Skip to main content
x

मित्र, काशीनाथ रघुनाथ

काशीनाथ रघुनाथ मित्र हे रत्नागिरी जिल्ह्यातील सावंत-वाडीजवळील आजगावचे. त्यांचे मूळ आडनाव आजगावकरअसे होते. १८९३ साली ते मुंबईला आले आणि १८९५ साली बा.स. कुलकर्णी यांच्या साहाय्याने त्यांनी मुंबईत मासिक मनोरंजनची सुरुवात केली.

टागोरांना याच काळात नोबेल पारितोषिक मिळाले होते. शरच्चंद्र चटर्जींच्या कादंबर्‍यांनी वाचक मोहीत होत होता. स्वतः आजगावकर, वि.सी.गुर्जर, भा.वि.वरेरकर यांनी बंगाली भाषा शिकून घेतली होती आणि आपापल्यापरीने बंगाली कथा-कादंबर्‍यांची रूपांतरे केली होती. मासिक मनोरंजनमध्ये असे लेखन प्रकाशित होत होते. दिवाकर कृष्ण, कॅप्टन गो.गं.लिमये या तत्कालीन कथाकारांच्या लेखनावर बंगाली साहित्याचा दाट प्रभाव जाणवतो. आजगावकरांनी तर बंगाली भाषेच्या प्रेमापोटी आपले आजगावकरहे आडनाव बदलून त्याऐवजी मित्रहे घेतले.

आजगावकरांवर सुधारणावादी विचारांचा पगडा होता. विशेषतः स्त्रियांनी शिक्षण घेतले पाहिजे, त्यांनी कुटुंबाबद्दल, कुटुंबातील व्यक्तींच्या व स्वत:च्या आरोग्याबद्दल, स्वतःच्या लेखनाबद्दलही जागरूक असायला हवे, अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे मासिक मनोरंजनहे प्रायः स्त्रियांना डोळ्यांसमोर ठेवून जन्माला आलेले होते. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताःअसे त्याचे घोषवाक्य असे. प्रिय भगिनींनो, आपल्या सुशिक्षित भगिनींजवळ मनोरंजनची शिफारस कराल ना? आपल्या मैत्रिणींकडून मनोरंजनला उत्तेजन द्याल ना? ‘मनोरंजनआपले उपकार विसरणार नाही.किंवा, ‘कुल-स्त्रियांच्या लेखास योग्य उत्तेजन देण्यात येईल. आपल्या स्त्री-समाजामध्ये लेखक-स्त्रिया तयार व्हाव्यात अशी मनोरंजनाची  मनापासून इच्छा आहे,’ असे ते निवेदन करीत.

मनोरंजनमध्ये कोणत्या प्रकारच्या लेखनाला स्थान मिळेल हे स्पष्ट करताना, ‘...लेख, कविता वगैरे सर्व मजकूर आबालवृद्धांस, विशेषतः स्त्रीवर्गास रुचेल, हितकर होईल असा सुबोध आणि सोप्या भाषेत असावा. प्रचलित राजकीय विषयांवरील, सामाजिक बाबतीत प्रगतीपर उदार धोरणाविरुद्ध, त्याचप्रमाणे पारिभाषिक शब्दांना दुर्बोध झालेले, अगर नीरस, अश्लीलता या दोषांनी दूषित अशा लेखांस मनोरंजनात केव्हाही स्थान मिळणार नाही.

इथे त्यांना नेमके कोणत्या प्रकारचे साहित्य वाचकांना द्यायचे व कोणत्या प्रकारचे द्यायचे नाही, याविषयी निश्चित व ठोस असे भान होते हे कळते.

मनोरंजनाच्या ध्येयधोरणाविषयी त्यांनी लिहिले आहे की, ‘पाश्चात्त्य देशात जी-जी म्हणून श्रेष्ठ दर्जाची मासिक पुस्तके आहेत, त्यांच्या सर्व बाबतींत मनोरंजनाची बरोबरी व्हावी, अशी आमची उत्कट इच्छा असून हे ध्येय साधण्यासाठी, त्या दिशेने आजपर्यंत... आम्ही यथाशक्ती व यथासाध्य शिकस्तीचे प्रयत्न करीत आलो आहोत आणि यापुढेही अशा प्रकारच्या प्रयत्नात आमच्याकडून कोणत्याही बाबतीत कसलीच कसूर होणार नाही, अशी आमच्या प्रिय आश्रय-दात्यांना व वाचकांना आम्ही खात्री देतो. इशीीं रीं रपू िीळलशकाय वाटेल ते मोल देऊन, उत्तम तेवढे मिळवून वाचकांना अर्पण करावयाचेहे कित्येक उच्चप्रतीच्या आंग्ल मासिक पुस्तकांचे तत्त्व पूर्णपणे कृतीत उतरविण्याची मनोरंजनाची महत्त्वाकांक्षा असून या कामी आमच्या प्रिय महाराष्ट्र बंधुभगिनींनी आम्हांला प्रेमाने, कळकळीने व सहानुभूतीने शक्य ते साहाय्य करण्याची कृपा करावी, अशी त्यांना आमची नम्र विनंती आहे.या कामात त्यांनी विठ्ठल जिवाजी नाडकर्णी (१९१०), वि.सी.गुर्जर आणि एकनाथ पांडुरंग रेंदाळकर (१९१३) यांची साहाय्यक संपादक म्हणून मदत घेतली होती. काशीनाथपंतांच्या मृत्यूनंतर, पुढे काही वर्षांनी, जुलै १९२८पासून मालती काशीनाथ मित्र (संपादक), दामोदर रघुनाथ मित्र (साहाय्यक) अशी व्यवस्था होती. मनोरंजनाचे नेहमीचे अंक काढताना लहान-मोठ्या व ठिकठिकाणच्या लेखक-लेखिकांच्या लेखनाला त्यांनी आवर्जून स्थान दिले; वेगवेगळे वाङ्मयप्रकार आणि भिन्न-भिन्न सदरे दिली. नाटक्याचे तारे’, ‘सुदाम्याचे पोहे’, ‘आनंदीबाई जोशी’, ‘बाळकराम’, ‘आमच्या स्त्रियांचे शिक्षण व सुधारणा’, ‘सुखाचा शोधअशा लेखनमाला प्रसिद्ध करण्यावर ते भर देत असत. स्वतंत्र वा अनुवादित कथा-कादंबर्‍या क्रमशः देण्यावरही त्यांचा भर राहिला. त्यांच्यासमोर उत्तमोत्तम पाश्चात्त्य नियतकालिके असावीत हे तर उघड आहे आणि त्यांच्या तुलनेत मनोरंजन कुठेही कमी पडू नये याकडे त्यांचे विशेष लक्ष राहिले. कथेबरोबर कथालेखकांची नावे छापण्याला मित्र यांनीच सुरुवात केली.

