Skip to main content
x

म्हात्रे,गणपत काशिनाथ

शिल्पकार

भारतातील परंपरागत शिल्प-कलेपेक्षा वेगळी अशी पाश्‍चिमात्य वास्तववादी शैली-तील व्यक्तीशिल्पे घडविणारे आधुनिक काळातील आद्य भारतीय शिल्पकार म्हणून गणपतराव म्हात्रे ज्ञात आहेत. स्मारकशिल्पांच्या क्षेत्रात पाश्‍चि-मात्य शिल्पकारांची मक्तेदारी मोडून आधुनिक भारतीय शिल्पकलेत नव्या युगाचा प्रारंभ करणारे शिल्पकार म्हणून गणपतराव म्हात्रे यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी १८९६ मध्ये विद्यार्थी असताना घडविलेल्या ‘मंदिरपथगामिनी’ या शिल्पाने त्यांना एवढी प्रसिद्धी मिळाली की चित्रकार राजा रवीवर्मांप्रमाणेच त्याकाळी म्हात्रे यांचे नाव शिल्पकार म्हणून देशभर गाजले.

गणपतराव म्हात्रे यांचा जन्म पुणे येथे, सोमवंशीय पाठारे (उरणकर) कुटुंबात झाला. वडील काशिनाथ केशवजी पुण्यातील लष्करी हिशेबखात्यात कारकून होते. काही वर्षांनी त्यांनी पुणे सोडून मुंबईत नोकरी स्वीकारली. ते  मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी खात्यात मोठ्या हुद्द्यावर होते. गिरगावमध्ये, मंगलवाडीत त्यांचे वास्तव्य होते. त्यांची आई हरहुन्नरी होती व कलाकुसरीच्या वस्तू त्या सुबक रीतीने करीत.

गणपतरावांचे चुलते व वडीलबंधू मातीच्या मूर्ती बनवीत असत. वडीलबंधू द्वारकानाथ यांचे चित्रकलेचेही शिक्षण झाले होेते. त्याकाळी गिरगावात प्रसिद्ध असलेल्या गणपतीवाल्या गोखल्यांच्या निरनिराळ्या स्वरूपातील गणपतीच्या मूर्तींचाही म्हात्रेंवर प्रभाव पडला. गणपतीवाले गोखले, काका व वडीलबंधूंकडून प्रेरणा मिळाल्याने गणपतराव आपल्या वयाच्या बाराव्या वर्षांपासूनच छोट्या-छोट्या मूर्ती बनवू लागले. विशेष म्हणजे बालवयातच त्यांनी आपल्या छोेट्या भावाचे व्यक्तिशिल्प घडविले होते. याशिवाय शालेय वयात म्हात्रेंना कलेप्रमाणे क्रिकेटचाही छंद होता व लहानपणी अनेक शालेय क्रिकेट  सामन्यांतून ते खेळत असत. कलेची ओढ पाहून वडील व मोठ्या बंधूंनी त्यांना कलाशिक्षणासाठी प्रोत्साहित केले. शिक्षणात विशेष रस नसल्याने कलाशिक्षणासाठी १८९१ साली वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये पेंटिंग विभागात प्रवेश घेतला.

गणपतरावांना शिल्प घडविण्याची आवड असली तरी त्याकाळी जे.जे.तील पेंटिंग विभागाचा नावलौकिक जास्त असल्यामुळे व त्याकाळी शिल्पकला विभागात शिक्षक नसल्याने त्यांना पेंटिंग विभागातच प्रवेश घ्यावा लागला. या काळात त्यांनी उत्तमोत्तम व पुरस्कारप्राप्त चित्रे रंगवली.

चित्रकला विभागात अंतिम वर्षात शिकत असताना त्यांनी आपल्या वयाच्या एकोणिसाव्या वर्षी, १८९५ मध्ये पाश्‍चात्य व भारतीय कलातज्ज्ञांना अवाक करणारे ‘मंदिरपथगामिनी’ (टू द टेम्पल) हे मराठमोळ्या तरुणीचे शिल्प रचले. त्याची कथा पुढीलप्रमाणे... पेंटिंगच्या वर्गात शेवटच्या वर्षाला शिकत असताना म्हात्रे बरेच दिवस गैरहजर राहिले. या काळात ते त्यांचे गाजलेले ‘मंदिरपथगामिनी’ हे शिल्प घडवीत होते. त्यामुळे तत्कालीन प्राचार्य ग्रीनवुड यांनी गैरहजर राहण्याचे कारण विचारले. ही संधी मिळताच म्हात्रे यांनी दुसर्‍या दिवशी प्राचार्य ग्रीनवुड यांना वर्गात आमंत्रित केले. महाविद्यालयात गैरहजर राहून तयार केलेले हे शिल्प वर्गात अशाप्रकारे ठेवले की ग्रीनवुड येताच त्यांची नजर त्या शिल्पावर पडावी. ग्रीनवुड ते शिल्प बघताच आश्‍चर्यचकित झाले व उद्गारले, ‘‘शिल्पकलेचा अभ्यास न करता असे शिल्प तू तयार कसे केलेस!’’

