मायंदे, व्यंकट मनोहर
व्यंकट मनोहर मायंदे यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील निवली येथे झाला. डॉ.पं.दे.कृ.वि.तून १९७१ साली त्यांनी बी.एस्सी. (कृषी) पदवी व १९७५मध्ये बी.एस्सी. (कृषि-अभियांत्रिकी) पदवी मिळवली. त्यांनी पंतनगर येथून गोविंद वल्लभपंत युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजीमधून(१९८६) एम.टेक., आय.आय.टी., खरगपूर येथून (२००१) कृषी-अभियांत्रिकी शाखेत फार्म पॉवर मशिनरी या विषयामध्ये पीएच.डी. मिळवली.
डॉ. मायंदे यांनी १९ वर्षे आय.सी.ए.आर.चे विभागीय समन्वयक म्हणून महाराष्ट्र व आंध्र प्रदेशमध्ये नोकरी केली. तसेच त्यांनी हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये (इक्रिसॅट) कृषी-अभियंता म्हणून १० वर्षे काम पाहिले. त्या काळामध्ये त्यांचा यू.एस.ए., जपान, जर्मनी, आफ्रिका, एशिया व लॅटिन अमेरिकेतील शास्त्रज्ञांशी संपर्क आला. त्यांनी साहाय्यक कृषी-अभियंता म्हणून ‘बायफ’मध्ये अभियांत्रिकी खात्याचे प्रमुख म्हणून काम केले. त्यांनी इस्राएल देशाला १९९५ सालामध्ये भेट दिलेली आहे व तेथील मायक्रोइरिगेशन सिस्टिम, वॉटर मॅनेजमेंट वगैरे विषयांचा अभ्यास केला. त्यांनी जेरुसलेम येथील हिब्रू विद्यापीठामध्ये जलसिंचन या विषयाचा अभ्यास केला. त्यांनी हैदराबाद विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी, उस्मानिया विद्यापीठाच्या ७ विद्यार्थ्यांना एम.सी.ए.साठी, मद्रास विद्यापीठाच्या २ विद्यार्थ्यांना एम.एस्सी.साठी व बी.टेक.च्या विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केले. ते २००७ ते २०१२ या काळात डॉ. पं.दे.कृ.वि.च्या कुलगुरू पदावर कार्यरत होते.
डॉ. मायंदे यांनी बैलाने चालणारी पेरणी यंत्रे, काढणी यंत्रे आणि रोटरी टिलर इत्यादी १७ प्रकारची नवीन अवजारे प्रसारित केली. ती अवजारे अंदाजे दोन लाख शेतकऱ्यांच्या वापरात आहेत. या अवजारांपैकी १२ अवजारे सध्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये वेगवेगळ्या औद्योगिक संस्था तयार करत आहेत. डॉ. मायंदे यांच्या नावावर दोन एकस्वे मंजूर झालेली आहे. इतर सहा एकस्वांकरता त्यांनी अर्ज दिलेले आहेत. त्यांच्या अवजारांची २००४ ते २००६ सालादरम्यान जवळपास ३ कोटी रुपयांची विक्री झाल्यामुळे त्या-त्या भागातील उद्योजकांना फायदा मिळालेला आहे.
डॉ. मायंदे यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल रफी अहमद किडवाई पुरस्कार (१९९६), अॅस्पी पुरस्कार (१९९४), बेस्ट इन्व्हेंशन पुरस्कार (१९९२), गोठित भाज्याच्या संशोधनासाठी ट्रेड ट्रेन्ड गुंटरतर्फे विशेष उत्पादन शोध पुरस्कार (२००१), मँगो ऑर्चड स्प्रेअरसाठी ट्रेड ट्रेन्ड गुंटरतर्फे विशेष उत्पादन शोध पुरस्कार (२००२) आदी पुरस्कार देण्यात आले. त्यांना २००९मध्ये भारतीय कृषी-अभियांत्रिकी संस्थेचे सुवर्णपदक मिळाले .
डॉ. मायंदे यांचे ४३ संशोधन लेख प्रकाशित झालेे आहेत व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये ५ लेख आहेत. त्यांनी कृषी-अभियांत्रिकी या विषयावर चार पुस्तके लिहिली आहेत व त्यांचे विविध लेख, तांत्रिक माहिती पुस्तिका आणि पत्रके वगैरेची संख्या जवळपास २०१ आहे. त्यांनी संगणकाचे एक नवीन मॉडेल ड्रायमेक शोधून काढलेले आहे. त्याचा उपयोग ड्रायलँडमध्ये केला जातो. कुलगुरू या नात्याने डॉ.पं.दे.कृ.वि.च्या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवणे, नवीन अवजारे शोधून त्यांचा शेतकऱ्यांना शेती करण्यामध्ये फायदा करून देणे याची सतत जाण त्यांनी बाळगली .