Skip to main content
x

मेहेंदळे, मधुकर अनंत

     धुकर अनंत मेहेंदळे यांचा जन्म मध्य प्रदेशातील हरसूल येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सत्यभामाबाई होते. वडील गुजरात रेल्वेमध्ये नोकरी करीत असल्यामुळे डॉ. मेहेंदळे यांचे सुरुवातीचे शिक्षण गुजरातमध्ये झाले. बडोदा महाविद्यालय (गुजरात) येथून बी.ए. (१९३७) व विल्सन महाविद्यालय मुंबई येथून एम.ए. (१९३९) या दोन्ही पदव्या प्रथम श्रेणीत मिळवून पीएच.डी.साठी ते पुण्यातील सर्वांत जुन्या व नावाजलेल्या डेक्कन महाविद्यालयामध्ये आले. या दरम्यान ते भगवानदास पुरुषोत्तमदास संस्कृत शिष्यवृत्ती (१९३९), व्ही.एन. मंडलिक पारितोषिक (१९४२) व भगवानलाल इंद्रजी सुवर्णपदक व पारितोषिक (१९४३) (सर्व मुंबई विद्यापीठातर्फे) यांचे मानकरी ठरले. सन १९४३मध्ये पीएच.डी. मिळाल्यानंतर डॉ. मेहेंदळे यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात कर्नाटकातील बागलकोट येथे बसवेश्वर महाविद्यालयामध्ये व्याख्याता म्हणून केली. (१९४४-४५). त्यानंतर गुजरातमधील नवसारी येथे एस.बी. गार्डा महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. (१९४५-५१).

      इ.स. १९५१मध्ये डॉ. मेहेंदळे डेक्कन महाविद्यालयामध्ये वेदिक संस्कृतचे प्रपाठक या पदावर रुजू झाले. डेक्कन महाविद्यालय ही भाषाशास्त्राची पंढरी समजली जाते. आधुनिक दृष्टीकोनातून भाषाशास्त्राचा अभ्यास करणार्‍या भारतीय विद्वानांच्या पहिल्या पिढीपैकी डॉ. मेहेंदळे हे एक आहेत. म्हणूनच त्यांच्यासारख्या अभ्यासकाला डेक्कन महाविद्यालयामधील वातावरण व विद्वानांचा सहवास कामासाठी पोषकच ठरला.

     डेक्कन महाविद्यालयामध्ये आल्यावर लगेचच जर्मनीतील ग्योटिंगन विद्यापीठात अभ्यागत व्याख्याता म्हणून दोन वर्षांसाठी त्यांना पाचारण करण्यात आले (१९५२-५४). पुढे अमेरिकेतील येल विद्यापीठात सीनियर रॉकफेलर फाउंडेशन फेलो म्हणून वेद व भाषाशास्त्र शिकण्याची संधी त्यांना मिळाली (१९५७-५८). इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात अवेस्ता शिकण्याचा योगही जुळून आला. या सर्व अनुभवामुळे त्यांच्या अभ्यासाला एक विस्तृत आणि तौलानिक परिमाण लाभले. याची साक्ष त्यांच्या संशोधनपर लिखाणात ठायीठायी दिसून येत आहे. आधी संस्कृतचे प्रपाठक, मग प्राध्यापक व मग डेक्कन महाविद्यालयामध्ये अजूनही ज्याचे काम चालू आहे त्या ज्ञानकोशात्मक संस्कृत कोश प्रकल्पाचे संयुक्त संपादक अशा विविध पदांवर डॉ. मेहेंदळे यांनी डेक्कन महाविद्यालयामध्ये काम केले (१९५१-१९८३). तेथून निवृत्त झाल्यावरही पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात ‘महाभारत - उपसंहार, व कल्चरल इंडेक्स ऑफ महाभारत भाग १’ यांचे संपादक म्हणून कार्यभार त्यांनी उचलला आहे.

     डेक्कन महाविद्यालयामधील प्रदीर्घ कारकिर्दीत, एकीकडे तेथे व पुणे विद्यापीठात अध्यापन तसेच पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि त्याबरोबरच दुसरीकडे आपल्या विषयात मौलिक संशोधन असा त्यांचा प्रवास चालला होता. डॉ. मेहेंदळे यांच्या अभ्यासाच्या विषयाचा आवाका खूप मोठा आहे. वैदिक संस्कृत, निरुक्त, पाली आणि प्राकृत, ऐतिहासिक भाषाशास्त्र, अवेस्ता आणि महाभारत इत्यादी परस्परसंबद्ध विषयांवर चौदाहून अधिक ग्रंथ डॉ. मेहेंदळांच्या नावावर आहेत. अशोकन् इन्स्क्रिप्शनस् इन् इंडिया, हिस्टॉरिकल ग्रमर ऑफ इन्स्क्रिप्शनल प्राकृत्स, दि निरुक्त नोट्स, तसेच सम आस्पेक्ट्स ऑफ इंडो-आर्यन लिंग्विस्टिक्स इत्यादी ग्रंथ आजही या विषयातील जागतिक विद्वानांत प्रमाणभूत मानले जातात. याबरोबरच संशोधनपर लेखनाला वाहिलेली देशी-विदेशी अनेक नियतकालिके, स्मृतिग्रंथ व गौरवग्रंथ यांत डॉ. मेहेंदळे यांचे शंभराहून अधिक शोधनिबंध इंग्लिशमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचा संग्रह मधु-विद्या या नावाने प्रसिद्ध झाला आहे.