म्हात्रेंच्या या अप्रतिम शिल्पाने कला जगतात त्याकाळी प्रचंड खळबळ उडाली. १८९६ च्या बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात (ते प्रदर्शित होऊन) त्याला रौप्यपदक मिळाले. १३ फेब्रुवारी १८९६च्या टाइम्स ऑफ इंडियाने म्हात्रेंच्या या शिल्पाचा ‘‘जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या जी. के. म्हात्रे नामक एका तरुण हिंदू मनुष्याने केलेले हे अलौकिक कार्य आहे. कोणास शंका असल्यास नाझरेथमधून बाहेर पडणार्‍या एखाद्या प्रेषिताला ‘मंदिरपथगामिनी’ हे शिल्प जाऊन पाहण्यास सांगा. भारतात केले गेलेले हे एक सर्वांगसुंदर शिल्प आहे.’’ असा गौरव केला. चित्रकार राजा रविवर्मा यांनी अभिप्राय व्यक्त केला की एतद्देशीय मनुष्याने निर्मिलेले असे माझ्या पाहण्यात आलेले हे सर्वांत मनोहर शिल्प आहे.

‘मंदिरपथगामिनी’ या शिल्पात एक मराठी युवती पूजासाहित्य घेऊन मंदिराकडे निघाली आहे. तिचा तारुण्यसुलभ लवचिक बांधा, नऊवारी साडी नेसण्याची मराठी धाटणी, तिच्या संथगतीने चालल्यामुळे होणारी साडीच्या घड्यांची हालचाल, नितंबावर सोडलेला कासोट्याचा झोळ, अंगासरशी असलेली चोळी या सर्वांतून या युवतीचे सौंदर्य व्यक्त होते. डाव्या पायावर तोल सांभाळून, उजवा पाय अलगदपणे जमिनीवर टेकवून चालण्याची संथगती दाखविणार्‍या पावलांची योजना व त्या अनुषंगाने तिच्या डौलदार हाताचीही हालचाल बघत राहावी अशीच आहे. उजव्या हातात नाजूक बोटांनी पकडलेले फुलपात्र व डाव्या हातातील पूजेची थाळी आणि तोंडावरचे स्निग्ध व शांत भाव लक्ष वेधून घेतात. शिल्पाच्या पुढूनच नव्हे तर मागून व बाजूनेही ते विलक्षण अनुभव देते. याच दरम्यान म्हात्रे यांचा विवाह उरणच्या सरस्वती म्हात्रे यांच्याशी झाला. या दांपत्त्याला एकूण तीन मुले व तीन मुली होत्या.

त्याकाळी वाढत्या खर्चामुळे सर जे.जे. स्कूल ऑफ  आर्ट बंद करावे अशी सूचना केली गेली होती. ग्रीनवुड यांनी, म्हात्रे या आपल्या विद्यार्थ्याच्या शिल्पाच्या होत असलेल्या गौरवाचा संस्थेसाठी फायदा करून घेण्याचा निर्णय घेतला. त्याचाच एक भाग म्हणून ‘टाइम्स ऑफ इंडिया’त म्हात्रे यांच्या शिल्पकलेबद्दल एक लेख लिहिला. त्यावर सर जॉर्ज बर्डवूड या प्रख्यात कला अभ्यासकाने लंडनहून पत्र लिहून ग्रीनवुड यांची विधाने खोडून काढली. पण ग्रीनवुड स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी म्हात्रेंच्या शिल्पाची विविध कोनातून छायाचित्रे काढली व बर्डवूड यांना पाठवली. बर्डवूड यांना ती छायाचित्रे मिळताच ते भारावले. त्यांना हे प्लास्टर ऑफ पॅरिसमधील शिल्प संगमरवरातील असावे असे वाटले. त्यांनी २६ नोव्हेंबर १८९६ च्या बॉम्बे गॅझेट या वृत्तपत्रात लेख लिहून या शिल्पाची प्रशंसा केली. परंतु या लेखात असलेल्या काही चुका ग्रीनवुड यांनी दाखविल्या व हा लेख ५ डिसेंबर १८९६च्या बॉम्बे गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाला. त्याला बर्डवूड यांनी उत्तर दिले. यानंतर मद्रास येथील कलाशिक्षक आर.एफ. चिज्लहोम यांनी ‘पायोनियर मेल’ या वृत्तपत्रात ३१ डिसेंबर १८९६च्या अंकात ‘अ‍ॅन आर्ट क्रिटीक अ‍ॅस्ट्रे’ हा लेख लिहून बर्डवूड यांच्या विचारसरणीचे वाभाडे काढले. त्याला पुन्हा बर्डवूड यांनी उत्तर दिले. जानेवारी १८९८च्या लंडन येथून प्रसिद्ध होणार्‍या ‘जर्नल ऑफ इंडियन आर्ट अँड इंडस्ट्री’मध्ये त्यांचा हा लेख प्रसिद्ध झाला. त्यात या शिल्पाची प्रशंसा केली होती. ते लिहितात, ‘एका शब्दांत सांगायचे तर, ‘मंदिरपथगामिनी’ ही विद्यमान काळातील अत्युत्तम कलाकृती असून म्हात्रे यांनी ज्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे त्या कलेवर निसंदिग्ध प्रावीण्य प्राप्त करण्याचे हे अभिवचनच आहे. तंत्रदृष्टीने हे अप्रतिम आहे आणि माझी जरी पक्षपाती भूमिका असली तरी या भारतीय कलाकाराप्रती माझ्या मनात अत्यंत सहज सहानुभूतीचा भाव आहे. केवळ कलात्मक भावननेच मी हळवा बनतो असे माझे ठाम मत आहे. ज्यामध्ये कलाकाराने कलेतील सर्वंकष कुशलता, आपली उन्नत स्फूर्तीआणि प्राविण्य ओतले आहे अशी कलाकृती कोणी विद्यमान शिल्पकार निर्माण करू शकेल का? असा संदेह मला खरोखरच वाटतो. वास्तविकतेची जणू निसर्गदत्त अभिव्यक्ती तरुण कलाकार म्हात्रे यांच्या कामात आढळत असल्यामुळे हे ‘डिप्लोमा पीस’च समजले पाहिजे.’’

