Skip to main content
x

म्हात्रे, गजानन बाबुराव

      जानन बाबुराव म्हणजेच जी.बी. म्हात्रे यांचा जन्म मुंबईतील गावदेवी येथे झाला. त्यांचे वास्तुकलेचे शिक्षण मुंबईच्या सर ज.जी. कला महाविद्यालयामध्ये झाले. त्या वेळी ब्रिटिशांच्या आधिपत्याखालील शैक्षणिक अभ्यासक्रम पाश्चिमात्य पद्धतीवर आधारित असे. जी.बी. यांना गुजरातमधील मुस्लीम वास्तुकलेच्या अभ्यासाची विशेष आवड होती. १९२७ साली पदविका घेतल्यानंतर ते इंग्लंडला पुढील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी गेले. तेथील शिक्षणाचा त्यांच्यावर बराच प्रभाव पडला. विदेशातील शिक्षणाकरिता त्यांना ‘वरळी गोपचार व भोये संस्थान’ या पाठारे क्षत्रिय ज्ञाती संस्थेकडून आर्थिक मदत मिळाली. परत आल्यावर त्यांनी त्या कर्जाची व्याजासकट परतफेड केली. संस्थेच्या अहवालात विद्यार्थ्यांनी परतफेड केल्याचे ते एकमेव उदाहरण असल्याचे गौरवपूर्ण नमूद केलेले आहे.

     इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असताना, उदरनिर्वाहाकरिता त्यांना इतरही कामे करावी लागली. ‘दी रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्चर’ची उच्च पदवी प्राप्त झाल्यावर ते १९३९ साली मुंबईत परत आले. त्या सुमारास, पुतेगर आणि बिलिमोरिया या पारशी अभियंत्यांचा प्रतिष्ठित व सधन समाजाशी संपर्क असल्याने त्यांना बरीच कामे मिळत. त्यांनी जी.बी.सारख्या तरुण प्रतिभावंताला हेरले. त्या सुमारास मरीन ड्राइव्ह, ओव्हल समोरील रेक्लमेशन, दादर-माटुंगा भागात इंप्रूव्हमेंट ट्रस्ट यांची उभारणी चालू असल्याने, त्या विभागातील अनेक इमारतींच्या संकल्पना जी.बी. यांच्या प्रतिभेतूनच तयार झाल्या होत्या, जरी पुतेगर व बिलिमोरिया या कंपनीच्या नावावर त्यांची नोंद होत असे. सर ज.जी.महाविद्यालयाच्या वास्तुरचना विभागाचे प्राध्यापक क्लॉड बॅटले जी.बीं.चे शिक्षक होते; ते जी.बीं.ना पडद्यामागील सूत्रधार म्हणत.

     पुढे त्यांनी स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय चालू केला व त्यांचे नाव व कौशल्य यांना यथोचित मान प्राप्त झाला. युरोपियन देशांत प्रचलित असलेल्या आर्ट डेको पद्धतीच्या वास्तुकलेचा व फ्रॅन्क लॉइट राइट यांच्या कामाचा त्यांच्यावर बराच प्रभाव पडलेला होता.

     १९३०-१९५० या दोन दशकांत बांधकामाला वेगळे स्वरूप व वेग आला. नवीन गृहनिर्माण संकल्पनेत शहराची वाढ व शहराची प्रतिमा यांवर विशेष भर देण्यात आला होता. आता एका प्लॉटवर एक बंगला ही संकल्पना जाऊन, एकापेक्षा जास्त कुटुंबांच्या राहण्याच्या कल्पनेला वेग आला होता. पूर्वीच्या दशकातील इमारतींपेक्षा जी.बी. यांच्या वास्तू डोळ्यांत भरण्याइतक्या वेगळ्या असल्याचे जाणवू लागले. मुंबईतील ओव्हल मैदानासमोरील अपार्टमेन्टमध्ये त्यांनी आर्ट डेको पद्धतीचा वापर फार कौशल्यपूर्ण केलेला आहे. तेथील इमारतींपैकी एक तृतीयांश इमारतींच्या संकल्पना त्यांच्या आहेत. त्यांतील उल्लेखनीय इमारती एम्प्रेस कोर्ट, मूनलाइट, सनलाइट, पामकोर्ट व क्वीन्स कोर्ट आहेत. त्यांची मांडणी, दर्शनी भागांवर केलेली कलाकुसर मुंबईत पहिल्यांदा आढळून आली. त्यांचे वेगळेपण लोकांचे लक्ष वेधू लागले. दर्शनी भागातील बाल्कनी, त्यांचे कठडे, त्यांतील लोखंडाच्या जाळीकामातील विविध प्रकार, खिडक्यांचे आकार, त्याचप्रमाणे संगमरवराचा प्रवेशद्वारात व जिन्यात केलेला कल्पक उपयोग हे सर्व जी.बी. अतिशय लक्षपूर्वक मांडू लागले. या त्यांच्या आर्ट डेको संकल्पनेचा स्वीकार होत राहिला याचे कारण, त्या संस्कृतीचा प्रभाव व ओळख; त्यामुळे त्यांना ते स्वागतार्हच वाटले व त्यांना प्रोत्साहनात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. त्यांची भूमिका आग्रही नव्हती; पण समकालीन वास्तववादी होती. आजही या इमारती विलोभनीय दिसतात व कालबाह्य वाटत नाहीत.

