Skip to main content
x

मंजूळ, वासुदेव लक्ष्मण

     प्राच्यविद्येच्या क्षेत्रात अनेक देशी-विदेशी पंडितांच्या, अभ्यासकांच्या परिचयाचे व्यक्तिमत्त्व म्हणजेच वासुदेव लक्ष्मण मंजूळ होय. भांडारकर संशोधन ग्रंथपाल पदावरून सतत चाळीस वर्षे प्राच्य विद्या-विभूषितांच्या कार्यात, संशोधन प्रकल्पांत साहाय्य करत असतानाच स्वत:ची एक अभ्यासक म्हणून वेगळी ओळख निर्माण करून त्यांनी आजवर पंचवीसहून अधिक ग्रंथ संशोधनात्मक पद्धतीने सादर केले. भांडारकर संस्थेस महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश व कर्नाटक या चार प्रांतांतून सुमारे दहा हजार हस्तलिखिते दान स्वरूपात संकलित करून राजवाड्यांची परंपरा चालवली. निवृत्तीनंतरही मराठी हस्तलिखितांचे संगोपन केंद्र काढून मराठी भाषेची आणि संतसाहित्याची आगळीवेगळी सेवा केली.

     वा.ल. मंजूळ मूळचे पंढरपूरचे, त्यांचा तेथेच जन्म झाला. आजोबा त्र्यंबकराज अग्निहोत्री होते. श्रौतेपंडित, चारी वेदांचे घनान्त अध्ययन, शंकराचार्यांकडून ‘वैदिक मुकुटमणी’ पदवी प्राप्त; त्यांचे चिरंजीव लक्ष्मण उर्फ बाबूराव, उत्तम हरिदासी कीर्तनकार, त्यांना ह्या क्षेत्रातल्या सहा पदव्या होत्या. धर्मार्थ महाराष्ट्र संगीत विद्यालयाचे गायनाचे अध्यापक, उत्तम ज्योतिषी, मंजूळांच्या घराण्यात श्रीविठ्ठल मंदिरात चतुर्मासात भागवत पुराण सांगण्याची परंपरा तीही गायकीचा तंबोरा मांडीवर ठेवून, त्याच्या स्वरावर श्लोक गायचे. या परंपरेला व्यास कीर्तन परंपरा (बैठे कीर्तन) म्हणत असत. आजोबा-वडील आणि वडिलांच्या गैरहजेरीत आठवीतल्या वा.लं.नी सभामंडपात पुराणही सांगितले. घरातली भिक्षुकी, कीर्तनकला आणि पुराणिकाच्या अल्पप्राप्तीचा भविष्यातला विचार करून ते पुण्यात आले.

     कै. मामासाहेब दांडेकरांच्या आशीर्वादाने स.प.महाविद्यालयात प्रवेश घेऊन, विद्यार्थी साहाय्यक समिती, कै. श्रीमती वेणुताई पटवर्धन आणि कै. श्रीमती रमाबाई पुणतांबेकर यांच्या आश्रयाने बी.ए. (सं.) आणि ग्रंथपाल पदविका मिळवून डॉ. रा. ना. दांडेकरांच्या आदेशावरून भांडारकर संस्थेत साहाय्यक ग्रंथपाल म्हणून दाखल झाले. संस्थेत डॉ. प. कृ. गोेडे, डॉ. गो. वि. देवस्थळी, डॉ. व. ग. राहूरकर, डॉ. अ. द. पुसाळकर यांचे मार्गदर्शन क्युरेटर म्हणून लाभले. डॉ. गो. के. भट, प्राचार्य र. दा. करमरकर, डॉ. म. गो. माईणकर, डॉ. प. ल. वैद्य, डॉ. रा. ना. दांडेकर, डॉ. अ. म. घाटगे अशा कित्येक महान प्राच्यविद्या पंडितांच्या हाताखाली वा.लं.ना काम करायला मिळाले.

     त्याखेरीज ग्रंथालयात संशोधनासाठी येणार्‍या पन्नासहून अधिक विदेशी संशोधकांना त्यांचे साहाय्य झाले. त्यांमध्ये डॉ. सोन्थायमर (जर्मनी), डॉ. अ‍ॅन फेल्डहौस (अमेरिका), डॉ. एरिक सँड (डेन्मार्क), डॉ. इरिना ग्लुश्कोव्हा (रशिया), डॉ. तोशिहिरोवादा (जपान), प्रा. आय. एम. पी. रिसाईड (लंडन) इत्यादींच्या शोध-प्रकल्पांना तसेच अनेक विदेशी विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मंजूळ यांचे साहाय्य झाले. त्यातूनच ‘भारतीय विद्येचे विदेशी विद्वान’ हा ग्रंथ तयार झाला. ही सर्व विदेशी अभ्यासक मंडळी संतसाहित्यावर काम करणारी होती.