हा सर्व वाद ‘दि जर्नल ऑफ इंडियन आर्ट’मध्ये (खंड ८ क्र. ६१-६९ जानेवारी १९००) पुर्नमुद्रित झाला. तो वाचून स्कूल ऑफ आर्टचे भूतपूर्व प्राचार्य ग्रिफीथ्स यांनी लिहिले की, ‘हिंदू भावना आणि उच्च दर्जाची पाश्‍चात्त्य तंत्रशैली यांचा संगमच ‘मंदिरपथ-गामिनी’ शिल्पात आढळतो. या तरुण कलाकाराचे ‘ग्रीक’ शैलीचे स्फुरण या स्कूलमध्ये असलेल्या पुरातन संग्रहाशी त्याचे तादात्म्य पावल्यामुळेच जागले आहे.’

म्हात्रे यांच्याबद्दल लंडनमधील प्रतिष्ठित मॅगेझीन ऑफ आर्टमध्ये लेख छापून आला. सदर लेखात म्हात्रे यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याच्या आवाहनासोबतच, पाश्‍चिमात्य कलेचा प्रभाव व त्यातून ब्रिटिश साम्राज्यात दृश्यकलेची प्रगती कशाप्रकारे होत आहे हे नमूद केले होते. म्हात्रे यांना पुढील शिक्षणासाठी युरोपमध्ये पाठविण्याचा विचार सुरू झाला होता. शासकीय तसेच खाजगी मदतीसाठी अनेक प्रयत्न १९०१ पर्यंत करण्यात आले. मुंबईतील टाइम्स ऑफ इंडिया (१८९६ व १८९९ मधील आवाहन) मुंबईच्या गव्हर्नरमार्फत व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांना १८९९ मध्ये पाठविलेले पत्र, ‘द ट्रिब्यून’ या लाहोरमधील राष्ट्रप्रेमी वृत्तपत्रात (मे १९००) व प्रभासी या बंगाली वृत्तपत्रात (१९०१) अशा वृत्तपत्रांतून आवाहनही करण्यात आले. परंतु हे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत.

दरम्यानच्या काळात म्हात्रेंना मेयो पदक १८९६ मध्ये देण्यात आले. याशिवाय या तरुण कलावंताची व्यावसायिक कामे करण्याच्या परवानगीसह जे.जे. स्कूल मध्ये शिल्पकला विभागात शिक्षक म्हणून खास नेमणूक केली गेली. या काळात ‘टू द टेम्पल’ या शिल्पाला मिळालेली प्रसिद्धी व त्यातून निर्माण झालेल्या वादामुळे रवींद्रनाथ टागोर प्रभावीत झाले व त्यांनी दोन लेख लिहिले. त्यातील एक ठाकूर परिवाराच्या (आषाढ १३०५ बंगाब्द) १८९८ च्या ‘भारती’ या मासिकात तर दुसरा मॉडर्न रिव्ह्यूकार रामानंद चट्टोपाध्याय यांच्या ‘प्रदीप’ या बंगाली मासिकाच्या (पौष १३०५/१८९८ च्या अंकात ‘मंदिराभिमुख’ या शीर्षकाने प्रसिद्ध झाला. या लेखात ते लिहितात, ‘बर्डवूड संपादित कला पत्रिकेत प्रकाशित म्हात्रे यांच्या ‘मंदिराभिमुख’ या शिल्पकृतीची दोन छायाचित्रे पुन:पुन्हा पाहूनही आमची तृप्ती होत नाही.

