांची चित्रे पाश्‍चिमात्य चित्रांवरून तयार केली असावीत असे जाणवते. याखेरीज त्यांनी शिळामुद्रण (लिथो) पद्धतीची चित्रांची कामे ‘चित्रशाळा’ प्रेसमध्ये किंवा घाटकोपरच्या प्रेसमध्ये केली. मुंबईच्या मोठ्या क्षेत्रात आल्यावर चित्रकलेचा अधिक अभ्यास करण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. एवढेच नव्हे, तर त्यासाठी इटलीला जाऊन तेथील जगप्रसिद्ध कलाकारांची कामे पाहावीत व शक्य झाल्यास चित्रकलेचे उच्च शिक्षण घ्यावे, अशीही त्यांची महत्त्वाकांक्षा होती. परंतु अकाली मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या आकांक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत.

            त्यांनी केलेली व्यक्तिचित्रे आणि पौराणिक चित्रे यांपैकी मोजकीच चित्रे लोकांना ज्ञात आहेत. परंतु ‘जटायू-वध’ सारख्या चित्रांतून या कलावंताची प्रतिभा, कौशल्य व प्रभुत्व लक्षात येते.

- डॉ. नलिनी भागवत

 

माळी, अनंत मल्हार