Skip to main content
x

मिरानी, नारायण विशनदास

         नारायण मिरानी हे मूळचे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील. फाळणीनंतर ते मुंबईमध्ये स्थायिक झाले. १९५५ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी (बी.ई.सिव्हील) या विषयात सुवर्णपदक मिळवून पदवी घेतली. १९५५मध्ये त्यांनी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेची परीक्षा दिली. ही परीक्षा ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १९६२ ते ६८ या कालावधीत ते कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत होते. तर १९६८ ते ७६ या कालावधीत त्यांची नेमणूक वरिष्ठ अभियंता या पदावर करण्यात आली. १९७६ ते ८४ या कालावधीत मिरानी यांनी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता म्हणूनही जबाबदारी पार पाडली.

         नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्यात वाहतूक जलद आणि सुलभ व्हावी या उद्देशाने करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बांधकाम प्रकल्पांच्या उभारणीमध्ये मिरानी यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. यामध्ये ठाणे खाडीवरील पूल, बॉम्बे ट्रान्स हार्बर लिंक, बांद्रा-कुर्ला संकुल, इस्ट अ‍ॅण्ड वेस्ट आयलँड फ्री वे, मलबार हील बोगदा, कशेळी खाडीदरम्यानचा बोगदा, तसेच जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्रभर बांधण्यात आलेले रस्ते या सर्व बांधकाम प्रकल्पांचा समावेश आहे.

         महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला चालना देणाऱ्या या प्रकल्पांचा आराखडा तयार करणे, त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे या कामी मिरानी यांनी आपले अभियांत्रिकी आणि व्यवस्थापकीय कौशल्य पणाला लावले. १९८२ ते १९८६ या कालावधीत ते महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाचे संचालक होते. याच कालवधीत त्यांनी बोर्ड ऑफ टेक्निकल एक्सामची जबाबदारीही सांभाळली, तर १९८४ ते १९८९ या कालावधीत मिरानी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव होते.

         १९८९ मध्ये त्यांना  भारतीय चरित्रकोश मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या चिन्मुळगुंद विशेष प्रशासकीय तंत्रज्ञ पुरस्काराने गौरवण्यात आले. याच वर्षी ते इंडियन रोड काँग्रेसचे अध्यक्षही होते. सार्वजनिक बांधकाम विभागातील एकूण पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीत मिरानी यांनी सार्वजनिक बांधकामासंबंधातील विविध समित्यांवर मार्गदर्शक म्हणूनही काम पाहिले. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या मार्गदर्शक समितीचे ते सदस्य सचिव होते.जे.आर.डी.टाटा या समितीचे अध्यक्ष होते.

          सहाव्या पंचवार्षिक योजनेतील केंद्र सरकारच्या राज्य रस्तेबांधकामाचा आराखडा तयार करणाऱ्या समितीचे ते अध्यक्ष होते. तर आठव्या पंचवार्षिक योजनेच्या रस्ते आराखडा समितीचे सदस्य सचिव म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांतील सार्वजनिक बांधकामासंबंधातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले.

         इंडियन रोड काँग्रेसच्या जर्नल्समध्ये मिरानी यांचे चौपन्न संशोधन प्रकल्प सादर केले आहेत.यातील अनेक प्रबंधांना पुरस्कार प्रदान करण्यात आले असून विशेष प्रमाणपत्रेही मिळाली आहेत. १९८९ मध्ये मिरानी यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्वोच्च पदी म्हणजेच प्रधान सचिव या पदावर करण्यात आली. याच पदावरून ते १९९१ मध्ये निवृत्त झाले.मिरानी यांना इंडियन कॉन्क्रीट इन्स्टीट्यूटच्या लाइफ टाईम अचिव्हमेंट अ‍ॅवॉर्ड तसेच इन्स्टीट्यूट ऑफ इंजिनिअर्स या संस्थेच्या विशेष सेवा पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.

         निवृत्ती नंतरही मिरानी यांनी शासनाच्या विविध समित्यांवर सल्लागार म्हणून काम केले. बेंगलोर मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथोरीटीचे तांत्रिक सल्लागार म्हणून त्यांनी १९९१ ते ९५ या कालावधीत काम केले. याच काळात ते सिडकोचे संचालक देखील होते. मुंबईतील मल्टीप्लेक्स मधील आपत्कालीन नियंत्रण समितीच्या तज्ज्ञ समितीचे ते अध्यक्ष होते. मिरानी सध्या मुंबई( वरळी) येथे स्थायिक झाले आहेत.

- संध्या लिमये

मिरानी, नारायण विशनदास