Skip to main content
x

मोदानी, ज्ञानप्रकाश कन्हैयालाल

            धुनिक काळाशी सुसंगत शिक्षण घेण्याच्या उद्देशाने  ज्ञानप्रकाश कन्हैयालाल मोदानी यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण औरंगाबादच्या सरस्वती शिक्षणभुवन संस्थेतून पूर्ण केले व पदव्युत्तर शिक्षण मराठवाडा विद्यापीठातून पूर्ण केले. ते उच्च शिक्षणासाठी पुण्याला गेले व तेथून त्यांनी जनसंपर्क या विषयात प्रावीण्य मिळवले. विद्यार्थिदशेत त्यांना ‘इसकस’ या रशियाच्या मित्रसंस्थेमार्फत रशियाला भेट देण्याची संधी मिळाली. त्या भेटीत त्यांनी तेथील शेतीचाही अभ्यास केला. विशेषत: कम्युन्स, सरकारी शेती व खाजगी शेती या साम्यवादी राष्ट्रांतील शेती पद्धतीची त्यांना अभ्यासता आल्या. त्यांनी रशियातील उझबेगिस्तान या प्रांताला भेट दिली. तो कपाशीच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. ज्ञानप्रकाश यांचे आजोबा व वडील यांच्या काळात ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळी होती. आज परिस्थिती भिन्न आहे. दावरवाडी नजिकच्या औरंगाबादसारख्या मोठ्या शहराशी जोडले गेले आहे. अनेक कल्याणकारी शासकीय योजना लोकांपर्यंत पोचलेल्या आहेत. ज्ञानप्रकाश मोदानींनी शासनाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रथिनेयुक्त पोषण आहार देण्याच्या योजनेखाली निविदा भरून प्रथिनेयुक्त आहार पुरवण्याचे काम उत्साहाने स्वीकारले. हे काम ज्ञानप्रकाश यांनी यशस्वीरीत्या ३३ वर्षे केले.

            शेती ही रासायनिक खतांवर अवलंबून न राहता ती जैविक खतावर आधारित राहावी यासाठी त्यांनी गांडूळ खत प्रकल्प हाती घेतला. सध्या त्यांच्या शेतावर प्रतिवर्षी ते १० टन गांडूळ खत निर्माण करतात. अल्पभूधारकांना शेतीतून मिळणारे उत्पन्न पुरेसे नसते. त्यांना गावातच काही उद्योग मिळवून देण्याच्या उद्देशाने ज्ञानप्रकाश मोदानी यांनी आपल्या शेतात बांबू लावला आहे. या बांबूपासून अनेक वस्तू तयार करतात. यासाठी फारशी यंत्रसामुग्रीही लागत नाही. शेतीतील कामे संपली म्हणजे या हस्तकला उद्योगात शेतकऱ्याला रोजगार मिळू शकेल असा त्यांना आत्मविश्‍वास आहे.

            ग्रामीण भागात रोजगार हमीसारख्या योजनांद्वारे रोजगार मिळत असल्यामुळे सामान्य शेतकऱ्याला मजूर मिळवणे कठीण झाले व त्यांचे वेतन न परवडणारे आहे. ज्या पिकांना कमी मजूर लागतील ती पिके निवडण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे, याच भूमिकेतून ज्ञानप्रकाश मोदानी यांनी ऊस, मोसंबी व कापूस या पिकांना प्राधान्य दिले आहे. फळबागा, वाढवणे, झाडे मोठी होईपर्यंत बागेत अन्य पिके घेणे यावर त्यांचा भर आहे. पाण्याची बचत करण्याच्या उद्देशाने त्यांनी ठिबक सिंचनद्वारे पाणी देण्याची योजना केली आहे. विशेषत: शाश्‍वत शेतीचा प्रचार करून हे तत्त्व जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. या कामासाठी त्यांनी काही संस्था स्थापन केल्या आहेत. कन्हैयालाल मोदानी कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठान-ग्रामभारती, अखिल भारतीय माहेश्‍वरी महासभा, किसान मंच या संस्थांमार्फत ते सार्वजनिक कार्य करत आहेत. या कार्यात शेती उद्योगातील निवृत्त अधिकाऱ्यांचा ते उपयोग करून घेतात.

            विहीर पुनर्भरण, पाणी अडवा-पाणी जिरवा, नदीत बांध घालणे यासारख्या योजना ज्ञानप्रकाश मोदानी यांनी आपल्या शेतात राबवल्या आहेत; पण या संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. सध्या ते औरंगाबाद शहरात स्थायिक झाले असून पर्यवेक्षकांना निर्णय घेण्याची संधी देऊन शेतीवर नियंत्रण ठेवू शकतात.

- डॉ. निळकंठ गंगाधर बापट

मोदानी, ज्ञानप्रकाश कन्हैयालाल