Skip to main content
x

मानसिंहका, सुनील बाळकृष्ण

       सुनील बाळकृष्ण मानसिंहका यांचा जन्म राजस्थानातील भिलवाडा येथे झाला. मानवी जीवनाच्या स्वास्थ्यासाठी आणि समृद्धीसाठी गायीची उपयुक्तता आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर सप्रमाण सिद्ध करून गायीला पूर्वीचे मानाचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी धडपडणाऱ्या मोजक्या व्यक्तींमध्ये सुनील बाळकृष्ण मानसिंहका यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते.

       मुंबईच्या वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट या नामांकित संस्थेमधून १९८६मध्ये त्यांनी वस्त्र (टेक्सटाइल) अभियांत्रिकीमधील पदविका प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी मफतलाल मिल्समध्ये वस्त्र तंत्रज्ञान व विपणन विभागात १९९९पर्यंत काम केले. आईवडिलांनी केलेल्या संस्कारामुळे बालपणापासूनच गायीबद्दल त्यांच्या मनात अपार श्रद्धा होती. भारतीय गायींचे पालन, संरक्षण, संवर्धन व संशोधन ही उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून गोविज्ञान अनुसंधान संस्था १९९६मध्ये स्थापन झाली होती. मानवी आरोग्य, कृषी विकास आणि ग्रामीण उन्नती यासाठी गायीची उपयुक्तता आणि योगदान वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करणे हे या संस्थेचे ध्येय राहिले आहे. त्यांनी १९९९मध्ये संचालक म्हणून या संस्थेत पदभार स्वीकारला. त्यांनी आपल्या कुशल नेतृत्वाने आणि मार्गदर्शनाने संस्थेची वाटचाल समर्थपणे चालू ठेवून संस्थेस आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती मिळवून दिली. त्यांनी दूरदृष्टीने दीर्घकालीन आणि सुनियोजित संशोधन प्रकल्प व गोविकास कार्यक्रम संस्थेमध्ये सुरू केले. आयुर्वेदानुसार गाय ही एक चालतेफिरते औषधालय आहे. गायीपासून मिळणाऱ्या दूध, तूप, दही, मूत्र व शेण या पाच पदार्थांना ‘पंचगव्य’ म्हणतात. या पंचगव्यापासून अनेक प्रकारची आयुर्वेदिक औषधे तयार केली जातात. या औषधाद्वारे उपचार करण्याच्या पद्धतीस ‘पंचगव्य आयुर्वेद चिकित्सा’ म्हणून संबोधले जाते. ही प्राचीन भारतीय उपचार पद्धती आहे, परंतु काळाच्या ओघात अ‍ॅलोपॅथीसारख्या आधुनिक उपचार पद्धतीच्या प्रभावामुळे तिच्याकडे दुर्लक्ष झाले.

       आयुर्वेदिक औषधाची गुणवत्ता व प्रभाव याबाबत वाटणारी साशंकता दूर करण्यासाठी मानसिंहका आणि त्यांचे सहकारी यांनी आधुनिक वैज्ञानिक कसोटीवर पंचगव्य घटकांचा अभ्यास केला. पंचगव्यापैकी दूध, दही, तूप यांचे औषधी गुणधर्म माहीत आहेत. परंतु गोमूत्र व गोमय यांचे औषधी महत्त्व फारसे माहीत नाही. मानसिंहका यांनी गोमूत्र संशोधनावर भर दिला. या व्यापक संशोधनासाठी त्यांनी लखनऊ येथील राष्ट्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संस्था, हैदराबाद येथील भारतीय रसायन तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था (नॅशनल इन्व्हॉयनरलमेंट इंजिनीअरिंग रीसर्च इन्स्टिट्यूट), अशा अनेक प्रतिष्ठित राष्ट्रीय संस्था तसेच आयुर्वेदिक महाविद्यालये व मोठी रुग्णालये यांच्या सहकार्याने संयुक्तपणे गोमूत्र संशोधन प्रकल्प राबवले. या संशोधनाचे फलित म्हणून भारत सरकारबरोबरच मानसिंहका यांच्या गोविज्ञान अनुसंधान संस्थेला गोमूत्र अर्काच्या औषधी वापरासाठी चीनचे १ व अमेरिकेची ३ एकस्वे (पेटंट्स) प्राप्त झाली. गोमूत्र अर्क आणि प्रतिजैविके वापरून औषधनिर्मिती (अमेरिकन एकस्व-२००२), कर्करोग व जंतुरोधक औषधाची शरीरातील परिणामकारकता वाढवण्यासाठी गोमूत्र अर्काचा औषधात समावेश (अमेरिकन एकस्व-२००२), शरीरपेशीतील डी.एन.ए.ची ऑक्सिडेटिव्ह क्षती (ऑक्सिडेंटिव्ह डॅमेज) भरून काढण्यासाठी आणि थांबवण्यासाठी गोमूत्र अर्काचा वापर (अमेरिकन एकस्व-२०००, चिनी एकस्व-२००९). कर्करोग पेशींची वाढ थांबवण्याचा हा गुणधर्म आहे. या सर्व एकस्वांमध्ये सहसंशोधक म्हणून मानसिंहका यांचे नाव समाविष्ट आहे. गोविज्ञान अनुसंधान केंद्रात पंचगव्यापासून (गोमूत्राबरोबरच दूध, दही, तूप) २९ औषधींचे उत्पादन केले जाते. संस्थेचे पंचगव्य आयुर्वेद चिकित्सालय आहे. गेल्या ११-१२ वर्षांत या चिकित्सालयातून हजारो रुग्ण बरे झाले आहेत. आम्लपित्त, मधुमेह, रक्तदाब, कावीळ इत्यादी रोगांवर पंचगव्य औषधे लाभदायक ठरली आहेतच; परंतु कर्करोग, सोरियासिससारख्या असाध्य रोगांवरदेखील ती उपयोगी सिद्ध झाली आहेत.

       पीकवाढीसाठी आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यास उपयुक्त कडुनिंब व लसूणमिश्रित गोमूत्राच्या उत्पादनाचे अमेरिकी एकस्व मिळवण्यासाठी सहसंशोधक म्हणून सुनील मानसिंहका यांनी काम केले. याव्यतिरिक्त गोमूत्रापासून कीटकनाशके, गोमूत्र व शेण यांच्यापासून सेंद्रिय खत, ऊर्जानिर्मिती, पशुरोगांसाठी पंचगव्य औषधींचा वापर अशा विषयांवर सदर संस्थेमध्ये संशोधन चालू आहे. त्यांची गोवंश उद्धाराची तळमळ, अभ्यासू वृत्ती यापासून त्यांच्या सहकाऱ्यांना कायम प्रेरणा, प्रोत्साहन मिळते. त्यांच्या गो-संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना २०००-०१मध्ये राष्ट्रीय गोधन आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त केले. गायीची उपयुक्तता अभ्यासणाऱ्या समितीचे ते प्रमुख होते.

       - डॉ. विजय अनंत तोरो

मानसिंहका, सुनील बाळकृष्ण