Skip to main content
x

मिश्रा, शीला

      शीला मिश्रा यांचे शालेय व पदवीपर्यंतचे शिक्षण कॅनडामध्ये झाले. बर्नबेरीच्या सायमन फ्रेझर विद्यापीठातून बी.ए.ची पदवी घेतल्यानंतर पुणे येथील डेक्कन कॉलेजमधून प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व या विषयांत १९७८ मध्ये त्यांनी एम.ए. पदवी संपादन केली. त्यांना एम.ए. परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणार्‍या विद्यार्थ्याला दिले जाणारे तेलंग पदक मिळाले. त्यानंतर ‘भूगर्भपुरातत्त्व’ या विषयातील तज्ज्ञ प्रा. शरद राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी १९८५ मध्ये डॉक्टरेट संपादन केली. डॉक्टरेटसाठी शीला मिश्रा यांनी ‘अर्ली मॅन अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेन्ट्स इन वेस्टर्न मध्य प्रदेश’ हा विषय निवडला होता.

     शीला मिश्रा १९८४मध्ये डेक्कन कॉलेजात ‘संशोधन साहाय्यक’ या पदावर रुजू झाल्या. त्यानंतर १९८६ मध्ये त्या व्याख्याता झाल्या आणि २०१० मध्ये त्या प्राध्यापक झाल्या. २०१४ मध्ये त्यांची पुरातत्त्व विभागप्रमुख या पदावर नेमणूक झाली आणि त्या २०१५मध्ये निवृत्त झाल्या. त्यांचे ७५ शोधनिबंध विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. तसेच, त्यांनी जगभरातील अनेक देशांत झालेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सहभाग घेऊन ७४ शोधनिबंध सादर केले आहेत. शीला मिश्रांच्या मार्गदर्शनाखाली आठ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली आहेत.

     शीला मिश्रा यांचे बहुतेक संशोधन इतिहासपूर्व काळासंबंधी आहे. त्यांनी संशोधनाची सुरुवात मध्यप्रदेशातील मेहताखेडी उत्खननाने केली व दीर्घकाळ नर्मदा नदीच्या मध्यप्रदेशातील खोर्‍यात सर्वेक्षण, क्षेत्रीय अध्ययन व उत्खनन केलेे. त्यांनी त्यांच्या सहकार्‍यांसमवेत मध्यप्रदेशात खापरखेडा, करोंदिया व कसरावद या पुरातत्त्वीय स्थळांचे उत्खनन केले आहे. महाराष्ट्रातील पुरातत्त्वीय संशोधनाला शीला मिश्रा यांनी १९९५ मध्ये प्रारंभ केला. त्यांनी १९९५ ते १९९८ दरम्यान गोदावरी खोर्‍यातील पुरापर्यावरणासंबंधी प्रकल्प पूर्ण केला. शीला मिश्रा यांनी १९९४ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील आपेगाव येथे व सन १९९९ मध्ये बीड जिल्ह्यात साक्षाळ पिंपरी येथे उत्खनन केले. त्यांनी व त्यांचे सहकारी प्रा. भास्कर देवतारे यांनी मिळून सन २००१ मध्ये अमरावती जिल्ह्यात असलेल्या  कौडिण्यपूर या ऐतिहासिक स्थळाचे उत्खनन केले.

     आपल्या संशोधकीय कारकिर्दीच्या उत्तरार्धात शीला मिश्रा यांनी महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक कालखंडावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी व त्यांच्या सहकारी प्रा. सुषमा देव यांनी एकत्रितपणे पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे सन २००२ ते २००९ पर्यंत सातत्याने उत्खनन केले. या ठिकाणी प्राचीन मानवी अस्तित्वाचा मिळालेला पुरावा व त्यावरील निष्कर्ष हे भारतीय अश्मयुगीन पुरातत्त्वाला कलाटणी देणारे ठरले.

     प्रागैतिहासिक कालखंडामधील ‘अश्युलियन’ या सर्वांत प्राचीन संस्कृतीच्या भारतातील अध्ययनाला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देणे, अश्मयुगीन काळातील पर्यावरणासंबंधी कालमापनावर आधारित ठोस निष्कर्ष काढणे आणि भारतातील अश्मयुगाच्या कालक्रमासंबंधी नवीन सिद्धान्तकल्पना मांडणे हे शीला मिश्रा यांचे योगदान आहे.

डॉ. प्रमोद जोगळेकर

मिश्रा, शीला