हे पाहता पाहता, आमची फार दिवसांची बुभुक्षित मनिषा घडीघडी सफल होऊन आम्हाला अचानक उमगले की, आम्ही भारतवासी एवढे दिवस आमच्या नारीरूपाचा जो आदर्श मूर्तिरूपाने पाहण्यास आसुसलो होतो, ज्या सौंदर्याची लक्ष्मीरूपाने, सरस्वतीरूपाने, अन्नपूर्णारूपाने आम्ही अंत:करणात प्रचिती घेत असू; परंतु कुणाही गुणी कलावंताने तिला आजवर आमच्या नजरेसमोर उभे केले नव्हते, ती प्रतिमा आता साकार झाली आहे. म्हात्रे निर्मित या मूर्तीचं चित्र पाहून वाटतं की, शुचिष्मती, भक्तिमती हिंदू स्त्री चिरकाल मंदिराकडे जात आली व चिरकाल मंदिराकडे जात राहिल. तीच ही अनाम, अजन्मा, अमर रमणी-तिच्यासमोर जणू एक नित्यतीर्थ अदृश्य देवालय, तिच्यामागे जणू एक अदृश्य नित्य गृहांगण. यात ग्रीक शिल्पकलेची छाया असून ते अनुकरण नाही, तर स्वीयकरण आहे. जे परकीय ते स्वकीय करणं, जे परदेशी ते स्वदेशी करणं, जे पुरातन ते नूतन करणं हेच खर्‍या प्रतिभेचं लक्षण आहे.’

‘चित्रकला आणि शिल्पकला यांची भाषा सर्वजनगम्य असते. त्यामुळे त्या कला संकुचित प्रादेशिक सीमा ओलांडून सहज जगाच्या अंगणात संचार करू शकतात. बंकिमचंद्रांना मराठी मंडळी अजूनही ‘आमचे बंकिमचंद्र म्हणून ओळखत नाहीत.’ परंतु म्हात्रे जर आपली स्वत:ची प्रतिभा अशाप्रकारे सुफळ संपूर्ण करण्यात यशस्वी ठरले तर ते आमचे म्हात्रे ठरतील.’

‘या मूर्तीचा दर्शनी भाग, बाजूचे भाग, पार्श्‍वभाग सार्‍यांचं यथातथ्यदर्शन घडवताना कल्पनेत किंचितही कसर राहून चालणार नाही याचा शिल्पकाराला ध्यास आहे. त्यानंतर अंगप्रत्यंग, वसन भूषण, केशकलाप, अंगुली, अवसान-सर्व मिळून मानवदेहाचा एक अपरूप स्वरमेळ, एक सौंदर्यसमतानता कल्पनेत रेखाटणे व त्यातून ती मूर्तीसारख्या जड माध्यम पदार्थात परिणतीस नेणे म्हणजे प्रतिभेचे इंद्रजालच की! डाव्या पायासह उजव्या पायाचा तोल, पदन्यासाशी देहन्यासाचा मेळ, डाव्या हाताशी उजव्या हाताचा ताळा, समस्त देहलता आणि मस्तक यांचा सहभाव हे सर्व कोमल कौशल्याने मेळवण्यातच देहसौंदर्याचा छन्दोबन्ध साठवलेला आहे. म्हात्रे निर्मित या प्रतिमेत अंगोपांगे, अलंकरण, नेसण, उभं राहण्याची ढब, ती लघुसुंदर भंगिमा यांच्या मध्यमबिंदूमधून ते अनघड, तरीही साधेसरळ संगीत नीरवपणे वरच्या दिशेकडे झंकारत जात असल्याचा भास होतो. एखादी निशीगंधाची शुभ्र उमललेली कळी ताठर छडीवर किंचित रेलून शांत शर्वरीत निमग्न नक्षत्रलोकी परिपूर्णतेची रागिणी प्रेरण करते त्याच प्रकारचा हे शिल्प प्रत्यय देते.’

