Skip to main content
x

मोदी, अमृत विठ्ठलदास

      मृत विठ्ठलदास मोदी यांचा जन्म गुजरातेतील नडियाद येथे झाला. त्यांना ८५ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. आयुष्याच्या अखेरपर्यंत, जवळजवळ शेवटच्या दिवसापर्यंत ते त्यांच्या कार्यालयात जात असत व त्यांचा बराचसा वेळ नवनवीन पुस्तके वाचण्यात जात असे. ‘युनिकेम’ या औषध उद्योगातल्या ख्यातनाम कंपनीचे ते संस्थापक आणि अध्यक्ष होते. त्यांचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. मुंबईतल्या विल्सन महाविद्यालयातून बी.एस्सी.ची पदवी प्रथम वर्गात मिळवल्यावर मोदी आय.सी.एस. होण्यासाठी लंडनला गेले. परंतु त्या परीक्षेत त्यांना यश मिळाले नाही. तरीही त्या अपयशाने खचून न जाता तेथूनच एम.एस्सी.ची गणितातली पदवी प्राप्त करून ते भारतात परत आले.

मोदी यांनी मुंबईत महालक्ष्मी मंदिराच्या पायथ्याशी एका गॅरेजमध्ये १९४४ साली शंभर टक्के भारतीय मालकीच्या आणि व्यवस्थापनाच्या औषधनिर्माण उद्योगाची सुरुवात केली. हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या भारतीय मालकीच्या कंपन्या औषध उद्योगात होत्या. त्या वेळी आधुनिक तंत्राने अ‍ॅलोपथिक औषधांची निर्मिती करून त्यांनी परदेशी कंपन्यांशी टक्कर दिली.

त्याच प्रयत्नांमधून १९५४ साली त्यांनी मधुमेहाचे औषध ‘इन्शुलीन’चा उत्पादन खर्च लक्षणीयरीत्या कमी केला. साहजिकच त्याच्या विक्रीची किंमतही चांगलीच उतरली. आपल्या देशातील रुग्णांना परवडणाऱ्या किंमतीत हे औषध उपलब्ध व्हावे अशी त्यांची धडपड होती. त्यांच्या स्वदेशी भावनेचा तो आविष्कार होता. याच प्रकारे खुली स्पर्धा निर्माण झाल्यावर मूलभूत रसायन उद्योगातल्या किमती सरकारने (बी.आय.सी.पी.ने) बांधून दिलेल्या दराच्या खाली घसरल्या त्या स्पर्धेमुळे, सरकारी औषधनियंत्रणामुळे नव्हे! आपल्या देशातला औषधनियंत्रण कायदा १९४० सालचा आहे. जगभरची केमोथेरपीची प्रगतीही १९४० सालानंतरची आहे. १९४४ साली ‘फार्मास्युटिकल्स’ हा तसा जगभरच नवीन धंदा होता. ज्या वेळी औषधे ही भारतात फक्त आयात करण्याचा जमाना होता, तेव्हा त्यांनी कुठल्याही ‘सवलतीं’ची वाट न पाहता, औषधे तयार करून थायलंडसारख्या खऱ्याखुऱ्या खुल्या बाजारात १९५४ सालापासून निर्यात केली. १९५९ साली दूरदृष्टीने मूलभूत रसायननिर्मितीच्या कारखान्याची मुहूर्तमेढ परदेशी सहकार्याच्या (यु-सी-बी, बेल्जियम) मदतीने केली.

स्वदेशी म्हणजे नवीन तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवणे किंवा जागतिक बाजारपेठेकडे दुर्लक्ष करणे नव्हे, हे त्यांनी कृतीने दाखवले. ही नवीन तंत्रज्ञानाची आयात फक्त रसायननिर्मितीबद्दल ठेवून यंत्रसामग्री मात्र भारतीय अभियांत्रिकी उद्योगावर पूर्ण विश्वास ठेवून भारतीय बनावटीची ठेवली. औषध उद्योगासंबंधी लागणारी यंत्रे बनवणाऱ्या आजच्या अनेक कारखान्यांची सुरुवात मोदींच्या कारखान्यासाठीची यंत्रे पुरवून झालेली आहे.

ते यशस्वी तंत्रज्ञ-उद्योजक तर होतेच, पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते अनेक व्यवस्थापकांचे गुरु होते. त्यांच्या हाताखालून गेलेले अनेक उद्योजक, व्यवस्थापक त्यांच्या-त्यांच्या व्यवसायांत नाव मिळवून आहेत. प्रयोग करून पाहण्याची त्यांनी त्या लोकांना दिलेली संधी मोलाची होती.

