Skip to main content
x

मनोहर, सुजाता वसंत

    मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश व सुमारे चार महिन्यांसाठी का होईना, पहिल्या महिला सरन्यायाधीश होण्याचा मान न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांच्याकडे जातो. गुजरात उच्च न्यायालयाचे दुसरे सरन्यायाधीश न्या.के.टी.देसाई यांच्या त्या कन्या होत.

     सुजाता वसंत मनोहर यांचा जन्म मुंबईला झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या आनंदीलाल पोद्दार विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले. तेथून बी.एस्सी. उत्तीर्ण झाल्यावर त्या इंग्लंडला गेल्या आणि त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून एम.ए.ची पदवी संपादन केली; त्याचबरोबर त्या लिंकन्स इन्मधून बॅरिस्टरही झाल्या. १४ फेब्रुवारी १९५८ रोजी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेत वकिली सुरू केली. १९७०-१९७१मध्ये मुंबई शहर दिवाणी न्यायालयातील सहायक सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

      २३ जानेवारी १९७८ रोजी सुजाता मनोहर यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून झाली. २८ नोव्हेंबर १९७८ रोजी त्या उच्च न्यायालयाच्या कायम न्यायाधीश झाल्या. ५ जानेवारी १९९४ रोजी त्यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश म्हणून झाली, परंतु सुमारे चार महिन्यांनी, म्हणजे २१ एप्रिल १९९४ रोजी त्यांची बदली केरळ उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश म्हणून करण्यात आली. ८ नोव्हेंबर १९९४ रोजी त्यांची नियुक्ती सवार्र्ेच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून झाली. २७ ऑगस्ट १९९९ रोजी त्या पदावरून निवृत्त झाल्या.

       न्या. मीरासाहिब फातिमाबीवी यांच्यानंतर न्या. सुजाता मनोहर या सर्वोच्च न्यायालयाच्या दुसर्‍या महिला न्यायाधीश होत. त्यांच्या सर्वोच्च न्यायालयातील कारकिर्दीच्या काळातच १९९७मध्ये न्यायालयाने  सुप्रसिद्ध विशाखा खटल्यात कामाच्या किंवा नोकरीच्या जागी होणार्‍या महिलांच्या लैंगिक छळाला आळा घालण्यासाठी बंधनकारक मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली. तो निर्णय तीन न्यायाधीशांच्या ज्या पीठाने दिला, त्याच्या न्या. मनोहर एक सदस्य होत्या.

      मानवी हक्क, स्त्रियांचे हक्क, समाजकल्याण, इ. विषयांवरील अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांत न्या. मनोहर यांनी वेळोवेळी भारताचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्र राज्यात कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यासंबंधात मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या न्यायाधीशांच्या समितीच्या त्या अध्यक्ष होत्या. सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी केंद्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्य म्हणून काम पाहिले.

      न्या. सुजाता मनोहर यांचे वास्तव्य मुंबई येथे आहे.

- शरच्चंद्र पानसे

मनोहर, सुजाता वसंत