म्हात्रेंच्या या शिल्पाने खरोखरीच इतिहास घडविला तरी गणपत काशिनाथ म्हात्रे हा मुंबईतील तरुण शिल्पकार उच्च कलाशिक्षणासाठी आर्थिक मदतीअभावी युरोपात जाऊ शकला नाही. त्याबद्दलची आपली भावना सर जार्ज बर्डवूड यांनी १८९९ मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत बंगालमधील तरुण चित्रकार शशी हेश यांचा परिचय करून देताना व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘श्री. म्हात्रे यांच्या रूपाने बॉम्बे स्कूल ऑफ आर्टनेदेखील सर्वाधिक अपेक्षा असलेल्या शिल्पकार दिला आहे.’’ त्यापुढे सर जार्ज बर्डवूड यांनी शशी हेश हे म्हात्रेपेंक्षा सुदैवी असल्याचे मत व्यक्त केले. परंतु वस्तुस्थिती हीच होती की बॉम्बे स्कूलचा हा तरुण मराठी कलावंत त्याकाळी उच्चशिक्षणासाठी आर्थिक मदतीअभावी युरोपात जाऊ शकला नाही. (त्यापूर्वी रुस्तुम सिओदिआ हे बॉम्बे स्कूलमधील एकमेव पारशी कलावंत इंग्लंडमधील रॉयल अकॅडमीत शिक्षण घेऊ शकले होते.) म्हात्रेंनी निराश न होता सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या शिल्पकला विभागात शिकवत असतानाच स्वत:ची शिल्पनिर्मितीही सुरू ठेवली. या काळात त्यांनी घडविलेले ‘सरस्वती’ हे शिल्प १९०० मध्ये एक्स्पोझिशन युनिव्हर्सल या जागतिक प्रदर्शनात प्रदर्शित झाले. नऊवारी लुगडे नेसलेली वीणावादन करणारी व डोक्यावर ब्रिटिश पद्धतीचा इंग्लंडच्या महाराणीसारखा मुगुट आणि पायापाशी डौलदार मोर असणारी ही सरस्वती तत्कालीन आंतरराष्ट्रीय परिक्षक समितीला आवडली व २८ ऑगस्ट १९०० या दिवशी म्हात्रेंना ‘कांस्य पदक व डिप्लोमा ऑफ ऑनर’ प्रदान केल्याचे कळविण्यात आले. त्यावर्षी जे.जे. स्कूलच्या वार्षिक संमेलनात तत्कालीन गव्हर्नरने या घटनेचा खास गौरव केला. ‘द मॅगेझीन ऑफ आर्ट’ने सरस्वती या शिल्पाचे छायाचित्र छापले. यानंतर म्हात्रे यांचे ‘पार्वती अ‍ॅज शबरी’ हे शिल्प १९०३ मध्ये झालेल्या ‘इंपीरियल दिल्ली दरबार’च्या निमित्ताने दिल्लीत झालेल्या प्रदर्शनात सर्वोच्च पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या पुस्तिकेत म्हात्रे यांच्या स्टुडिओचा ‘‘म्हात्रेज् स्टुडिओ रन ऑन द मोस्ट अ‍ॅप्रूव्हज युरोपियन लाइन्स’’ असा गौरव करण्यात आला होता. १९०५ मध्ये त्यांचे ‘आफ्टर द बाथ’ हे शिल्प बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात रौप्य पदकाचे मानकरी ठरले. १९०६ व १९०७ मध्ये कलकत्ता (कोलकाता) व सूरत येथील प्रदर्शनात त्यांच्या कलाकृतींना सुवर्णपदके मिळाली. अमेरिकेत शिकागो येथे भरलेल्या जागतिक कला प्रदर्शनातही त्यांच्या कलाकृती प्रदर्शित झाल्या.

१९०४ मध्ये म्हात्रे यांना अहमदाबादमधील व्हिक्टोरिया राणीच्या बसलेल्या पूर्णाकृती स्मारक शिल्पाचे पहिले काम मिळाले. हे काम मानवाकारापेक्षा मोठ्या आकाराचे (७ फुटाचे) होते. त्याचे प्लास्टरमधील मॉडेल १९०५ मधील बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात प्रदर्शित केले गेले. पण संगमरवरातील शिल्प हा तरुण शिल्पकार घडवू शकेल याची खात्री स्मारक समितीस न वाटल्यामुळे हे काम रेंगाळले. प्रत्यक्ष संगमरवरातील शिल्प १९१० मध्ये पूर्ण झाले. या शिल्पामुळे म्हात्रे यांची लोकप्रियता वाढली व त्यांना कोल्हापूर संस्थानाकडून ब्रिटिश राज्यकर्त्यांची व्यक्तिशिल्पे बनविण्याचे काम १९०४ मध्ये मिळाले. या सर्व शिल्पातील साधर्म्य, तांत्रिक कौशल्य व कलात्मक अभिव्यक्ती यामुळे हिंदुस्थानातील अनेक संस्थानिक, राजे-रजवाडे ब्रिटिश राज्यकर्ते व संस्थांकडून म्हात्रे यांच्या कामाची दखल घेतली जाऊ लागली. तत्पूर्वी ब्रिटिश अथवा युरोपियन शिल्पकारांकडूनच स्मारकशिल्पे करून घेण्याची प्रथा होती. म्हात्रे यांनी आपल्या कलागुणांनी परदेशी शिल्पकारांची मक्तेदारी संपुष्टात आणली. गुणवत्तेच्या बाबतीत भारतीय शिल्पकार तुल्यबळच नव्हे तर प्रसंगी सरस आहेत हे त्यांनी आपल्या शिल्पांमधून सिद्ध केले.

