Skip to main content
x

मंडलीक, रवी रामभाऊ

            अमूर्तवादी चित्रकार रवी रामभाऊ मंडलीक यांचा जन्म विदर्भातील अचलपूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव नलिनी होते. मंडलीक यांचे शालेय शिक्षण अचलपूर येथेच झाले. कलाशिक्षणातील फाउण्डेशन व आर्ट टीचर डिप्लोमा अमरावती येथे, तर पुढील ड्रॉइंग अ‍ॅण्ड पेंटिंगचे शिक्षण सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे झाले. जी.डी. आर्ट ही पदविका त्यांनी १९८४ मध्ये पहिल्या श्रेणीत, प्रथम क्रमांकाने मिळविली. जे.जेमध्ये १९८४ ते १९९५ या काळात त्यांनी अध्यापनाचे काम केले. स्मिता सातारकर यांच्याशी त्यांचा विवाह १८ नोव्हेंबर १९९३ रोजी विवाह झाला.

करिअरच्या सुरुवातीला मंडलीक वास्तववादी पद्धतीची चित्रे काढत असत. त्यानुसार व्यक्तिचित्रण, भित्तिचित्रे करण्यात त्यांना रस वाटत असे. त्यांच्या चित्रांचे १९८५ मध्ये पहिले प्रदर्शन झाले. त्या मालिकेचा विषय ‘श्रमजीवी’ हा होता. त्यात त्यांनी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात दिसणारे विक्रेते, फेरीवाले, मजूर यांची वास्तववादी चित्रे काढली होती. त्यात त्यांचा मानवी शरीराकृतीचा उत्तम अभ्यास, व्यक्तीचा किंवा घटनेचा दृश्यानुभव देण्याची हातोटी ही वैशिष्ट्ये दिसली होती. १९८८ मध्ये जहांगीर आर्ट गॅलरीतील त्यांच्या एकल चित्रप्रदर्शनानंतर त्यांनी अर्थार्जनासाठी केलेली वास्तववादी चित्रे किंवा व्यावसायिक चित्रांची (कमिशन्ड वर्क) कामे पूर्णपणे थांबवली.

सर्जनशील निर्मितीत त्यांचा ओढा ‘अमूर्तवादी कलेकडे’ राहिला. ‘अमूर्तवादी’ चित्रे विशिष्ट विषयाशी निगडित असली तरी ती त्या विषयाची दृश्यात्मक वर्णने नसतात, तर चित्रघटकांची ती एक वेगळ्या पातळीवरची मांडणी असते. मंडलीक यांना निसर्गचक्रातील लय, तोल-असमतोल, नियमितता-अनियमितता, निर्दोषता-सदोषता, खडक आणि कातळ यांमध्येही दिसली. दगड हा निसर्गातील निर्जीव, कठीण, काहीसा शुष्क असणारा घटकच त्यांच्या निर्मितीचा प्रभावी स्रोत ठरला. त्यात त्यांना अनेक आकार, रंग, पोत दिसू लागले. वाळू रूपातल्या दगडांच्या असंख्य कणांपासून पहाडांच्या सुळक्यांपर्यंतची दगडांची विविधता त्यांना कलानिर्मितीसाठी भुरळ घालू लागली. विज्ञान, खगोलशास्त्र, अध्यात्म, फलज्योतिषशास्त्र या सर्वांगांनी त्यांनी दगडाचा जिज्ञासापूर्वक अभ्यास केला. त्यातूनच त्यांचा अमूर्त आकारांकडे प्रवास सुरू झाला.

सध्याच्या चित्रपद्धतीत ते रंगांचे अनेक पातळ थर एकमेकांवर चढवितात. शिवाय ब्रशबरोबर ते पेंटिंग नाइफ, रोलर, स्पंज, वॉटरस्प्रे यांसारख्या साहित्याचा उपयोग करतात. त्यांतून त्यांना अनपेक्षितपणे काही पोत (टेक्स्चर) प्राप्त होतात. काही वेळा अपेक्षित अशी चित्रभरणी (बेस) यातून ते करून घेतात. पारदर्शक व अपारदर्शक अशा दोन्ही पद्धतींनी वापरता येणार्‍या अ‍ॅक्रिलिक रंगांचाही ते वापर करतात. अ‍ॅक्रिलिकमध्ये अनेक शक्यता असून त्यांद्वारे विविध पातळ्या, गहिरेपणा (डेप्थ) निर्माण होतो. त्यांच्या आविष्कारात ‘पोत’ या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. निसर्गाचे बाह्यरूप आपल्या चित्रांतून दाखविण्यात त्यांना स्वारस्य नसून निसर्गातील चैतन्य, तत्त्व, सत्त्व किंवा चराचराला वेढून असलेल्या शक्तीचे अस्तित्व त्यांना आपल्या चित्रांतून दाखवायचे असते. आपल्या स्टूडिओत जमिनीवर कॅनव्हास पसरून त्यांची निर्मिती होत असली, तरी त्यासाठी ते बरीच भ्रमंतीही करतात.

आतापर्यंत त्यांची सुमारे सतरा एकल प्रदर्शने झाली आहेत. त्यांचा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुमारे साठ समूहचित्र प्रदर्शनांत  सहभाग होता. देश-परदेशांत होणाऱ्या आर्टिस्ट कॅम्पमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यांना सेचेल्लेज येथील द्वैवार्षिक चित्रप्रदर्शनाचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार मिळाला. याखेरीज राज्यपातळी, राष्ट्रीय पातळीवरच्या अन्य प्रतिष्ठित पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.

सुप्रसिद्ध चित्रपट कलाकार व दिग्दर्शक अमीर खान यांनी आपल्या ‘धोबीघाट’ या चित्रपटात मंडलीक यांच्या एका ‘अमूर्त चित्र’ निर्मितीचा कल्पकतेने वापर केला आहे. त्या चित्राची निर्मिती चित्रपटाच्या आशयाशी निगडित असली तरी एक स्वतंत्र कलाकृती म्हणूनही त्याला स्थान आहे. एका अमूर्त चित्राला चित्रपटात मिळालेल्या स्थानाला एक वेगळे महत्त्व आहे.

- साधना बहुळकर

मंडलीक, रवी रामभाऊ