मेहेंदळे, लीना
लीना मेहेंदळे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव नीला असे होते. बिहार राज्यातील दभर्का या जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांचे वडील डॉ.बलराम सदाशिव अग्निहोत्री हे मिथिला संस्कृत संशोधन संस्थेमधे तत्त्वज्ञान आणि संस्कृत या विषयांचे प्राध्यापक होते.
त्यांनी अर्थशास्त्र या विषयात नागपूरच्या एस.एन.डी.टी महाविद्यालयातून पदवी संपादन केली. नंतर १९७० साली त्यांनी पटना विद्यापीठातून भौतिकशास्त्र या विषयात एम.एस्सी ही पदवी संपादन केली. १९८९ साली त्यांनी इंग्लंडमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठातून ‘प्रकल्प नियोजन’ या विषयात एम.एस्सी. पूर्ण केले. १९७४ साली भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या आणि त्यांना महाराष्ट्र कॅडर मिळाले.
महसूल, प्रशासन, प्रशासकीय कायद्याची अंमलबजावणी, विकास प्रशासन, औद्योगिक विकास, प्रशिक्षण आणि मनुष्यबळ विकास, कार्यालयीन कामकाजात संगणक व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा प्रशासनाच्या सर्वच क्षेत्रातील विषय त्यांनी कौशल्याने हाताळले आहेत. सांगली महानगर पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगलीच्या जिल्हाधिकारी, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ पुण्याच्या अध्यक्षा अशा विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले.सांगली जिल्ह्यातील जत या तालुक्यात देवदासींची अनिष्ट प्रथा पाळली जात असे. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळेच समाजातील वाईट लोकांकडून देवदासींचे शोषण केले जाते, हे लीना मेहेंदळे यांच्या लक्षात आले. त्यांनी देवदासींना व्यवसाय प्रशिक्षण देऊन सक्षम करण्याचा अभिनव उपक्रम अवलंबला. सांगलीच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी एकात्मिक ग्रामविकास योजनेअंतर्गत देवदासींच्या आर्थिक पुनर्वसनाचे काम केले.
या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या व्यावसायिक प्रशिक्षणाचा कालावधी खूपच कमी होता. मेहेंदळे यांनी हा कालावधी वाढवून घेतला. जत तालुक्यातील सरकारी जमिनीवर देवदासींसाठी घरे बांधून देण्यात आली. त्यांच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले. देवदासींना यंत्रावर लोकरीचे विणकाम, लोकरीच्या कपड्याचे पॅकींग, मार्केटींग या सर्व गोष्टी शिकवण्यात आल्या. देवदासींनी तयार केलेल्या लोकरीच्या उत्पादनांना पश्चिम महाराष्ट्र विकास मंडळाच्या मार्फत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली. सरकारमार्फत विविध ठिकाणी भरवण्यात येणाऱ्या विक्रीमेळ्यांमध्ये या वस्तूंची विक्री होऊ लागली. लांबच्या गावातून प्रशिक्षणासाठी येणाऱ्या देवदासींना सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या व या माध्यमातून महिलांमध्ये आत्मविश्वास जागवण्याच्या कामी लीना मेहेंदळे यांनी पुढाकार घेतला. या प्रकल्पाच्या माध्यमातून सरासरी २८ ते ४० वयोगटातील १५० महिलांचे आर्थिक पुनर्वसन करण्यात आले.
‘पेट्रोलियम कॉन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन’मध्ये संचालक पदावर काम करत असताना, ऊर्जा बचतीसंदर्भात जनजागृती निर्माण व्हावी यासाठी आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या साप्ताहिक मालिकांसाठी मार्गदर्शनाचे काम मेहेंदळे यांनी केले. एनर्जी ऑडिट विभागाची पुनर्रचना करून बायोडिझेल मंत्रालयासाठी नवीन योजना व कार्यक्रमांची आखणी केली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या जॉईंट सेक्रेटरी या पदावर असताना त्यांनी महाराष्ट्र, बिहार आणि राज्यस्थान या राज्यांमध्ये महिलांविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांचा अभ्यास केला आणि हिंदी वृत्तपत्रामध्ये महिलांसाठी कायद्याचे मार्गदर्शन करणारे साप्ताहिक सदर चालवले. महिलांना न्याय मिळावा यासाठी महिलाविषयक कायद्यांमध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या. संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये ‘द कन्व्हेन्शन ऑन द एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन’ (सीइडीएडब्ल्यू) या विषयावर झालेल्या परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व त्यांनी केले.
जमाबंदी आयुक्त आणि नाशिकच्या जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत असताना लीना मेहेंदळे यांनी कार्यालयांचे संगणकीकरण घडवून आणले. तसेच जमिनींचे नकाशे, जमिनी संदर्भातील कागदपत्रांचे तपशील यांचे देखील संगणकीकरण करण्यात आले. त्याचबरोबर त्यांनी कार्यालयीन कामकाजाची सोपी पद्धत अंमलात आणून कामाला एक नवी दिशा दिली.
पुणे येथे १९८६ साली स्थापन झालेल्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी’चे देशव्यापी नेटवर्क त्यांनी तयार केले तसेच आरोग्य मंत्रालयासाठी अनेक योजनाही तयार केल्या.
अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग या पदावरून त्या निवृत्त झाल्या. त्या सतत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत आणि सोबतच्या कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षित करत. त्यांनी संगणक वापरासंबंधीच्या महत्त्वाच्या बाबी विशद करणारे ‘संगणकाची जादूई दुनिया’ या पुस्तकाचे लेखन केले आहे. चालू घडामोडींबरोबरच शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, बालवाङ्मय, संगणक, कायदा, लोकप्रशासन अशा विविध विषयांवर त्यांचे ५०० लेख आणि २३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लोकप्रशासनातील अनुभवांवर त्यांनी लिहिलेली ‘समाजमनाची बिंबे’ आणि ‘इथे विचारांना वाव आहे’ ही पुस्तके समाजातील समस्यांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी वाचकाला देतात तर प्रशासकीय सेवेत आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रशासकीय सेवेकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देतात. इंटरनेटवरील मराठी भाषेच्या वापराबाबत त्या विशेष आग्रही असून संगणकावरील भारतीय भाषा वापरण्यासाठीच्या सॉफ्टवेअरचा त्यांनी विशेष अभ्यास केला आहे. सध्या लीना मेहेंदळे या केंद्रीय प्रशासन लवादाच्या सदस्या म्हणून बंगलोर येथे कार्यरत आहेत.