या दरम्यान प्रो. टी.के. गज्जर यांनी त्यांच्या गिरगावातील प्रयोगशाळेच्या प्रशस्त भागात या तरुण शिल्पकाराला स्टुडिओसाठी जागा दिली. त्याच दरम्यान मुंबई नगरपालिकेसाठी विश्‍वनाथ नारायण मंडलिक यांचे अर्ध व्यक्तिशिल्प खास विलायतेहून करून आणले होते. पण त्यात साधर्म्य नसल्याने ते स्मारक समितीस पसंत पडले नाही. अखेरीस एक प्रयोग म्हणून या तरुण शिल्पकारास त्याचे मातीतील मॉडेल करण्याची संधी दिली गेली व म्हात्र्यांनी ती उत्तम प्रकारे पार पाडली. या नंतर त्यांचे संगमरवरात रूपांतर करण्याचे काम तरुण शिल्पकाराला जमणार नाही असा निर्णय समितीने घेतला व म्हात्र्यांनी केलेल्या शिल्पावरून प्लास्टरमधील संगमरवरी दगडातील मूर्ती परदेशातून करून आणली. अशाच प्रकारचा अनुभव त्यांना सर पेटीट यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या वेळीही आला. त्यांची ही व्यथा कळल्यावर स्वदेशीचा पुरस्कार करणार्‍या ‘केसरी’ वृत्तपत्राने यावर एक अग्रलेख लिहिला. त्यात स्मारकशिल्पांची कामे निष्णात हिंदी शिल्पकारांकडून करून न घेता ती परदेशी शिल्पकारांना देण्याच्या परधार्जिण्या वृत्तीवर कडाडून टीका केली होती. अशी कामे निष्णात हिंदी शिल्पकारास देऊन परदेशी जाणारा पैसा वाचवावा असे आवाहनही त्यात केले होते. या सर्व प्रयत्नांना यश येऊन अहमदाबाद येथील म्हात्रे यांनी प्लास्टरमध्ये तयार केलेल्या व्हिक्टोरिया राणीच्या पूर्णाकृती पुतळ्याचे संगमरवरात रूपांतर करण्याचे काम म्हात्रेंना मिळाले व त्यांनी ते उत्तमरित्या पूर्ण केले. या कामाबद्दल ‘टाइम्स ऑफ इंडिया’ व ‘गुजरात पंच’ने गौरवोद्गार काढले.

यानंतर मात्र परदेशी कलावंतांना स्मारकशिल्पे देण्याऐवजी भारतीय शिल्पकारांकडे, विशेषत: म्हात्रे यांच्याकडे अनेक कामे येऊ लागली. डॉ. तैमूलजी नरीमन, नसरवानजी वाडिया, एच.जे. रूस्तुमजी यांचे अर्धपुतळे त्यांनी तयार केले. कोल्हापूरचा प्रिन्स शिवाजी यांचा अश्‍वारूढ पुतळाही त्यांनी तयार केला व तो ब्रॉन्झमध्ये यशस्वीरित्या ओतविला. आधुनिक भारतीय शिल्पकलेच्या इतिहासातील हे पहिलेच अश्‍वारूढ शिल्प होते. याकाळात त्यांचा स्टुडिओ गिरगाव चौपाटीच्या परिसरातील सँडहर्स्ट ब्रीजजवळ होता. परंतु येथे ब्रान्झ कास्टींगची फाउंड्री करण्यास परवानगी नसल्यामुळे पुढील काळात त्यांनी तो विलेपारले (पूर्व) येथे हलविला. पारले या पश्‍चिम उपनगरातील महंत रोडवर त्यांचे सरस्वती निवास नावाचे निवासस्थान व बाजूलाच स्टुडिओ व फाउंड्री होती. यानंतरच्या काळात त्यांनी ग्वाल्हेेरचे महाराज माधवराव शिंदे, राजा छत्रसाल (पन्ना), रतलाम व राजपिंपला येथील अधिपती व छत्रपती शिवाजी महाराज असे एकूण सात अश्‍वारूढ पुतळे तयार केले व ब्रॉन्झमध्ये स्वत:च्या स्टुडिओत ओतविले. यासाठी ते विशेष प्रयत्नपूर्वक ‘ब्रॉन्झ कास्टींग’चे तंत्र शिकले. म्हात्रे यांनी आयुष्यात अंदाजे ८ अश्‍वारूढ पुतळे, ६२ पूर्णाकृती पुतळे व २६० व्यक्तीशिल्पे केल्याची नोंद आहे. तेहरान येथील कवी फिर्दोसी यांचे शिल्पही म्हात्रे यांनी घडविले. या शिवाय ‘टू द टेंपल’, ‘सरस्वती’, ‘शबरी अ‍ॅज पार्वती’, ‘आफ्टर द बाथ’, ‘आर्ट ऑफ द नीडल वर्क’, ‘बैरागी’, अशी स्वान्तसुखाय केलेली शिल्पे आणि श्रीराम, दत्तात्रेय, गणपती अशा देवदेवतांच्याही अनेक मूर्ती त्यांनी घडविल्या. ग्वाल्हेर संस्थानसाठी संंस्थापक महादजी शिंदे व इतरांची त्यांनी तयार केलेली संगमरवरी दगडातील आठ शिल्पे हे त्यांच्या संगमरवरासारख्या नाजूक दगडातील शिल्पकौशल्याची साक्ष देतात. यातील महादजी शिंदे यांचे बसलेले शिल्प तर काळ्या संगमरवरी दगडात आहे. त्या काळात असे शिल्प हा हिंदुस्थानात आगळा प्रयोग होता. ब्रिटिश राजवटीत अनेक संस्थानिकांसाठी तसेच ब्रिटिश राजवटीसाठी त्यांनी राजे, राण्या, तसेच गव्हर्नर व अत्युच्च अधिकार्‍यांची अनेक शिल्पे घडविली. त्यांनी केलेला मुंबईतील अपोलो बंदर येथील पंचम जॉर्जचा पुतळा व अहमदाबादचा व्हिक्टोरिया राणीचा पुतळा अशी अनेक शिल्पे स्वातंत्र्योत्तर काळात हलविण्यात आली व विस्मृतीत गेली. परंतु त्यांनी घडविलेली न्यायमूर्ती रानडे व गोपाळकृष्ण गोेखले यांची शिल्पे आजही मुंबईच्या चर्चगेट भागात लक्ष वेधून घेतात.  याशिवाय त्यांच्या अशा शिल्पांमधून भारतीय व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व, वेशभूषा, वस्त्रे व साधर्म्य भारतीय वैशिष्ट्यांसह साकार झाल्याचे दिसून येते. म्हैसूरचे राजे कृष्णराज वाडियार यांनी त्यांचे वडिल चामराजेंद्र वाडियार यांचा ब्रॉन्झमधील पूर्णाकृती पुतळा इंग्लंडमधील सुप्रसिद्ध शिल्पकाराकडून करून घेतला. त्या पुतळ्याचा चेहरा न आवडल्यामुळे अखेरीस त्यांनी गणपतराव म्हात्रेंना म्हैसूरला आमंत्रित करून त्यांच्याकडून आपल्या वडिलांचा चेहरा बनवून घेतला व त्या पुतळ्याचा मूळ चेहरा कापून त्या जागी लावला. या नंतर तो पुतळा सर्वांनाच पसंत पडला.