     मुंबईत त्यांच्या इमारती इतरही भागांत प्रामुख्याने नजरेस पडतात. पेडर रोडवरील ‘मार्बल आर्च’ ही इमारत त्यांच्या कामाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. कारमाइकल रोडवरील नॉरमंडी, शांग्रिला, वॉर्डन रोडवरील कुंकुम, फोर्टमधील पी.एम. रोडवरील जीवनप्रकाश, दादर-माटुंगा भागातील बडोदा हाउस व इतर इमारती, पश्चिम उपनगरात बाबुराव पटेल यांचा गिरनार बंगला, जुहूला डॉ. गज्जर व बी.के. शहांचा बंगला, प्रभादेवीला भोये संस्थेकरिता श्रीदत्त मंदिर, बंगळुरूमधील सिनेमागृहे, त्याचप्रमाणे बिकानेरमध्ये संस्थानिकांचा राजवाडा, अशा अनेक प्रकल्पांच्या संकल्पनेची मोठी यादी व्हावी, असे काम त्यांच्याकडून झाले.

     १९५५ साली, ‘दी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट’ या संस्थेच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना मिळाला. आपल्या कारकिर्दीत त्यांनी शहरातील कामाची वाढ व्हावी याकरिता अनेक उपाययोजना नगरपालिकेला सुचविल्या व विकास या विषयावर सुधारणा करण्यात पुढाकार घेतला. व्यवसायात ते अतिशय व्यग्र असतानासुद्धा ज्ञानदानाचे कार्य ते अनेक वर्षे करत राहिले. हातात ए.डब्ल्यू. फेबरची फोर बी पेन्सिल घेऊन जेव्हा ते विद्यार्थ्यांच्या रेखाटनांवर सुधारणा सुचवीत, तेव्हा नवीन काही पाहण्यास विद्यार्थी उत्सुक असत.

     साहेबासारखी ऐटीत घातलेली हंगेरियन फेल्ट हॅट, विलायती पद्धतीने शिवलेला उत्तम सूट, सहा फुटांपर्यंत पोहोचलेली उंच शरीरयष्टी असे त्यांचे प्रभावित करणारे व्यक्तिमत्त्व होते.

     त्यांच्या कामाचा वेग अचंबित करणारा होता. ते रेखाटन फलकावर काम करू लागले की त्यांचे रेखाटन अगदी पाहण्यासारखे, सुलभ व नावीन्यपूर्ण असे. मुंबई शहरातील होत असलेल्या विकासाने त्यांना वेधून टाकले होते. पूर्वीच्या दशकातील इमारतींपेक्षा त्यांच्या वास्तू डोळ्यांत भरण्याइतक्या वेगळ्या असल्याचे जाणवू लागले. जाणकार त्याची दखलही घेऊ लागले. पारंपरिकतेच्या आधारावर आधुनिकतेची वाटचाल करीत त्यांनी आपली स्वत:ची शैलीच निर्माण केली.

     त्यांनी मुंबई शहरातील वास्तुशिल्पकलेच्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केलेली आहे; पण त्याची फार अशी दखल घेण्यात आली नाही. या अपरिचित राहिलेल्या प्रतिभावंत वास्तुविशारदाविषयी समाजाला माहिती व्हावी व त्यांच्या कामाचे मूल्यमापन करणारे, शहराच्या वास्तुकलेवर त्यांचा प्रभाव नमूद करणारे असे एकमेव पुस्तक प्रकाशित झालेले आहे. मुंबईचा आसमंत आधुनिक वास्तुरेषांनी प्रभावित करणारा हा वास्तुशिल्पी होता.

चिंतामण गोखले

म्हात्रे, गजानन बाबुराव