     गेली सुमारे सत्तर वर्षे डॉ. मेहेंदळे लेखन करीत आहेत. त्यांचे बरेच संशोधनपर लिखाण इंग्लिशमधून आहे. त्यांचे अनेक मराठी लेख नवभारतमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. अनेक परस्परपूरक विद्याशाखांचा अभ्यास असल्यामुळे त्यांच्या मराठी लेखनातही विषयांचे वैविध्य लक्षणीय आहे. हे लेख मुख्यत: वेद, उपनिषदे, रामायण व महाभारत यांवर लिहिलेले असून ते रसिक व चिकित्सक अभ्यासक अशा दोन्ही दृष्टीकोनांतून लिहिले आहेत. यांतील निवडक लेखांचा संग्रह ‘प्राचीन भारत: समाज व संस्कृती’ या नावाने प्राज्ञपाठशाळा, वाई येथून प्रसिद्ध झाला आहे. या ग्रंथात समाविष्ट केलेली विनोबाजींची गीताई व गीताप्रवचने, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशीकृत वैदिक संस्कृतीचा विकास अशा काही प्रसिद्ध मराठी ग्रंथांची अभ्यासपूर्ण व मर्मग्रही परीक्षणे वाचली, तर मूळ ग्रंथ अधिक चांगला समजतो. कुठल्याही अभिनिवेशाचा अभाव, सप्रमाण विधाने आणि कमालीचा समतोलपणा ही डॉ. मेहेंदळे यांच्या संशोधनाची वैशिष्ट्ये समजली जातात. त्यांच्या कामाची दखल घेऊन अनेक सुप्रतिष्ठित व्याख्यानमाला गुंफण्यासाठी त्यांना आदरपूर्वक निमंत्रित केले गेले.

     विल्सन फिलालॉजिकल लेक्चर्स मुंबई विद्यापीठ, मुंबई (१९६६), भाऊ विष्णु अष्टेकर वैदिक व्याख्याने, पुणे विद्यापीठ, पुणे (१९७८), डॉ. पां. वा. काणे स्मृती व्याख्यान, एशियाटिक सोसायटी, मुंबई (१९८५), तसेच पुण्यातील डॉ. ह. रा. दिवेकर (१९८७), प्रा. गो. के. भट (१९९०), प्रा. अरविंद मंगरूळकर (१९९१), डॉ. रा. शं. वाळिंबे (१९९४) यांच्या स्मृती व्याख्यानमाला ही त्यातील काही नावे आहेत. विद्येच्या क्षेत्रातील काही महत्त्वपूर्ण अध्यक्षपदेही डॉ. मेहेंदळे यांच्याकडे चालून आली. अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या दोन अधिवेशनांत भारतीय भाषाशास्त्र विभाग अध्यक्ष (अन्नमलाई नगर, १९५५) आणि वैदिक विभाग अध्यक्ष (कुरुक्षेत्र, १९७४) ही जबाबदारी पार पाडली. लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडिया (कोलकाता, १९७९) आणि बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषद, संस्कृत वाङ्मय व भाषाशास्त्र विभाग (अधिवेशन १) यांची अध्यक्षपदेही त्यांनी भूषवली आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्याही कमी नाही. गुरू गंगेश्वर राष्ट्रीय वेद-वेदांग पुरस्कार (नाशिक, १९९७), पंडित राजारामशास्त्री नाटेकर पुरस्कार (पुणे, १९९७), पुरुषोत्तम पुरस्कार (सांगली, १९९७), प्रा. न. र. फाटक स्मृती पुरस्कार (पुणे, १९९८) व श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक-आध्यात्मिक पुरस्कार (श्रीदेवदेवेश्वर संस्थान पुणे, १९९९) असे हे पुरस्कार त्यांच्या जीवनकार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना दिले गेले. एशियाटिक सोसायटी, मुंबई यांच्यातर्फे देण्यात येणारे महामहोपाध्याय पां.वा. काणे सुवर्णपदकही त्यांना मिळाले आहे. दि. ६ ऑक्टोबर २०१२ रोजी डेक्कन महाविद्यालयाने त्यांना सन्मानीय डी.लिट्. पदवीने गौरवले. विद्यापीठ स्तरावरील उत्तम शिक्षकासाठी असलेला पुरस्कार महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांना बहाल केला (१९७६). तसेच राष्ट्रपतींचे सन्मानीय प्रशस्तिपत्र त्यांना मिळाले आहे (१९९०). गांधीवादी असलेल्या डॉ. मेहेंदळे यांचा स्वावलंबनावर नितांत विश्वास आहे. पू. विनोबा भावे हे त्यांचे श्रद्धास्थान आहे. दूरदर्शनवरील रामायण व महाभारत या मालिकांमधील विपर्यस्त चित्रणाची दखल घेणारे लेखनही त्यांनी केले आहे. त्यांच्या सुविद्य पत्नी कुसुमताई या ग्रंथपाल असून खादी वापरण्याचे व्रत पाळत. डॉ. मेहेंदळे यांच्या दीर्घ आणि कृतकृत्य जीवनप्रवासात त्यांची साथ मोलाची होती.

डॉ. माधवी कोल्हटकर  

मेहेंदळे, मधुकर अनंत