Skip to main content
x

मिशीगन, अॅन्थोनी, हेरॉल्ड एडवर्ड

     अ‍ॅन्थोनी हेरॉल्ड एडवर्ड मिशीगन यांचा जन्म महाराष्ट्रातील विजापूर येथे झाला. मिशिगन अ‍ॅन्थोनी हे मूळचे कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील होते. १० डिसेंबर १९४८ रोजी अ‍ॅन्थोनी हे सैन्यात दाखल झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली.

      १९७१ मध्ये पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात ब्रिगेडिअर मिशीगन यांची नेमणूक माऊंटन ब्रिगेडमध्ये करण्यात आली. पूर्वेकडील प्रांताच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली होती. यावेळी पाकिस्तानी सैनिकांनी उथली या तळावर हल्ला केला. तिन्ही बाजूने त्यांच्या तळाला रणगाड्यांनी घेरले होते. त्यावेळी या कठीण परिस्थितीमध्येही अ‍ॅन्थोनी यांनी कुठेही उतावीळपणा न दाखवता थंड डोक्याने या हल्ल्याचा स्वत: मुकाबला केला. त्यामुळे त्यांच्या दलातील इतर सैनिकांनाही लढण्याचे बळ प्राप्त झाले.

     नंतर त्यांनी दरसान या शत्रूच्या ठाण्यावर जोरदार आक्रमण केले. मिशीगन यांचे हे आक्रमण पाहूनच त्यांच्या तुकडीला प्रेरणा मिळाली. मग या तुकडीने निकराने हल्ला करून शत्रूकडील मशीनगन, तोफखाने उद्ध्वस्त करून निर्णायक विजय मिळवला.

     या काळात मिशीगन यांनी अत्युच्च व्यावसायिक कौशल्य दाखविले. त्याबद्दल त्यांना ‘महावीर चक्रा’ने सन्मानित करण्यात आले. नोकरीच्या पुढील काळात मेजर जनरल पदापर्यंत त्यांना बढती मिळाली.

- मानसी आपटे

मिशीगन, अॅन्थोनी, हेरॉल्ड एडवर्ड