Skip to main content
x

महाजनी, गणेश सखाराम

     ज्यांच्या पूर्वजांनी सातारा येथील छत्रपतींच्या कारभारी मंडळात महत्त्वाची पदे भूषविली, अशा ऐतिहासिक कुटुंबात गणेश सखाराम महाजनी यांचा जन्म झाला. मॅट्रिकच्या परीक्षेत तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले महाजनी पुढे इंटर आर्ट्स व बी.ए.च्या परीक्षेत पहिले आले. इतकेच नव्हे, तर इंटरमध्ये संस्कृतची दुसरी शिष्यवृत्ती आणि बी.ए.ला गणितात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराला दिली जाणारी ‘ड्यूक ऑफ एडिंबरो’ शिष्यवृत्ती देऊन मुंबई विद्यापीठाने त्यांचा गौरव केला. त्यानंतर गणिताचे उच्चशिक्षण घेण्यासाठी त्यांना हिंदुस्थान सरकारची शिष्यवृत्ती मिळाली, म्हणून त्यांना केंब्रिज विद्यापीठाच्या सेंट जोन्स महाविद्यालयामध्ये ट्रायपॉसच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेता आला.

     १९२२ सालच्या ट्रायपॉस परीक्षेच्या भाग एकमध्ये महाजनींनी पहिला क्रमांक मिळवला म्हणून सेंट जोन्स महाविद्यालयाने त्यांना फाउण्डेशन शिष्यवृत्ती दिली. अशाच प्रकारे, ट्रायपॉस भाग दोनच्या ए प्रभागात पहिला वर्ग आणि बी प्रभागात ऑनर्स मिळवून १९२४ साली महाजनी बी-स्टार रँग्लर झाले. त्यांचे हे नेत्रदीपक यश पाहून भारतातील आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा महाजनींनी केंब्रिजमध्ये चालू ठेवल्याचे लक्षात येते.

     ट्रायपॉस भाग दोनच्या प्रभागात काही प्रमाणात संशोधनपूर्व अभ्यासाची तयारी झाल्यामुळे महाजनी संशोधनाच्या बिकट वाटेकडे वळले. नेहमीचा परिपाठ सोडून वेगळ्या असणाऱ्या संशोधनाच्या या क्षेत्रात, संशोधनात मुरलेल्या ई. कनिंगहॅम, हॅरॉल्ड जेफ्रीज, जी.सी. डार्विन, आर.एच. फाउलर, ई. रूदरफोर्ड व आर.डब्ल्यू. फाउलर यांच्यासारख्या तज्ज्ञ व अधिकारी मंडळींचे त्यांना मार्गदर्शन लाभले. पैकी जी.सी. डार्विन यांनी महाजनींना संशोधनासाठी ‘लोहचुंबकीय संयुगांच्या स्फटिकांची उत्पत्ती’ (थिअरी ऑफ फेरोमॅग्नेटिक क्रिस्टल्स) हा विषय सुचविला. केंब्रिज विद्यापीठाने हॅरॉल्ड जेफ्रीज व ई. कनिंगहॅम यांची महाजनींचे परिनिरीक्षक म्हणून नेमणूक केली.

     त्यानंतर प्रत्यक्ष संशोधन चालू झाले व त्यात काही प्रमाणात प्रगती झाल्याचा अंदाज आल्यावर महाजनींनी झालेल्या भागावर आधारलेला एक निबंध लिहिला व तो विद्यापीठाच्या स्मिथ पारितोषिकासाठी सादर केला. त्याचे चिकित्सकपणे परीक्षण करून तज्ज्ञ समितीने स्मिथ पारितोषिकासाठी त्याची शिफारस केली. मग १९२६ सालच्या मार्च महिन्यात केंब्रिज विद्यापीठाने त्यांना हे पारितोषिक दिले. तोपर्यंत अवघ्या तीनच भारतीयांना हा मान मिळाला होता. त्यामुळे महाजनींचे हे यश तेव्हा डोळ्यांत भरण्यासारखे होते. त्यानंतर थोड्याच अवधीत त्यांनी पीएच.डी.चा प्रबंध पूर्ण करून विद्यापीठास सादर केला व १९२६ सालच्या डिसेंबर महिन्यात ते मायदेशी येण्यास निघाले. बी.ए.ची पदवी घेतल्यावर तीन वर्षांनी, म्हणजे दहा सत्रांनंतर केवळ परीक्षा शुल्क भरून उमेदवारास एम.ए. (कँटब) पदवी देण्याची केंब्रिज विद्यापीठात तरतूद आहे. या नियमान्वये महाजनी १९२७ साली एम.ए. (कँटब) झाले. तसेच १९२९ साली त्यांचा प्रबंध मंजूर होऊन विद्यापीठाने त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान केली.

