Skip to main content
x

मिराशी, वासुदेव विष्णू

     वासुदेव विष्णू मिराशी यांचा जन्म कोकणात झाला. त्यांचे शिक्षण पश्चिम महाराष्ट्रात झाले, तर विदर्भ ही त्यांची कर्मभूमी राहिली. त्यांनी केलेल्या कामासाठी १९४१ साली त्यांना ‘महामहोपाध्याय’ अशी पदवी भारत सरकारने दिली, तर सागर, नागपूर व मुंबई विद्यापीठ यांच्या वतीने त्यांना डी.लिट. ही पदवी प्रदान करण्यात आली. सन १९७१मध्ये शासनाने ‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला व साहित्य अकादमीची फेलोशिप त्यांना मिळाली.

     मुंबई येथे एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी जून १९१७मध्ये नोकरी स्वीकारली. त्यांची ज्ञानसाधना आयुष्यभर कायम राहिली. शिस्तप्रिय शिक्षक, प्राच्यविद्येचे अभ्यासक, प्रकांड पंडित व मराठी भाषेतील प्रगल्भ लेखक, संशोधक अशा विविध अंगांनी त्यांची ओळख करून देता येते. रावबहादुर का.ना. दीक्षित आणि रावबहादुर हीरालाल यांच्या प्रेरणेने मिराशी पुराभिलेख आणि प्राचीन नाणकशास्त्र यांच्या अभ्यासाकडे वळले. संस्कृत वाङ्मयाविषयी त्यांचा ओढा कायम होता. तसेच त्यांनी एल्एल.बी. पदवीही प्राप्त केली होती. १९१८ साली त्यांंनी सदानंद यतींच्या ‘अद्वैत ब्रह्मसिद्धी’ या ग्रंथांचे इंग्लिश भाषांतर केले. यासाठी त्यांना ‘वेदान्ती’ असे संबोधले गेले. ‘धर्मसूत्रे आणि स्मृती यांचा परस्परसंबंध आणि त्यातून प्रतीत होणारा हिंदू विधीं (ङरुी)चा विकास’ या त्यांच्या प्रबंधाला मुंबई विद्यापीठाचे मंडलिक सुवर्णपदक मिळाले. या ग्रंथात त्यांच्या विवेचक बुद्धीचे आणि संशोधनाला आवश्यक असणारे भान स्पष्ट झाले. त्यांचा सर्वांत गाजलेला ग्रंथ कालिदासावर असून तो १९३४ साली प्रसिद्ध झाला. या ग्रंथाची अनेक भाषांतरे झाली. हा ग्रंथ प्रथम त्यांनी मराठीत लिहिला. इंग्लिशमध्ये सुमारे २५०, मराठीत अंदाजे १५० लेख त्यांनी प्रकाशित केले. संशोधन मुक्तावलीचे ‘दहा सर’ त्यांच्या लेखनाचे सातत्य सिद्ध करण्यास पुरेसे आहेत. ‘दशकुमारचरित’, ‘हर्षचरित’, ‘लघुकौमुदी’, कालिदास व भवभूती, त्यांचे जीवन व वाङ्मय यांवर त्यांनी केलेले लेखन तसेच ‘हालाची गाथा सप्तशती’ आणि तिचा काळ व स्वरूप, गॅझेटिअर विभागाच्या वतीने प्रकाशित होणार्‍या नागपूर, अमरावती व अन्य जिल्हा गॅझेटिअरमधून त्यांनी लेखन केले. ‘हिस्टरी एन्शंन्ट पिरिअड’ (सन १९६७) या राज्य गॅझेटिअरचे संपादन करण्यासाठी सेतुमाधवराव पगडी यांनी त्यांना सांगितले होते. विविध परिषदांमधून दिलेली अध्यक्षीय भाषणे व प्राकृत वाङ्मयावरील लेखन यांवरून त्यांच्या संशोधनाचा आवाका लक्षात येतो. त्यांच्या लेखांचे एकत्रित प्रकाशन ‘स्टडीज इन इन्डोलॉजी’ या मालिकेत केले. ‘कॉर्पस इन्स्क्रिपशन्स इंडिकॅरम’ (र्उिीिीी खिीलीळिींळििी खविळलर्रीीीा) या मालिकेचे आजपर्यंत सहा खंड प्रकाशित झाले असून तीन खंड मिराशी यांनी संपादित केले आहे.

     - ढहश र्उिीिीी खिीलीळिींळििी खविळलर्रीीीा, तश्रि खत, खिीलीळिींळििी घरश्रलर्हीीळ-उहशवळ-शीर

     - तश्रि त खिीलीळिींळििी षि ींहश तरज्ञरींरज्ञर.