त्यांचा शरीरशास्त्राचा उत्तम अभ्यास होता आणि आपले शिल्प प्रमाणबद्ध व निर्दोष असावे असा त्यांचा ध्यास असे. शरीरावरील कपडे, त्यांचे विविध पोत, जाडी व शरीराच्या आकारानुसार पडणार्‍या चुण्या दाखविण्यात ते अत्यंत वाकबगार होते. हे सर्व करीत असताना पुतळ्याच्या कलात्मकतेकडे ते विशेष लक्ष देत. माती, प्लास्टर ऑफ पॅरीस, ब्रॉन्झ, संगमरवर अशी अनेक माध्यमे त्यांनी हाताळली. त्यांची शिल्पे पाश्‍चिमात्य आदर्श जपणारी आणि तंत्रदृष्ट्या निर्दोष असत. रविवर्मा यांच्याप्रमाणेच म्हात्रे यांनी शिल्पांकित केलेल्या व्यक्तिरेखा भारतीय असल्या तरी त्याचे प्रतिकात्मक आणि कथनात्मक संकेत पाश्‍चात्य आहेत. सरस्वतीच्या डोक्यावरील इंग्लंडच्या राणीसारखा मुगूट किंवा ‘पार्वती अ‍ॅज शबरी’ या शिल्पातील शरीराकृती पाहून ग्रीक शिल्पांचीच आठवण येते. तसेच तिच्या डोक्यातील फुलांची रचना व पुराणकालीन संस्कृतीशी विसंगत वाटणार्‍या पायातील चपला हे या प्रकारच्या वैचारिक प्रक्रियेचेच प्रतीक म्हणावे लागेल. काही शिल्पांचा अपवाद वगळता त्यांची कला प्रामुख्याने व्यावसायिक स्मारक शिल्पांच्या स्वरूपातच बहरली. म्हात्रे यांच्या अशा शिल्पांमधून पुढील काळातील तालीम, करमरकर व त्यानंतर मुंबई व महाराष्ट्रातील अनेक शिल्पकारांनी स्फूर्ती घेतली व त्यातूनच बॉम्बे स्कूल म्हणल्या जाणार्‍या कलापरंपरेत पाश्‍चिमात्य पद्धतीचा नयनमनोहर, प्रमाणबद्ध व शास्त्रशुद्ध वास्तववादी कलाविष्कार वाढीस लागला.  म्हात्रे यांचा इंग्रज सरकारने १९२९ मध्ये ‘रावबहादूर’ ही पदवी देऊन गौरव केला.

अत्यंत यशस्वी शिल्पकार म्हणून म्हात्रे आपले आयुष्य जगले. परंतु १९२६च्या दरम्यान पुण्याच्या भांबुर्ड्यातील पहिल्या शिवस्मारकाचे अर्थात अश्‍वारूढ शिवपुतळ्याचे काम ते वेळेत पूर्ण करू न शकल्यामुळे हे अत्यंत प्रतिष्ठेचे काम त्यांच्याकडून काढून घेतले गेले व त्यांच्यापेक्षा तरुण व उमेदीच्या करमरकरांकडे सोपविण्यात आले. या घटनेचा म्हात्रेंना धक्काच बसला. त्यानंतरही त्यांनी हे शिवाजी महाराजांचे अश्‍वारूढ शिल्प पूर्ण केले व सध्या ते बडोद्यात पाहावयास मिळते.

