मोदानी, एकनाथ रामचंद्र
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात दावरवाडी हे लहानसे खेडे आहे. येथे स्थायिक असणाऱ्या मोदानी कुटुंबाच्या योगदानामुळे दावरवाडीला मोदान्यांची वाडी असेही संबोधले जाते. हे कुटुंब मूळचे राजस्थानचे रहिवासी. दुष्काळ व राजकीय परिस्थितीमुळे आपले मूळगाव सोडून ते महाराष्ट्रात गोदावरी नदीच्या परिसरात वास्तव्यास आले. व्यापार, सावकारी व शेती यांत त्यांनी विशेष लक्ष घातले व स्थानिक जनतेचा लोभ मिळवला. अशा उद्योजक कुटुंबात एकनाथ यांचा जन्म झाला. रामचंद्र व दगडाबाई या दांपत्याचे ते एकुलते एक चिरंजीव. त्यांचा जानकाबाई हिच्याशी विवाह झाला, पण अपत्य न झाल्यामुळे त्यांचा दुसरा विवाह केसरबाई यांच्याशी झाला.
मोदानी यांचे शेतीवर आत्यंतिक प्रेम होते. त्यांनी आसपासच्या जमिनी मिळवल्या. थोड्याच काळात त्यांचे कृषी कार्य अकरा गावांत पसरले व तीन हजार एकर क्षेत्र त्यांच्या नियंत्रणाखाली आले. या शेतीचे व्यवस्थापन त्यांना करायचे होते. त्यांनी प्रत्येक गावासाठी मुनीम वा दिवाणजीची नेमणूक केली. त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी पर्यवेक्षक नेमला. तो रोज सकाळी घोड्यावरून गावांना भेटी देई व तेथील पीक-पाणी संबंधीची परिस्थिती दावरवाडीला कळवत असे. त्यांच्या शेतीवर ५०० मजूर त्या काळात काम करत. रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट होती. बैलगाडी व घोडागाडी हे दोनच पर्याय होते. एकनाथशेठ त्यांचाच उपयोग करत. ग्रामीण भागात फिरण्यासाठी घोडा आवश्यक असल्यामुळे प्रत्येक गावात जातिवंत जनावरांचा गोठा होता.
दुधापासून अनेक पदार्थ त्यांच्या घरी तयार होत असत. स्वत:च्या घरासाठी थोडे ठेवून ते बरीच उत्पादने त्यांच्याकडे काम करणाऱ्यांना वाटत असत. सार्वजनिक पाणवठा नव्हता तेव्हा एकनाथ यांनी गावाशेजारच्या वीरभद्रा नदीतील पाणी बैलमोटेद्वारे उपसण्याची व्यवस्था केली. स्वत:च्या खर्चाने मोटेची व बैलांची व्यवस्था केली आणि गावातील जनावरांना पाणी देण्याची सोय केली.
एकनाथ धार्मिक प्रवृत्तीचे होते, दानशूर होते. त्यांनी आयुर्वेद औषधांची दानपेटी केली होती व त्यातील औषधे समाजातील सर्वांना मोफत उपलब्ध करून देत असत. दावरवाडीत व आसपास शिक्षणाची सोय नव्हती. बीड जिल्ह्यातील मोमिनाबाद-आजची अंबाजोगाई-येथे शिक्षणाची व्यवस्था होती. तेव्हा दावरवाडीतील मुलांना अंबाजोगाईला शिक्षण घेता यावे म्हणून ते मुलांच्या राहण्याचा, कपड्याचा खर्च स्वत: करत. दावरवाडीच्या परिसरात अधूनमधून अवर्षण व दुष्काळ पडत असे अशा वेळी एकनाथजी मोकळ्या हाताने दुष्काळग्रस्तांना मदत करत असत. त्यांना आयुष्यात अनेक नैसर्गिक अनपेक्षित आपत्तींना तोंड द्यावे लागले. त्यांच्या शेतीत कपाशीचे क्षेत्र मोठे होते. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी मोठी जिनींग फॅक्टरी होती. ती बत्तीस युनिट तथा गिरख्यांची होती. एके वर्षी त्या जीनला आग लागली. पण ते हारले नाहीत. त्यांनी आत्मविश्वासाने जीन उभारली.
एकनाथ षष्ठीसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करत. तसेच ते अन्य धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करत. ते कृषी क्षेत्रातील अत्यंत कार्यक्षम प्रशासक होते. त्यांनी पशुसंवर्धनात विशेष कार्य केले. त्यांनी कन्हैयालाल, जगन्नाथ व श्रीनिवास या आपल्या मुलांनाही शेती व्यवस्थापनात सामावून घेतले होते. एकनाथ मोदानी यांचे अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी निधन झाले.