Skip to main content
x

मार्कंडेय, नितीन मनमोहन

          बुद्धिमत्तेसोबत आलेले अध्यापन कौशल्य, पशु-प्रजननविषयक समस्येवर खोलपर्यंत जाऊन संशोधन करण्याची प्रवृत्ती आणि अमोघ वक्तृत्वशैलीच्या साहाय्याने पशुपालकांच्या हृदयापर्यंत जाऊन भिडण्याची प्रवृत्ती या गुणांच्या आधारे महाराष्ट्राच्या पशुपालकांपर्यंत, विशेष: दुग्ध व्यावसायिकांपर्यंत पोहोचलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. नितीन मार्कंडेय. त्यांचा जन्म आंबेजोगाई येथे झाला. परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालयातून १९८५मध्ये पशुवैद्यकीय पदवी आणि १९८७मध्ये पशु-प्रजननशास्त्र विषयांत पदव्युत्तर पदवी प्राप्त डॉ. मार्कंडेय यांनी अखिल भारतीय स्तरावरील ‘कृषी वैज्ञानिक निवड मंडळ’ची ‘कृषी संशोधन वैज्ञानिक’ ही परीक्षाही १९९० या वर्षात उत्तीर्ण केली.

          महाराष्ट्र शासनाच्या पशु-संवर्धन विभागांतर्गत पुणे येथील कृत्रिम रेतन केंद्रात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. मार्कंडेय यांनी सेवेस सुरुवात केली. या कृत्रिम रेतन केंद्राचे परिवर्तन राज्यस्तरीय गोठित वीर्यनिर्मिती केंद्रात होत असतानाच प्रयोगशाळेचे नूतनीकरण व आधुनिकीकरण यात मोठे योगदान दिले. मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालयात डॉ. मार्कंडेय यांनी पशु-प्रजननशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक हे पद स्वीकारले आणि त्याच महाविद्यालयात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला.

          भारतीय पशुपालन व्यवसाय हा मुख्यत: दुग्ध व्यवसायाशी निगडित आहे आणि या व्यवसायातून मिळणारे सर्व उत्पन्न हे वासरे आणि दूध याच स्वरूपात असल्याने या उत्पन्नाचा सरळ संबंध हा प्रजननाशी असतो आणि म्हणून सुलभ आणि वेळीच होणार्‍या प्रजननातूनच अधिक वेत व भरपूर दुधाची हमी मिळणे ही मूलभूत संकल्पना डॉ. मार्कंडेय यांनी दुग्ध व्यावसायिकांसमोर नुसती मांडलीच नाही; तर आपल्या जनावरांचे प्रजनन किंवा प्रजनन संस्थेचे कार्य सुरळीत चालू आहे याची काळजी घेऊन ते सुरळीत होण्यासाठी पशुवैद्यकीय मदत घेणारा दुग्ध व्यावसायिकच यशस्वी होऊ शकतो हे मर्म दुग्ध व्यावसायिकांच्या मनात बिंबवले. पशुपालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी संगोपन, आहारपोषण, आरोग्यशिक्षण हे जितके महत्त्वाचे आहे, त्याहीपेक्षा पशु-प्रजनन हे अधिक महत्त्वाचे आहे हे पटवण्यात डॉ. मार्कंडेय यशस्वी ठरले. प्रत्येक गायीपासून तेराव्या महिन्याला तर प्रत्येक म्हैशीकडून पंधराव्या महिन्याला वासरू मिळवणे म्हणजेच वर्षातील ९ ते १० महिने दूध व वर्षाला वासरू असे जास्तीत जास्त उत्पन्न मिळवणे ही डॉ. मार्कंडेय यांची संकल्पना प्रत्यक्ष आचरणात आणून महाराष्ट्रातील अनेक दुग्ध व्यावसायिक यशस्वी झाले आहेत. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट डॉ. मार्कंडेय यांनी पशुपालकापर्यंत पोहोचवली, ती म्हणजे लिखित स्वरूपातील नोंदी ठेवण्याची. या नोंदीवरूनच पशुपालनाचे गणित मांडता येते. जनावराची कास आणि गर्भाशय नियमित कार्यरत ठेवण्यासाठी नोंदीचा उपयोग कसा होतो आणि या अवयवांचे कार्य थांबल्यास अथवा लांबल्यास याच नोंदी पशुुवैद्यकीय अंकुश ठेवण्यासाठी कशा उपयोगी पडतात याचे मार्गदर्शन त्यांनी केले आहे. पशुप्रजननासंबंधी उशिरा माजावर येणे, माज दृश्य स्वरूपात न दिसणे, रेतन झाले असताही माज उलटणे, गर्भपात होणे, जनावर वितेवेळी अडचणी येणे, वार न पडणे, गर्भाशय वा योनिमार्ग प्रसूतीपूर्व वा प्रसूतीनंतर बाहेर येणे, व्यायल्यानंतर पुन्हा माज न दाखवणे, उन्हाळी हवामानात माज न दाखवणे, या प्रत्येक व्याधीवर डॉ. मार्कंडेय यांनी अत्यंत सखोल संशोधन करून कारणमीमांसा विशद केली आहे. या प्रत्येक व्याधीवर संप्रेरके, प्रतिजैविके, खनिज मिश्रणे आणि पूर्वापार चालत आलेली वनस्पतिजन्य औषधे यांचा यशस्वी वापर कसा करावा यासंबंधी त्यांच्या शिफारसी आज व्यापक प्रमाणात देशभर पशुवैद्यकीय व्यावसायिकांनी आचरणात आणल्या आहेत.

