मेमन, अलीमहंमद अब्दुलकरीम
अलीमहंमद अब्दुलकरीम मेमन यांचा जन्म सौराष्ट्रातील जुनागड येथे झाला. त्यांचे वडील शेती करत. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झोराजी-जुनागड येथे झाले. ते १९३४मध्ये मॅट्रिक झाले आणि त्यांनी बावधन महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. ते १९३७मध्ये कृषी पदवीधर झाले. ते १९४०मध्ये शेतीखात्यामध्ये नोकरीस लागले. नोकरी करत असतानाच त्यांना १९४७मध्ये अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी पाठवण्यात आले. १९५१मध्ये अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठातून ते एम.एस्सी. (कृषि-अभियांत्रिकी) पदवी घेऊन भारतात परतले. त्यांची अध्यापक म्हणून पुणे येथील कृषी महाविद्यालयातील कृषि-अभियांत्रिकी विभागात नेमणूक झाली. त्यांचा पदव्युत्तर विषय शेती अवजारे असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील शेती अवजारे या विषयात लक्ष घातले. त्या वेळचे कृषि-संचालक डॉ. बी.एन. उप्पल यांनी एका कृषी परिषदेमध्ये या प्रश्नाचा ऊहापोह केला आणि ‘संशोधन करण्याआधी आहे त्या अवजारांची माहिती मिळवा आणि त्याच अवजारांमध्ये सुधारणा करून शेतकर्यांना द्या’, असे सुचवले. प्रा. मेमन यांनी हाच धागा पकडून शेतीच्या अवजारांचे सर्वेक्षण करायचा प्रकल्प हाती घेतला. त्याला सरकारने मंजुरी दिली. या प्रकल्पावर आधारित त्यांनी ‘मुंबई प्रांतातील शेतीची अवजारे’ हे पुस्तक लिहिले. त्या वेळच्या मुंबई प्रांतात, महाराष्ट्र, गुजराथ आणि कर्नाटक या विभागांचा समावेश होता.
आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारची अवजारे आहेत. नांगर, कुळव आणि पाभर (पेरणीचे अवजार) ही मुख्य आणि इतर अवजारे अशा सर्व प्रकारच्या अवजारांचे अभियंता, आरेखन, त्यांची मापे, अवजार ओढणार्या बैलाच्या जाती, बैल जुंपायच्या पद्धती यांचे सर्वेक्षण करणे आवश्यक होते. त्या वेळचे संशोधन अभियंता एन.सी. शाह यांनी हे काम पूर्ण केले. प्रा. मेमन यांनी त्यात भर टाकून हे महत्त्वाचे पुस्तक लिहिले. त्यांच्या या लिखाणामुळे अनेक संशोधकांनी सुधारित पेरणी यंत्र, सुधारित कुळव, उफणणी यंत्र या अवजारांमध्ये सुधारणा करून ती शेतकर्यांना उपलब्ध करून दिली. कृषि-अभियांत्रिकी या विषयात अन्य विषयांसारखा पदव्युत्तर अभ्यासक्रम नव्हता. त्यामुळे हा अभ्यासक्रम प्रा. मेमन यांनी १९६०मध्ये सुरू केला. त्याचा फायदा घेऊन बरेच विद्यार्थी एम.एस्सी. (कृषि-अभियांत्रिकी) पदवी मिळवू शकले. अशाच तर्हेचा अभ्यासक्रम डॉ.पं.दे.कृ.वि.तही सुरू झाला. या प्रत्येक अभ्यासक्रमात संशोधन हा महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे शेतीच्या अवजारांवर खूप संशोधन झाले आणि शेतकर्यांना सुधारित अवजारे मिळाली.
मेमन यांनी पुणे आणि कोल्हापूर या ठिकाणी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम पाहिले. विशेषतः कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयाचा विकास करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ते १९७५ मध्ये निवृत्त झाले.