या प्रसंगानंतर म्हात्रेंच्या कला कारकीर्दीवर परिणाम झाला. तरीही ते पुढील वीस वर्षे कार्यरत होते. त्यांची राहणी अत्यंंत साधी होती. घरात व स्टुडिओत स्वच्छ सदरा आणि धोतर हा त्यांचा नित्याचा वेष असे. प्रकृतीने काहीसे स्थूल असूनही अखेरपर्यंत ते उंचावर चढून शिल्प घडवीत असत. शिल्पकामाचे वेळी ते अत्यंत कर्तव्यकठोर होत. विशेषत: धातूचे ओतकाम होत असताना ते स्वत: अत्यंत काळजी घेत व इतरांनीही घ्यावी यासाठी आग्रही असत. तहानभूक व वय विसरून जातीने हजर राहात व कामगारांना कडक शब्दांत सूचना देत. कोणी काही चूक केली तर संतापत व त्यावेळी त्यांचे करडे डोळे लाल होत.

सर्वसाधारणपणे ते लांब डगला, धोतर, गोल टोपी वापरत पण राजेमहाराजे यांना भेटायला जाताना बंद गळ्याची शेरवानी, खाली पँट, पंपशू व डोक्यावर लाल पागोटे असे. अत्यंंत निव्यर्सनी व कुटुंबवत्सल वृत्तीचे म्हात्रे कुटुंबातील सर्वांवर सढळ हाताने खर्च करीत. तरुण कलावंतांना प्रोत्साहन व प्रसंगी शिक्षणासाठी मदतही करीत. परदेशी जाऊन शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली पण त्यांनी करमरकरांसारख्या तरुण शिल्पकाराला या संदर्भात परदेशी जाऊन शिकण्यासाठी आर्थिक मदत केली होती. एवढेच नव्हे तर त्यांचे चिरंजीव श्यामराव व त्यांचे जावई एन.के. गोरेगावकर व त्यांचे बंधू बी.के. गोरेगावकर यांनी युरोपात जाऊन शिक्षण घ्यावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधील शिक्षकाचे काम सोडल्यावर अतिथी प्राध्यापक (व्हिजिटींग प्रोफेसर) म्हणून ते बरीच वर्षे जे.जे. स्कूलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत. याशिवाय बॉम्बे आर्ट सोसायटी व आर्ट सोसायटी ऑफ इंडियाशी त्यांचा संबंध होता.

३० एप्रिल १९४७ रोजी वयाच्या एक्काहत्तराव्या वर्षी  म्हात्रे यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या पार्ल्याच्या घराजवळच असलेल्या फाउंड्रीत रतलामच्या महाराजांच्या अश्‍वारूढ शिल्पाचे ओतकाम सुरू होते.

गणपतराव म्हात्रेंच्या पश्‍चात त्यांचा स्टुडिओ चिरंजीव श्यामराव गणपत म्हात्रे (४ एप्रिल १९०३-१३ डिसेंबर १९७६) यांनी सुरू ठेवला. श्यामराव म्हात्रे हे गणपतराव म्हात्रेंचे ज्येष्ठ चिरंजीव. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचा शिल्पकलेकडे ओढा होता. मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधील शिल्पकलेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर   त्यांनी फ्रान्समध्ये जाऊन शिल्पकलेचे व ब्रॉन्झ कास्टींगचे शिक्षण घेतले. विलेपार्ले येथील म्हात्रेंच्या स्टुडिओशेजारीच ब्रॉन्झ कास्टींगची फाउंड्री उभारली व म्हात्रे यांच्या हयातीत त्यांच्या पुतळ्याचे कास्टींग उत्कृष्ट प्रकारे केले. याशिवाय त्यांनी बिकानेर, जोधपूर, रेवा येथील महाराज व राणाप्रताप यांचे अश्‍वारूढ पुतळे तयार केले. त्यांनी संत गाडगेबाबा, सावता माळी व माता आनंदमयी यांंचे पूर्णाकृती पुतळे केले. त्यांनी स्वान्तसुखाय केलेले ‘भीम’, ‘डान्सर’, ‘टू द वेल’ ही शिल्पे देशातील विविध प्रदर्शनात बक्षीसपात्र ठरली. त्यातील ‘डान्सर’ या शिल्पाला १९२६ मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले. त्यांची पत्नी शांता यादेखील कास्टींगच्या कामावर देखरेख करीत असत. याशिवाय श्यामराव म्हात्रे यांनी केलेली लोकमान्य टिळक, सर नेस वाडिया, गांधीजी अशी शिल्पे विविध संस्थात लागली आहेत. श्यामराव म्हात्रेंच्या पश्‍चात शशिकांत म्हात्रे यांनी फाउंड्री सुरू ठेवली व ती अंदाजे १९८० पर्यंत कार्यरत होती. परंतु शिल्पकलेच्या क्षेत्रात त्यांचा वारसा पुढे चालू राहिला नाही व दुर्दैवाने म्हात्रे यांची स्टुडिओतील शिल्पसंपदाही जागांच्या वाढत्या किंमतीपायी तोडून टाकली गेली व नष्ट झाली.

- प्रा. विठ्ठल शानभाग, सुहास बहुळकर
 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].