          भारतीय पशुधन उत्पादनाच्या बाबतीत परदेशी पशुधनाच्या तुलनेत तसूभरही कमी नाही, वानवा आहे ती पशुपालकांचे अज्ञान दूर करण्याची. संगोपन, आहारपोषण, प्रजनन आणि आरोग्यरक्षणाच्या आधुनिक संकल्पना पशुपालकांपर्यंत पोहोचल्या तर पशुपालन उत्पादनात भारत जगाच्या पुढेच राहील, या संकल्पनेवर दृढ विश्‍वास ठेवणारे डॉ. मार्कंडेय याच दृष्टीने प्रयत्नशील आहेत. असंख्य सभासद, नियतकालिके, पशुप्रदर्शने, चर्चासत्रे, व्याख्यानमाला, प्रशिक्षण शिबिरे, पशु-रोगचिकित्सा शिबिरे यांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची ज्योत तेवती ठेवत आहेत. केवळ अध्यापन वा प्रयोगशाळा संशोधन यातच गुंतून न जाता आमंत्रण येईल त्या ठिकाणी जाऊन पशुपालकांना सजग करण्याचे व्रत डॉ. मार्कंडेय यांनी अंगीकारले आहे. अत्यंत प्रभावी भाषेत संबोधन आणि तितक्याच प्रभावी आणि ओघवत्या भाषेत लिखाण ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे मराठीतून ४००च्यावर लेख महाराष्ट्रातील कृषी विषयाला वाहिलेल्या सर्व नामांकित नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. एकंदर ९ पुस्तके, १० सीडीज्, ६००च्यावर पशुपालकांचे पोस्टाद्वारे शंकासमाधान, संशोधनपर १३२ लेख, जवळजवळ ७० आंतरराष्ट्रीय परिषदांतून निबंध वाचन या सर्व माध्यमांतून डॉ. मार्कंडेय आपल्या संकल्पनांसह आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक, विद्यापीठातील प्राध्यापक, यशस्वी पशुपालक ते खेडोपाडी यशस्वी होण्यासाठी चाचपडणारा होतकरू पशुपालक या सर्वांपर्यंत पोहोचले आहेत.

          भारतात श्‍वेतक्रांती झाली, दूधभुकटीची आयात करणारा भारत दुधाची व दुग्धजन्य पदार्थांची निर्यात करू लागला. या क्रांतीला आपल्या वाणीने आणि लेखनाने डॉ. मार्कंडेय यांनी महत्त्वपूर्ण हातभार लावलेला आहे.

- डॉ. रामनाथ सडेकर

मार्कंडेय, नितीन मनमोहन