मेडोज टेलर, फिलीप
कर्नल फिलीप मेडोज टेलर यांचा जन्म इंग्लंडमध्ये लिव्हरपूल येथे झाला. १८२३-१८२४च्या दरम्यान जेमतेम शालेय शिक्षण घेतल्यानंतर घरच्या कठीण परिस्थितीमुळे कोवळ्या वयात त्यांना मेसर्स येट्स ब्रदर्स या कंपनीत वेठबिगाराप्रमाणे काम करावे लागले. कंपनीतल्या हालअपेष्टांमधून सुटका झाल्यानंतर वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ते नशीब काढण्यासाठी भारतात आले; परंतु ज्या व्यापारी संस्थेमध्ये काम करायला ते आले होते ती संंस्था दिवाळखोरीत असल्याने मुंबईत अनेक खटपटी केल्यावर मेडोज टेलर यांना हैद्राबाद निझामाच्या राज्यात लष्करी व मुलकी अधिकारी म्हणून नोकरी मिळाली. ते १८२४ रोजी लेफ्टनंट म्हणून औरंगाबादला रुजू झाले व या सेवेत १८६० पर्यंत होते. सन १८४१ ते १८५३ या कालावधीत मेडोज टेलर यांनी कर्नाटकात असलेल्या शोरापूर या संस्थानात पोलिटिकल एजंट म्हणून काम केले. त्यानंतर १८५३ ते १८५७ या दरम्यान त्यांनी नळदुर्ग जिल्ह्यात प्रशासक म्हणून काम केले. सन १८५७-५८ या अशांततेच्या व बंडाळीच्या काळात त्यांनी समाजातील आपल्या प्रतिष्ठेच्या बळावर वर्हाड भागात शांतता राखली.
निझामाच्या सेवेत असताना मेडोज टेलर यांनी प्रशासकीय व लष्करी सेवा चोख बजावली. निझामाच्या राज्यात असणार्या मराठवाडा व वर्हाड या भागांमध्ये धाडसी व कडक पोलीस अधिकारी म्हणून मेडोज टेलर यांनी लौकिक मिळवला. प्रारंभापासून त्यांनी भारतीय समाजात मिसळायला सुरुवात केली. एकाच वर्षात हिंदुस्थानी व पार्शियन या भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवले. तसेच चित्रकला, मंदिरस्थापत्य व संगीत या विषयांमध्ये त्यांना रुची निर्माण झाली. मेडोज टेलर यांचे स्थानिक लोकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते व त्यांची भारतीय समाजाबद्दलची जाण परिपक्व होती. त्यांची पत्नी मेरी पाल्मर ही वंशाने अर्धी भारतीय होती.
सन १८६० मध्ये प्रकृतीच्या कारणामुळे मेडोज टेलर यांनी सेवानिवृत्ती घेतली व ते मायभूमीत परतले. त्यानंतर १८६० ते १८७६ या दरम्यान १८७५ मधली भारतभेट वगळता डब्लिन येथे ते लेखनात मग्न होते.
भारतातल्या वास्तव्यातच त्यांना संशोधनाची व लेखनाची गोडी लागली होती. त्यांनी लंडनच्या ‘द टाइम्स’साठी दीर्घकाळ लेखन केले. ठगांच्या समस्येवर अभ्यासपूर्वक लिहिलेली ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग’ (१८३९) ही त्यांची अत्यंत गाजलेली कादंबरी आहे. याखेरीज तत्कालीन भारतीय समाजाचे उत्कृष्ट चित्रण करणार्या ‘टिपू सुलतान : अ टेल ऑफ द म्हैसूर वॉर’ (१८४१), ‘तारा’ (१८६३), ‘राल्फ डार्नेल’ (१८६५), ‘सीता’ (१८७३) व ‘ए नोबल क्वीन’ (१८७८), या इतर कादंबर्याही गाजल्या. त्यांच्या मृत्यूनंतर ‘द स्टोरी ऑफ माय लाइफ’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.
मेडोज टेलर यांनी भारतीय इतिहास व पुरातत्त्व यावर विपुल लेखन केले. प्रशासकीय सेवा केली, त्या सर्व ठिकाणी, विशेषत: शोरापूर संस्थानात असताना त्यांनी पुरातत्त्वीय अवशेषांची नोंदणी केली व काही महापाषाणयुगीन स्थळांचे उत्खनन केले. पुरातत्त्वाचा इतिहास मांडणार्या अभ्यासकांनी मेडोज टेलर यांच्या अचूक व पद्धतशीर संशोधनाचे कौतुक केले आहे. त्यांनी कृष्णा-भीमा दोआबाच्या प्रदेशात अनेक पुरातत्त्वीय स्थळांचा शोध लावला व त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. या काळात पुरातत्त्व निवळ कुतूहल व प्राचीन अवशेषांची लुटमार करण्याच्या अवस्थेत होते, तेव्हा उत्खनन करण्याचा उद्देश स्पष्टपणे समजणारा आणि रूढार्थाने विद्वान नसलेला हा ब्रिटिश अधिकारी अनोखा पुरातत्त्व संशोधक होता. त्यांची उत्खननाची व अहवाल लेखनाची पद्धत तर काळाच्या पुढे होती. स्वत: मेडोज टेलर यांनी आत्मचरित्रात म्हटल्याप्रमाणे ‘फारसे औपचारिक शिक्षण नसतानाही’ त्यांनी साहित्य, भारतीय इतिहास व पुरातत्त्व यांत केलेली कामगिरी थक्क करणारी आहे.