Skip to main content
x

मात्रे, गणेश लक्ष्मण

           णेश लक्ष्मण मात्रे यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज येथे झाला. त्यांचे शिक्षण एस.एस.सी.पर्यंत झाले. त्यांनी वेगवेगळ्या पारंपरिक पिकांच्या समस्या व पाणीटंचाई, वीजटंचाई व अतिखर्चावर मात करण्यासाठी आवळा पिकाची निवड केली. आवळा शेती करणे हाच त्यांचा मुख्य व्यवसाय झाला. त्यांनी आवळ्याच्या लागवडीमध्ये खतांचा हप्ता केव्हा द्यावा, फवारणी केव्हा करावी आणि आवळ्याला बहार केव्हा आणावा याचा अभ्यास केला. त्यांनी आवळा पिकाची लागवड करणे व रोपे तयार करणे वगैरे शेतीची कामे टप्पाटप्प्याने आत्मसात केली व आवळा पीकवाढीमध्ये यश प्राप्त केले. या पिकाच्या लागवडीमध्ये फायदा आहे हे जाणून या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करणे व योग्य यंत्रसामग्री मिळवून आवळ्यावर प्रक्रिया करण्याचे तंत्रही अवगत केले.

           मात्रे यांनी २०००-२००१मध्ये सुशिक्षित मुलांमार्फत घरोघरी आरोग्यवर्धक आवळा व त्याचे गुणधर्माचे माहितीपत्रक वाटले व आवळ्याविषयी जनजागृती केली. त्यांनी ‘वऱ्हाडी आवळा’ या नावाने आवळ्याचे उत्पन्न सतत वाढवले. त्यांनी आवळा प्रक्रिया केंद्रदेखील गतिमान केले व योग्य सामग्री मिळवून आवळ्यावर प्रक्रिया करून आवळा रस, आवळा सरबत, जॅम, मुरावळा, आवळा लोणचे वगैरे पदार्थ तयार केले.

           आवळा उत्पादित मालाचे विपणन व्यवस्थापनही मात्रे यांनी चांगल्याप्रकारे केले व विक्री वाढवण्यात यश संपादन केले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक पंचसूत्री योजना आखली. शेतकऱ्याने शेतीवर कमीत कमी खर्च करावा व उत्पन्न जास्त येईल याकडे लक्ष द्यावे, शेतीस लागणारे बी-बियाणे, रोपे स्वतः आपल्या शेतीतच तयार करावीत, विक्रीकरता योग्य असाच माल शेतीत पिकवावा, जास्त कष्ट व आपल्या बुद्धीचा वापर करून शेती वाढवावी आणि शेतीचा जमाखर्च, फायदा-नफा किती झाला याकडे बारकाईने लक्ष ठेवावे, अशी पंचसूत्री शेतकर्‍यांनी लक्षात ठेवावी असे मात्रे मानतात. त्यांनी आवळ्याची शेती अगदी मन लावून केली आणि आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ जसे आवळा मुरंबा, आवळा कँडी, आवळा सुपारी वगैरे तयार करण्याच्या पद्धती त्यांनी पारखून घेतल्या. त्यामुळे त्यांना कृषिभूषण ही पदवी देण्यात आली. त्यांची आवळा बाग व प्रक्रिया केंद्र पाहण्यासाठी दररोज असंख्य शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देतात.

 - डॉ. प्रकाश पुंडलिक देशमुख

मात्रे, गणेश लक्ष्मण