     केंब्रिजला जाण्यापूर्वीच डेक्कन एज्युकेशन सोसायटीने महाजनींना आजीव सेवक करून घेतल्यामुळे स्वदेशी परतल्यावर ते फर्गसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करू लागले. नंतर पंधरा वर्षे ते या महाविद्यालयाचे प्राचार्य होते. गणिताचे प्राध्यापक व महाविद्यालयाचे प्रमुख या दोन्ही नात्यांनी त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. प्राचार्यपदाच्या कारकिर्दीत त्यांच्यावर एक बाका प्रसंग गुदरला होता. तो म्हणजे, मुंबई राज्याचे तत्कालीन गव्हर्नर हॉटसन यांच्या महाविद्यालय भेटीच्या वेळी गोगटे नावाच्या एका विद्यार्थ्याने गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. परंतु गव्हर्नरचा चांगुलपणा हा, की त्याने महाजनींना दोष दिला नाही आणि नंतर फाशीऐवजी शिक्षा भोगून तुरुंगातून सुटलेल्या गोगटेच्या पुढील शिक्षणाची इंग्लंडहून महाजनींकडे चौकशी केली. इतकेच नव्हे, तर त्याच्या शिक्षणासाठी तेथून पैसे पाठविले. महाविद्यालयातील नेहमीच्या जबाबदाऱ्या सांभाळून महाजनींनी छात्रसेनेत प्रवेश करून तेथे त्यांनी केलेल्या कामाचे चीज होऊन ते ‘मेजर’च्या हुद्यापर्यंत चढले. पुढे त्यांनी आपले गुरू रँग्लर परांजपे यांच्याप्रमाणेच उदारमतवादी पक्षाच्या कार्यक्रमात भाग घेण्यास सुरुवात केली. त्याचा झालेला लाभ म्हणजे त्यांना १९३७ ते १९५१ या मुदतीत मुंबई राज्य कायदे काउन्सिलवर निवडून जाण्याची संधी मिळाली.

     कायदे काउन्सिलचे सभासद असताना महाजनींनी शैक्षणिक हिताचे अनेक ठराव मांडून शिक्षणाला योग्य वळण लावण्याचे प्रयत्न केले. विशेषत: वैद्यकीय पदवी मिळाल्यावर डॉक्टरांना खेड्यात पाठवून तेथे वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असा त्यांपैकी एक ठराव होता. तसेच वेळोवेळी त्यांनी ग्रमीण भागातील शिक्षण, उद्योगधंदे, राहणीमान यांकडे सभेचे लक्ष वेधले. प्रौढ मंडळींचे प्रबोधन करण्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे बहि:शाल व्याख्यानमाला सुरू करण्याचा तेव्हा त्यांनी एक अभिनव मार्ग सुचविला होता.

     प्राचार्यपदावरून निवृत्त झाल्यावर महाजनींनी गणिताचे अध्यापन जवळजवळ थांबविले. तरी रँग्लर परांजपे यांच्याप्रमाणेच निवृत्तीनंतर त्यांच्याकडे जी बरीच मानाची पदे चालून आली, त्या पदांवरून त्यांचे शैक्षणिक कार्य मात्र चालू राहिले.

     निरनिराळ्या विद्यापीठांची कुलगुरुपदे भूषविण्याच्या त्यांना ज्या संधी मिळाल्या, त्यांपैकी राजस्थानात जयपूर येथे स्थापन होणाऱ्या विद्यापीठाची १९४७ सालापासून उभारणी करून महाजनींनी त्याची सर्वांगीण जोपासना केली. सहा वर्षांच्या (१९४७-१९५३) आपल्या कार्यकाळात त्यांनी तेथे जी भरीव कामगिरी केली, त्यामुळे पुढे भूमी अनुदान पद्धतीने उदयपूर येथे जेव्हा कृषिविद्यापीठ काढण्याचे ठरले, तेव्हा परत महाजनींनाच पाचारण करण्यात आले. शेतकी विषयांत तज्ज्ञ नसतानाही कारभाराविषयक पूर्वानुभवाच्या जोरावर महाजनींनी उदयपूरच्या विद्यापीठाची धुरा नऊ वर्षे (१९६३-१९७२) समर्थपणे सांभाळली. दरम्यान, १९५३ ते १९५७ या अवधीत ते दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू, तर १९५७ ते १९६३ या अवधीत ते केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सभासद होते आणि उदयपूरहून मोकळे झाल्यावर शेवटी १९७२ ते १९७५ अशी तीन वर्षे त्यांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले. अशा प्रकारे प्राचार्यपदावरून पायउतार झाल्यावर महाजनींनी उणीपुरी २८ वर्षे शैक्षणिक कार्य केले. जागोजागी मन लावून तर त्यांनी काम केलेच, पण तरुणांची शैक्षणिक पातळी उंचावण्यासाठी नवनव्या योजना अमलात आणण्यात ते सतत प्रयत्नशील राहिले. त्याशिवाय विद्यापीठ अनुदान मंडळ व भारत सरकारच्या शिक्षणखात्याचे सल्लागार, संरक्षण प्रबोधिनीची अभ्यासक्रम समिती व एन.सी.सी.ची पात्रता कसोटी समिती यांचे अध्यक्ष, भारतीय संरक्षण दलाचे मानद सदस्य, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात संरक्षण अधिकाऱ्यांच्या निवड समितीवर मुलकी सदस्य म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. तरुणांना इमर्जन्सी कमिशन घेऊन सैन्यात भरती होण्याचा ते वारंवार उपदेश करीत असत. दिल्ली विद्यापीठाच्या कार्यकाळात पंतप्रधान पं. नेहरू, डॉ. राजेंद्र  प्रसाद, डॉ. राधाकृष्णन यांच्यासारख्या उच्चपदस्थ राजकारणी पुरुषांशी त्यांचे कामानिमित्त संबंध आले, तर परिणामांची क्षिती न बाळगता, आय.सी.एस. अथवा आय.ए.एस. श्रेणीतील सनदी अधिकाऱ्यांना कायद्याच्या कलमावर बोट ठेवून त्यांनी निर्भीडपणे निर्णय ऐकवण्याचे धैर्य दाखविले होते.

प्रा. स. पां. देशपांडे

महाजनी, गणेश सखाराम