     - तश्रि तख खिीलीळिींळििी षि डहळश्ररहरीर

     आणि - कळीीिीूं रवि खिीलीळिींळििी षि ींहश डर्रीींंरहररिी रवि थशीींशीि घीहरीींररिी (साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई) यातून त्यांनी कळचुरीचेदी, वाकाटक, शिलाहार व सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप या राजवंशांविषयी तपशील, स्थलनिश्चिती, कालनिश्चिती, व या काळात निर्माण झालेल्या साहित्य, कला व शिल्प यांविषयी माहिती दिली असून तत्कालीन समाजजीवनाचाही वेध घेतला आहे.

     रामटेक आणि मेघदूतातील रामगिरी यांचा समन्वय घालण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न व रामटेक व रामगिरीवरील लेखन बरेच चर्चेत राहिले. चतुरस्र बुद्धिमत्तेचा हा विद्वान बोलण्याचालण्यात अतिशय काटेकोर असे. मिराशींचे अनेकांशी बौद्धिक वाद झाले. त्यात केतकर, डॉ. दिनेशचंद्र सरकार, दु.आ. तिवारी, म.म. कृष्णशास्त्री धुले, शिवरामपंत बारलिंगे, अ.ज. करंदीकर, प्रा. कृ.मो. शेंबवणेकर अशी अनेक नावे घेता येतील. आपल्या मतांचा आग्रह असला तरी व्यक्तिगत कटुता ते येऊ देत नसत. डॉ. हरिहर ठोसर यांनी सुप्रतिष्ठान हे सातवाहनांचे राजधानी असलेले पैठण आहे, या संदर्भात मिराशींचा प्रतिवाद केल्याचे दिसते. मिराशी शक्यतो आपल्या मतावर ठाम असत; पण योग्य पुरावा सादर केल्यास त्या मताचा ते आदर करत. विदर्भावर त्यांचे विशेष लक्ष असे, तरी एकूण महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भात त्यांनी केलेले काम चिरस्मरणीय आहे. त्यांची भाषा भारदस्त आणि प्रौढ होती. रामगिरीवरील आपल्या संशोधनात ते म्हणतात, ‘‘प्राचीन वाङ्मयाचे संशोधन करताना केवळ कल्पनाशक्तीने भागत नाही. त्याकरिता संस्कृत व्याकरण, अलंकारशास्त्र, शिल्पशास्त्राचे ज्ञान आवश्यक असते. विशेषत: आपली चूक दाखवून दिल्यास तो मान्य करण्याचा प्रांजळपणा असावा लागतो. (संशोधन मुक्तावलि सर चौथा, पृष्ठ ३९) अर्थात विरोधकांचा खुमासदार उपासहाससुद्धा ते करीत. वाकाटकांच्या संदर्भात त्यांनी केलेले संशोधन व रामटेक येथील ‘रामगिरीस्वामिन: पादमूलात्’ या नोंदीच्या आधारे त्यांनी दिलेले स्पष्टीकरण ‘रामगिरीस्वामिन् म्हणजे प्रभु रामचंद्र’ असे स्पष्ट करून पादुकांची प्रचलित असलेली पूजा स्पष्ट केली. रामटेक येथील डॉ. अ.प्र. जामखेडकर यांनी केलेल्या संशोधनातून मिराशींचे मूलगामी संशोधन व वाकाटक राजवंशाविषयीचे त्यांचे मत अधिकच स्पष्ट झाले. प्रभावती गुप्ताचा शिलालेख केवल नरसिंह मंदिरात मिळाला. शिवाय त्रिविक्रम मंदिर, वराह मंडप यांबरोबर केवल नरसिंह मंदिर, गुप्तराम मंदिर या वास्तू रामटेक येथे असल्याचे स्पष्ट झाले. कालिदासाच्या मेघदूताच्या संदर्भात त्यांचा अभ्यास, त्यासाठी त्यांनी अभिलेखीय पुरावे, स्थानपोथी, बखरी, स्थलमाहात्म्य यांचा एकत्रित केलेला अभ्यास त्यांच्या संशोधनाची साक्ष देतो. त्यांनी रामायणातील काही स्थलांची निश्चिती करण्याचे असेच कार्य केले. पां.वा. काणे यांचा धर्मशास्त्राचा इतिहास, गुप्त राजवंशाचे ताम्रपट, काव्यमीमांसा हा ग्रंथ, पुराणे, ज्ञानेश्वरी, नेवासा येथील उत्खनन वृत्तान्त, भवभूती व बाण यांचे वाङ्मयीन पुरावे देऊन अगस्त्याश्रम नेवाश्यापासून जवळच मुळा नदीच्या काठी होता, असे स्पष्ट केले. आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ ते कितीतरी व्यापक पुरावे मांडत.

