Skip to main content
x

मेहता, विजय बाळकृष्ण

         विजय बाळकृष्ण मेहता यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे झाला. त्यांच्या आईचे नाव स्नेहलता होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण जळगावच्या शाळेत, तर माध्यमिक शिक्षण दापोलीच्या ए.जी. हायस्कूलमध्ये झाले. १९६५ साली दापोलीला कृषी महाविद्यालयाची स्थापना झाली. महाविद्यालयाच्या पहिल्या तुकडीचे ते विद्यार्थी होते. त्यांनी १९६९ साली महाराष्ट्र कृषी विद्यापीठाची बी.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम क्रमांकाने संपादन केली. त्यांनी १९७२ साली विशेष नैपुण्यासह प्रथम श्रेणीत म.फु.कृ.वि.ची एम.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी उरळी कांचनच्या भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान या नामांकित संस्थेत काही काळ नोकरी केली. दरम्यान १८ मे १९७२ रोजी दापोलीला बा.सा.को.कृ.वि.ची स्थापना झाल्यावर त्यांची साहाय्यक प्राध्यापक या पदावर नेमणूक झाली. बा.सा.को.कृ.वि.त सेवा करत असताना त्यांनी प्रतिनियुक्तीवर १९८२ साली गुजरात कृषी विद्यापीठातून पीएच.डी. शिक्षण पूर्ण केले. कुलगुरूंचे तांत्रिक अधिकारी, संशोधन उपसंचालक, खार जमीनशास्त्रज्ञ, कृषि-रसायन व मृदाशास्त्र विभागप्रमुख, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विद्यापीठाच्या कृषिविद्याशाखेचे अधिष्ठाता आणि शिक्षण संचालक अशी विविध पदे भूषवत ४ जुलै २००६ रोजी ते बा.सा.को.कृ.वि.चे कुलगुरू झाले.

         त्यांनी सप्टेंबर १९८७ ते सप्टेंबर १९९५च्या दरम्यान पनवेलच्या खार जमीन संशोधन केंद्रावर प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून काम करताना खार जमिनीत रब्बी हंगामात घ्यावयाच्या पिकांच्या लागवडपद्धती विकसित केल्या. कोकणातील सागरी खाड्यांच्या भागात कांदळवनांच्या विकासाचे धोरण त्यांनी तयार केले. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल जागतिक बँक व युरोपियन आर्थिक समुदायाकडून त्यांना गौरवण्यात आले. बँकॉक येथे  १९९०मध्ये समस्याग्रस्त जमिनींसाठी जागतिक संशोधन कार्यक्रमांतर्गत बैठक झाली. या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केंद्र शासनाने त्यांची निवड केली होती. त्यांनी बा.सा.को.कृ.वि.च्या कुलगुरुपदाची धुरा स्वीकारल्यानंतर विद्यापीठाच्या कार्याला निश्‍चित दिशा आणि गती देण्याच्या उद्देशाने नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केले. प्राध्यापकांचे व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी त्यांनी अध्यापन तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले, देश-परदेशातील नामांकित संस्थांमध्ये प्राध्यापकांना शिक्षण, प्रशिक्षण, परिसंवाद, कार्यशाळा, चर्चासत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी पाठवले. वनशास्त्र, उद्यानविद्या आणि कृषि-अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासक्रमांची सुरुवात, मुलांमुलींच्या वसतिगृहांमध्ये संगणक, माहितीजाल व अभ्यासिका सुविधा अशासारख्या सुधारणा त्यांनी केल्या. दर्जेदार बियाणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी विविध पिकांच्या सुधारित जातींचा महत्त्वाकांक्षी बीजोत्पादन कार्यक्रम राबवून शेकडो क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. मत्स्य बीजोत्पादनाचा धडक कार्यक्रमही त्यांनी सुरू केला.

         महिला बचत गटांच्या माध्यमातून कृषि-पर्यटन ही त्यांची संकल्पनादेखील लोकप्रिय झाली . विद्यापीठ शास्त्रज्ञ आणि मच्छिमार/शेतकरी यांच्यामध्ये थेट संवाद घडवून आणण्याच्या उद्देशाने मच्छिमार शास्त्रज्ञ मंच आणि शेतकरी शास्त्रज्ञ मंच स्थापन करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पालवी २००९ हा कृषी तंत्रज्ञान सप्ताह खूप गाजला.

         महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषी पुरस्कार, केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयातर्फे दिले जाणारे राष्ट्रीय छात्रसेनेचे मानद कर्नल कमांडंट पद, श्री स्वामी समर्थ गौरव पुरस्कार असे प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळाले. विद्यापीठाने विकसित केलेल्या स्थानिक सामग्रीपासून बनवता येणारा कमी खर्चिक बंधारा ‘कोकण विजय बंधारा’ या त्यांच्याच नावाने ओळखला जातो. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन व व्यवस्थापनाने गाठलेल्या उंचीमुळे विद्यापीठाला आयएसओ मानांकन मिळाले आहे.

- अशोक निर्बाण

मेहता, विजय बाळकृष्ण