का.र. मित्र यांनी धाकट्या सूनबाई’ (दुसरी आवृत्ती, १९०२), ‘मृणालिनी’ (दुसरी आवृत्ती, १९०५), यांसारख्या बंगाली कादंबर्‍या; ‘बंगजागृती अथवा जागा झालेला बंगाल’ (१९०६) हे बंगाली नाटक तसेच प्रियंवदा’ (चौथी आवृत्ती, १९१७) ही गुजराती कादंबरी यांचे अनुवाद केले होते. लक्ष्मणमूर्च्छा आणि रामविलाप’ (१८९६) हा त्यांचा स्वतंत्रपणे लिहिलेला ग्रंथ आहे.

वेगवेगळे प्रयोग करीत राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले. वसंत विशेषांक’, ‘दिवाळी अंक’, ‘दिल्ली दरबार अंक’, ‘आगरकर अंक’, ‘अण्णासाहेब कर्वे अंकयांसारखे विशेषांक त्यांनी काढले. दिवाळी अंकाची प्रथा सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

मनोरंजनच्या काळात हरिभाऊंच्या स्फुट गोष्टीचे स्वरूप बदलले. ती संपूर्ण गोष्ट झाली. मनोरंजनमधून अशा संपूर्ण गोष्टी प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यामुळे मराठी कथेच्या इतिहासात मनोरंजनची कामगिरी मोलाची ठरते आणि तिचे सारे श्रेय काशीनाथपंतांना द्यायला हवे.

काशीनाथपंतांनी मनोरंजक ग्रंथप्रसारक मंडळी’, असे प्रकाशन सुरू केले होते व त्याच्याद्वारे त्यांनी काही पुस्तकेही प्रकाशित केली होती. त्यांपैकी एक म्हणजे त्यांनी १९१५च्या सुमारास धोंडो केशव कर्वे यांच्याकडून आत्मचरित्रात्मक लेख लिहून घेऊन तो मनोरंजनमध्ये प्रसिद्ध केला होता व त्यात त्यांना पुढे भर टाकायला सांगून आत्मवृत्तहे अण्णांचे आत्मचरित्र प्रथम प्रकाशित करण्याचा मान देवविला होता.

स्वतः काशीनाथरावांचा समकालीन ज्येष्ठ व कनिष्ठ लेखकांशी जिव्हाळ्याचा संबंध राहिला. त्यामुळे नामदार गोखले, मोती बुलासा यांच्या मृत्यूनंतर त्यांनी अप्रतिम मृत्युलेख लिहिल्याचे दिसून येते.

१९०९ साली मराठीतला पहिला दिवाळी अंक प्रकाशित करतानाही इंग्लिश, अमेरिकन वगैरे पाश्चात्त्य मासिक पुस्तकांच्या ख्रिसमस नंबरच्या धर्तीवर या वर्षी आम्ही मनोरंजनाचा दिवाळी अंकप्रसिद्ध करण्याचे साहस केले’, असे त्यांनी लिहिले आहे. याचा अर्थ त्या काळात मुंबईत जी-जी पाश्चात्त्य नियतकालिके येत होती, ती-ती ते पाहत होते व मनोरंजनचा दर्जा व स्वरूप तसा कसा राहील, यावर त्यांचा कटाक्ष असे. त्यामुळे मनोरंजनमध्ये वेगवेगळे विषय, वेगवेगळे वाङ्मयप्रकार, वेगवेगळे लेखक, कवी, चित्रकार यांचे अनोखे संमेलन आढळते, त्याला कारण काशीनाथरावांची त्यासंबंधीची चिवट जिद्द नि अथक प्रयत्न होत.

त्यांच्या १९२०साली झालेल्या मृत्यूनंतरही १९३५पर्यंत ते मासिक चालू राहिले; कारण काशीनाथरावांनी त्याची केलेली व्यवस्थित आखणी होय. ते केवळ संपादक, प्रकाशक नव्हते, त्यांनी स्वतः काही स्वतंत्र आणि अनुवादित लेखनही केले होते. मराठी साहित्यविश्वावर काशीनाथरावांचा ठसा निश्चितपणे आढळतो.

- सुखदा कोरडे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].