Skip to main content
x

मालशे, यशवंत विनायक

     शवंत विनायक मालशे हे वायुसेनेत १९४० मध्ये दाखल झाले. हवाई मुख्यालयाच्या महत्त्वपूर्ण ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्याचबरोबर हवाई दलाच्या अनेक तुकड्या त्यांच्या नेतृत्वाखाली होत्या. १९४७ मध्ये त्यांनी क्वेट्टा येथे स्टाफ कॉलेज अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी १९५१ मध्ये लंडनमधील लॅण्ड अ‍ॅण्ड एअर वॉरफेअर स्कूलमधून वरिष्ठ हवाई साहाय्यक अभ्यासक्रम पूर्ण केला.

     १९६२-६३ मध्ये त्यांनी नॅशनल डिफेन्स कॉलेजचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर ते त्याच कॉलेजचे वरिष्ठ संचालक होते. दि.१ ऑक्टोबर १९६४ रोजी मालशे यांची पूर्व विभागाचे ‘एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. सेवेत असताना त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण मोहिमा चांगल्या पद्धतीने हाताळल्या. चीन आणि पाकिस्तानकडून होणार्‍या संभाव्य आक्रमणांना तोंड देण्यासाठी त्यांनी वायुसेनेचे तळ मजबूत केले. सीमेवरील सैन्यदलांची वाहतूकही हवाई मोहिमांद्वारे त्यांनी उत्तमरीत्या केली.

     मिझोराममधील घुसखोरीला तोंड देताना भूसेनेला त्यांनी वायुसेनेचे उत्तम छत्र मिळवून दिले. त्यांनी यात तत्परता आणि अचूकता दाखविली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वायुसेनेने आसाम सरकारला अनेक घडामोडींत मदत केली. त्यांनी वैयक्तिकरीत्या सार्‍या मोहिमांचे संचालन केले आणि स्वत:ही त्यात सहभागी झाले.या त्यांच्या कामगिरीसाठी १९६७मध्ये त्यांना ‘परमविशिष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले.

- संपादित

मालशे, यशवंत विनायक