Skip to main content
x

मगर, शंकर श्रीरंग

             शंकर श्रीरंग मगर यांचा जन्म पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील सुरवड गावी झाला. त्यांना घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यासाठी कष्ट करावे लागले, पण त्यांनी बुद्धी, चिकाटी व महत्त्वाकांक्षा यांच्या आधारे शिक्षण क्षेत्रातले उच्च कुलगुरुपद प्राप्त केले. पुणे येथून त्यांनी १९६५मध्ये बी.एस्सी. (कृषी) व १९६७मध्ये कृषि-अभियांत्रिकी विषयात एम.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. त्यांनी १९७७मध्ये खरगपूर येथील आय.आय.टी.मधून मृदा-भौतिकशास्त्र विषयात पीएच.डी. मिळवली. त्यांनी त्यानंतर अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय सिंचन व्यवस्थापन संस्था, लोगन, उटाह येथे एक वर्षाचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी पुण्याच्या कृषी महाविद्यालयात कृषि-अभियांत्रिकी विषयाचा व्याख्याता म्हणून १९६८मध्ये नोकरीस सुरुवात केली. तेथेच पुढे  सहयोगी प्राध्यापक, प्रपाठक (१९७० ते १९८४), नंतर पाणी व्यवस्थापन प्रकल्प, राहुरी येथे प्रमुख शास्त्रज्ञ (१९८४ ते १९८६) व म.फु.कृ.वि. येथेच सिंचन व पाणी व्यवस्थापन, विभागप्रमुख या पदांवर (१९८६ ते १९९४) कार्य केले.

            मगर यांनी आपल्या कार्यकाळात पीक पद्धती, पिकांची पाणी गरज, सूक्ष्मसिंचन, धरण लाभक्षेत्र पाणी व्यवस्थापन, कृषी उत्पादकता या विषयांच्या अध्यापन व संशोधन कार्यावर भर दिला. तसेच त्यांनी एम.एस्सी. (कृषी) पदवीसाठी २४ व पीएच.डी.साठी ३ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांचे ५० संशोधन निबंध, ६ पुस्तके व अनेक मराठी लेख प्रसिद्ध झाले आहेत.

            कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य (१९९४ ते १९९६) व म.फु.कृ.वि. येथे अधिष्ठाता (१९९६ ते २०००) पदाचा अनुभव घेतल्यानंतर बा.सा.को.कृ.वि.चे कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली व २००६पर्यंत त्या पदावर कार्य करून ते सेवानिवृत्त झाले. त्यांनी १९८० ते २००९ दरम्यान ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मेक्सिको, इस्राएल, चीन, इथियोपिया व थायलंड अशा ७ देशांना भेटी दिल्या. त्यांनी दिल्ली येथील भा.कृ.सं.प. व भारत सरकारच्या जलसंपत्ती मंत्रालयाचे अनेक अभ्यासगट व मंडळे यांवर तसेच भारतातील अनेक कृषी विद्यापीठांच्या विविध मंडळांवर तज्ज्ञ सदस्य, शास्त्रज्ञ व सल्लागार म्हणून काम केले. त्यांचे आत्मचरित्र ‘सागरी लाटा’ या नावाने स्वरूप प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे.

- मिलिंद कृष्णाजी देवल

मगर, शंकर श्रीरंग