     ‘सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास व कोरीव लेख’ हा ग्रंथ त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या काळात १९७९मध्ये लिहिला व सातवाहन हे मूळ महाराष्ट्रातील होते व त्यांची मूळ राजधानी जुन्नर येथे असावी व नंतर ते प्रतिष्ठान येथे आले. महाराष्ट्रावर राज्य करणारा हा प्राचीन राजवंश होता. त्यांनी सुमारे ४५० वर्षे (इ.स.पू. २३० - इ.स. २३०) राज्य केले. मिराशींच्या एकूण कामातून महाराष्ट्राचा १५०० वर्षांचा इतिहास स्पष्ट झाला. महाराष्ट्र, वर्‍हाड व विदर्भ या शब्दांविषयीच्या उत्पत्तीचे त्यांचे भाष्यही लक्षणीय आहे. केवळ अभिलेखात नाही, तर नाणकशास्त्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय होते. १९६१ मध्ये भारतीय मुद्रा परिषदेने ‘नेल्सन रिट्’ हे पदक देऊन वासुदेव मिराशी यांचा गौरव केला.

     १९४१मध्ये त्यांनी अकोला जिल्ह्यातील तर्‍हाळा येथे सापडलेल्या सातवाहन नाण्यांच्या संचाचा अभ्यास केला व या संचातील नाणी अकरा राजांची असून कुंभ सातकर्णी व कर्ण सातकर्णी यांची नाणी प्रथमच सापडली. नाणकशास्त्रीय पुराव्यांच्या आधारे त्यांनी सातवाहन राजवंशाच्या पुराणातील नावांचा शोध घेतला. अभिलेखीय पुराव्याआधारे - विशेषत: नाणेघाट येथील नागानिकेचा शिलालेख व प्रतिमालेख यांतून त्यांचे मूळ महाराष्ट्र असल्याचे स्पष्ट केले. हैदराबाद राज्यातील कोंडापूर येथे सातवाहन राजांची नाणी सापडली. त्यात सातवाहन हे कुलनाम सातवाहन राजाच्या नावावरून पडल्याचे मिराशी यांनी स्पष्ट केले.

     याच प्रकारे डॉ. मिराशींनी वाकाटक राजा प्रवरसेनाच्या स्थलांतराची व राजधानी बदलाची चर्चा केली आहे. ही राजधानी नंदीवर्धनवरून पद्मपुरात स्थलांतरित झाल्याचे म्हटले. यासाठी तत्कालीन परिस्थितीचे अचूक विवेचन त्यांनी केले. प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे मांडताना त्यामागचा अभ्यास लक्षात येईल. गुणाढ्याविषयी नोंद असेल किंवा हालांच्या गाथासप्तशतीविषयक चर्चा; ते समकालीन पुराव्यांच्या आधारे करीत. कलचुरी, चेरी, सामंताचे कोरीव लेख या त्यांच्या कामामुळे एक नवीन संवत व राजवंशाची ओळख झाली. माझे जन्मस्थान कोकणात होते. तेथे राज्य करणार्‍या शिलाहार राजवंश आणि त्याची दुसरी शाखा जेथे माझे शिक्षण घेण्यासाठी मी अठरा वर्षे घालवली, त्या कोल्हापूर परिसरात होती, असे सांगत शिलाहाराच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांंनी कॉर्पस इन्स्क्रिपशन्स इंडिकरेम (खंड-६) संपादित केला. त्यातून स्वतंत्र मराठी ग्रंथाची सिद्धी केली.

     इ.स.च्या ९व्या शतकापासून १३व्या शतकापर्यंत ४५० वर्षे आधी मांडलिक म्हणून व नंतर स्वतंत्रपणे राज्य करणारा हा राजवंश ते स्वत:ला तगरपुराधीश्वर म्हणत. शिलाहारांच्या नावाची उत्पत्ती त्यांनी तर्कशुद्धपणे मांडली आहे. शिलाहारांच्या तिन्ही शाखा स्वत:ला विद्याधर जीमूतवाहन, ज्याने गरुडाच्या तावडीतून नागकुमारास स्वत:ची ढाल देऊन मुक्त केले, त्याच्या वंशातील मानतात. ‘शिलाहार’ (गरुडाकरिता शिलेवरील आहार म्हणजे शिलाहार) असे नाव या राजवंशास प्राप्त झाले. प्राच्यविद्येच्या दृष्टीने संस्कृत साहित्य व विविध राजवंशांचे अभिलेख यांतील मिराशींचे काम अनन्यसाधारण राहिले आहे.

     — डॉ. अरुणचंद्र पाठक

मिराशी, वासुदेव विष्णू