     ग्रंथालयात नित्य येणार्‍या विद्वानांत डॉ. रा. शं. वाळिंबे, डॉ. रा. चिं. ढेरे, श्रीमान म. रा. यार्दी, डॉ. एस. व्ही. सोहोनी यांसारख्या दिग्गज प्राच्यविद्वानांचा सहवास होताच! डॉ. वाळिंबे यांच्या आग्रहामुळे मराठी विषयावर एम.ए. आणि पीएच.डी. करावयाची संधी मंजूळ यांना मिळाली. संस्थेच्या आवारातच वास्तव्य असल्यामुळे विविध जबाबदार्‍या त्यांनी सहजपणे सांभाळल्या. एतद्देशीय प्राच्य-विद्या संशोधकांच्या जीवन-कार्यावर मंजूळ यांनी वृत्तपत्रांतून लेखन केले.

     १९९९मध्ये निवृत्त झाल्यावर तीन वर्षे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘विश्वभारत सांस्कृतिक केंद्र’ या संस्थेचे ते मानद संचालक झाले. भांडारकर संस्थेच्या कार्याचीच परंपरा पुढे चालू राहिली. त्यांनी २००५मध्ये ‘मराठी हस्तलिखित केंद्र’ नावाची संस्था स्थापन केली. त्या संस्थेच्या माध्यमातून संत साहित्यविषयक जुनी मराठी एक हजार हस्तलिखिते गोळा केली. दीड हजारांचे मायक्रोफिल्मिंग आणि डिजीटल प्रती तयार करण्याचे काम डॉ. फेल्डहौस यांच्या मार्गदर्शनाखाली सहा वर्षांत पूर्ण केले. आणि नंतर सुमारे आठ हजार मराठी हस्तलिखितांच्या, चार खंडांतील ग्रंथाच्या एकत्रित विवरणात्मक सूचीचे काम सुरू केले आहे. त्यांनी काही महत्त्वाचे ग्रंथलेखनही केले. त्यांमध्ये आमची संस्कृती (१० खंड), श्रीकृष्णदयार्णवामृत, कुलदैवत-कुलाचार-कुलपुरुष, अमृतानुभवाची वासुदेवी टीका, पंढरपूरच्या अलक्षित कथा, ईश्वरनिष्ठांच्या पाऊलखुणा, भारती विद्येचे विदेशी विद्वान, डॉ. रा. ना. दांडेकर चरित्र, डॉ. रा. गो. भांडारकर चरित्र, भगवद्गीतेचा विश्वसंचार, चाणक्यनीती, संत चोखामेळा, चला विठ्ठलाच्या गावा पंढरपुरातील मठ फड-दिंड्यांचा इतिहास (णॠउ) प्रकल्प नुकताच पूर्ण अशी सुमारे तीस पुस्तके त्यांनी लिहिली. ही मुख्यत्वे उत्कर्ष प्रकाशनने प्रसिद्ध केली. नुकतेच महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेने २ ग्रंथांना पुरस्कार दिले. ग्रंथपाल असलेले मंजूळ निवृत्तीनंतर ग्रंथकार मंजूळ झाले.

     भांडारकर संस्थेत काम करताना त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांमध्ये ‘ग्रंथाली’चा आदर्श ग्रंथपाल, ‘भांडारकर’चा आदर्श कर्मचारी, ‘अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदे’चा उत्तम कार्यकर्ता, कोशकार केतकर पुरस्कार, ऋग्वेद अभ्यासक, याज्ञवल्क्य भूषण, पुणे मराठी ग्रंथालयाचा सन्मान्य ग्रंथपाल, विधिलिखित ब्रह्मभूषण, फलज्योतिष मंडळाचा जीवनगौरव, ज्योतिषाचार्य, पुणे विद्यापीठ नामदेव अध्यासन शिष्यवृत्ती आणि संस्कृत विभागातून पुण्यपुरुष पदवी इत्यादींचा समावेश आहे.

     श्री. मंजूळ शोधनिबंध वाचण्यासाठी महाराष्ट्र कल्चर अ‍ॅन्ड सोसायटीच्या मास्को, टोकियो, अमेरिका, पुणे येथील परिषदांना उपस्थित राहिले. मॉरिशसच्या जागतिक रामायण परिषदेलाही ते गेले होते, त्याशिवाय अमेरिकेच्या विस्कान्सिनच्या (मॅडसिन) साउथ एशियन कॉन्फरन्सला सलग तीन वेळा हजर होते. मलेशिया, सिंगापूर अशा विदेश वार्‍याही त्यांनी केल्या आहेत.

     कीर्तन-ज्योतिष-हस्तलिखित शास्त्र, संत-साहित्य यांविषयी अनेक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. कीर्तनकुल पुणे, महाराष्ट्र प्राच्य विद्या परिषद यांचे ते संस्थापक सदस्य आहेत. भांडारकर संस्थेच्या सल्लागार मंडळाचे सध्या सदस्य, तुळशीबागचे विश्वस्त अशा अनेक संस्थांशी ते निगडित आहेत.

     सौ. मंजूळ यांना पौराहित्यात रस आहे. भारत सरकारने मंजूळ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्त्री पौरोहित्यावर’ एक अनुबोधपट नुकताच प्रकाशित केला आहे.

  सु. वा. जोशी

मंजूळ, वासुदेव लक्ष्मण