त्यांचा कारखाना हे एक प्रकारचे विद्यालयच होते. त्या वेळी मुंबईमध्येच काय, पण महाराष्ट्रातही औषधनिर्मितीचे शिक्षण घेण्याची सोय नव्हती. तेव्हा देशातील तरुणांनी हे शिक्षण घेऊन औषधनिर्मिती उद्योगात मोलाची भर घालावी या उद्देशाने त्यांनी श्री. रेप्टाकोस यांच्याबरोबर ‘बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी’ या शिक्षणसंस्थेची स्थापना केली.

त्यांच्या उद्योगाच्या सुरुवातीच्या काळापासून एक गोष्ट जर त्यांनी सतत चालू ठेवली असेल, तर ती म्हणजे वाचन. त्यांच्याकडे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुस्तके वाचायला देणे हे तर त्यांचे तंत्र होते. पुस्तक वाचले का, त्याच्या नोंदी केल्या का, त्या दुसऱ्या अधिकाऱ्याला दिल्या का, हे प्रश्‍न त्यांना ते सतत करत असत. इतके नवनवीन वाचनाचे महत्त्व त्यांनी मानलेले होते.

या साध्या गोष्टीचे मोल समजायला हवे असेल, तर ली आयोकोका या क्रिस्लर कॉर्पोरेशनच्या सरव्यवस्थापकाने केलेल्या त्याच्या आत्मचरित्रात केलेल्या उल्लेखावरून ध्यानात येईल. त्याच्या प्रख्यात पुस्तकात तो म्हणतो की, त्या वेळी डबघाईस आलेल्या त्या कंपनीत त्याने महत्त्वाची पहिली गोष्ट जर कोणती केली असेल, तर त्याच्या हाताखालच्या सर्व अधिकाऱ्यांना त्याने ५०० डॉलर्सची पुस्तके १९७८ साली फुकट वाटली. मोदी हे काम १९४४ सालापासून करत होते. पुस्तकातल्या नवनवीन कल्पना स्वत:च्या उद्योगात वापरण्यात त्यांचे वैशिष्ट्य होते.

‘मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह्ज’, व्हॅल्यू इंजिनिअरिंगचा औषध उद्योगातला पहिला वापर त्यांच्या कंपनीत झाला. साधारणत: धनादेशावर सह्या करण्याचे अधिकार स्वत:कडे, स्वत:च्या कुटुंबीयांकडे ठेवण्याची पद्धत आजही मोठमोठ्या भारतीय कंपन्यांत असते. पण त्यांच्या कंपनीत मात्र बऱ्याच कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे दुहेरी सहीने धनादेश लिहिण्याची पद्धत त्यांनी पाडली आणि माणसे कायमची जोडून ठेवली. त्याचा पश्चात्ताप त्यांना कधी करावा लागला नाही. त्यांनी स्वत: फार थोड्या धनादेशांवर सुरुवातीच्या काळात सह्या केल्या असतील तेवढ्याच. पुढे हा सर्व व्यवहार पूर्णपणे अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत होता. व्यवस्थापनाच्या व्यावसायीकरणाच्या मार्गातली ही फार महत्त्वाची पायरी आहे.

आवकजावक बारनिशीच्या नोंदी त्यांच्या कंपनीत १९५६ सालापासूनच रद्द केलेल्या होत्या हे आजही अनेकांना आश्चर्याचे वाटते. वरवर पाहता या साध्या गोष्टी वाटतील; पण त्या पूर्ण विचार करून आणि अनावश्यक खर्च टाळण्याच्या सततच्या दक्षतेतून त्यांनी केल्या. त्यामागचा काम करणाऱ्यांवरचा हा विश्वास, व्यवस्थापनाचा काम करणाऱ्यांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाच्या अंगाने महत्त्वाचा विचार आहे.

जागतिक पातळीवर स्पर्धा करायची असेल, तर भारतीय कंपन्यांचे व्यवस्थापन व्यावसायिक व तोडीस तोड असे असायला हवे. केवळ गोळ्या, इंजेक्शने आणि सिरप बनवून टिकाव धरता येणार नाही. मूलभूत रसायनेही भारतात बनवायला हवीत. मागासलेल्या देशात फक्त भारतीय वंशाच्या लोकांकडे निर्यात करून पुरणार नाही. खुल्या बाजारात टिकून राहायला हवे तर उत्पादने आंतरराष्ट्रीय दर्जाची हवीत, म्हणजे तिथे खपवता आली पाहिजेत, हे त्यांनी ओळखले होते. त्यांच्या विचारातला हा युयुत्सू स्वदेशीचा गाभा मोलाचा होता.

पन्नासच्या दशकात भारतात राष्ट्रीय उत्पादकता परिषदेची स्थापना झाली. भारतातल्या औषधउद्योगात कामगारांसाठी ‘इन्सेन्टिव्ह बोनस’ची सुरुवात सर्वप्रथम झाली ती मोदींच्या जोगेश्वरीच्या कारखान्यात, १९६१ साली. देशातल्या राष्ट्रीय प्रयोगशाळांचा उपयोग भारतीय खाजगी कारखानदारांनी सहकार्याने करावा, हा विचार राबवणारी सर्वप्रथम औषध कंपनी त्यांची होती. लखनऊ, जम्मू आणि हैदराबादच्या औषधविज्ञानासंबंधीच्या प्रयोगशाळांमध्ये त्यांचे प्रयोग कार्यक्रम सतत चालू असायचे. उद्योजकाने सतत बदलणाऱ्या जगात बदलत राहायला हवे हे भान त्यांनी त्यांच्या कामात ठेवले. सतत तीन वेळा ‘डेव्हलपमेंट कौन्सिल फॉर ड्रग्ज अ‍ॅन्ड फार्मास्यूटिकल्स’चे ते अध्यक्ष होते. त्याच काळात १९६९ सालच्या एकस्व कायद्यातले महत्त्वाचे बदल झाले. ते स्वत:, सिप्लाचे डॉ. युसूफ हमीद, रणबक्षीचे भाई मोहनसिंग, औषध नियंत्रक बोरकर व गोठोस्कर आणि पंतप्रधानांचे सचिव पी.एन. हक्सर या मंडळींच्या प्रयत्नांमुळे एकस्व कायद्यात, अन्न आणि औषध उद्योगात, उत्पादन एकस्व (प्रॉडक्ट पेटंट) न येता फक्त प्रक्रिया एकस्व (प्रोसेस पेटंट) आले. सक्तीच्या परवान्याची तरतूद झाली. परिणामी परदेशी कंपन्यांचा रस कमी झाला आणि भारतीय कंपन्यांना वाव मिळाला.

१९७० सालापर्यंत औषध उद्योगात परदेशी कंपन्यांचा विक्रीतला वाटा सिंहाचा होता. तो सारा तोरा पुढच्या २५ वर्षात पार बदलून गेला. आज भारतीय कंपन्या विक्रीमध्ये परदेशी कंपन्यांच्यापुढे आहेत. त्याच्या मुळाशी अमृत विठ्ठलदास मोदी यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या, स्वदेशी प्रेरणेने भारलेल्या लोकांचे श्रम कारणीभूत आहेत.

प्रत्येक देशाचे आपापले स्वार्थ असतात. स्वदेशी लोकांना संरक्षण मिळावे आणि परदेशी स्पर्धेपासून त्यांचे संरक्षण करावे, ही प्रत्येक कंपनीची रास्त अपेक्षा असते. जागतिकीकरणाच्या गोष्टी प्रत्येक देश कितीही करत असला, तरी त्या-त्या देशाचे राज्यकर्ते, त्यांच्या-त्यांच्या कंपन्यांचा धंदा किंवा कामगारांच्या नोकऱ्या टिकवण्यासाठी स्वराष्ट्रहिताला अनुकूल अशीच धोरणे राबवत असतात. मोदींनी ही बाब ओळखून त्या काळात, देशाचा एकस्व कायदा स्वहितरक्षणावर भर देणारा असावा, यासाठी अपार परिश्रम घेतले.

‘आचार्य प्रफुल्लचंद्र रे पुरस्कार’, ‘पद्मभूषण’ हा भारत सरकारचा मानाचा पुरस्कार त्यांना १९७२ साली मिळाला. त्यांनी अनेक सरकारी समित्यांवर वेगवेगळ्या पदे भूषविली.

अमृत मोदींचे गुरुत्व विविध क्षेत्रातल्या अग्रक्रमाबद्दल आहे. विषय स्वदेशी उद्योग स्थापन करण्याचा असो, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी सुरू करण्याचा असो, एकस्व कायद्यात स्वदेशहिताचा बदल करून घेण्याचा असो, व्यवस्थापनकलेतल्या नवनव्या कल्पना वापरण्याचा असो, अमृत मोदींनी त्यात भाग घेतलेला आहे. त्यांचे वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षी मुंबईत निधन झाले.

डॉ. ल. ना. गोडबोले

मोदी, अमृत विठ्ठलदास