Skip to main content
x

मोडक, शांता भास्कर

बिंबा मोडक

     पले सौंदर्य, अभिनय आणि गायन यामुळे रंगभूमी गाजवणार्‍या अभिनेत्री म्हणजे शांता भास्कर मोडक. शांताबाईंचे वडील भास्कर लक्ष्मण मोडक हे मूळचे पुण्यातले. गुढीपाडव्याच्या दिवशी पुणे येथे शांताबाईंचा जन्म झाला. पुण्यामध्येच त्यांचे शालेय शिक्षण सुरू झाले. पण वडिलांची इंदोर येथे नेमणूक झाल्यामुळे सर्वजण इंदोरला गेले व तेथेच शांताबाईंचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाले. तेथील काम आटोपल्यावर हे कुटुंब पुन्हा पुण्याला आले व शांताबाईंनी पुण्याच्या एस.पी. महाविद्यालयामधून १९४२ साली बी.ए.ची पदवी घेतली.

     १९४६ साली फेमस पिक्चर्सचे बाबूराव पै यांनी विश्राम बेडेकर यांना पाचारण केले व त्यांची कथा, पटकथा व संवाद असलेला ‘चूल आणि मूल’ हा चित्रपट निर्माण करायचे ठरवले. दिग्दर्शनही विश्राम बेडेकर यांचेच होते. त्यांच्या पत्नी मालती बेडेकर यांचा व मोडक कुटुंबीयांचा चांगला परिचय होता. मालतीबाईंनी आग्रहाने शांता मोडक यांना ‘चूल आणि मूल’ या चित्रपटात नायिकेची भूमिका करण्याची गळ घातली आणि चित्रपट तयार झाला. श्रेयनामावलीत नाव देताना बाबूराव पै यांना शांता हे नाव न आठवल्यामुळे त्यांनी त्याऐवजी ‘बिंबा’ हे नाव दिले व त्याच नावाने ‘चूल आणि मूल’ (१९४७) हा चित्रपट प्रकाशित झाला.

     ‘चूल आणि मूल’ या चित्रपटादरम्यान शांताबाईंच्या दामूअण्णा मालवणकर यांच्याशी गप्पागोष्टी होत. दामूअण्णा ‘प्रभाकर’ नाटक कंपनी होती. तिचे प्रयोग वरचेवर होत. दामूअण्णांनी अत्याग्रहाने - अगदी जबरदस्तीनेच - शांताबाईंना आपल्या नाटक कंपनीत भूमिका करायला सांगितल्या. त्यानुसार १९४९ साली ‘भावबंधन’ या नाटकातील नायिकेच्या भूमिकेत शांताबाईंनी मराठी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले.

     नाटकात काम करण्याची संधी मिळाल्यावर शांताबाईंनी गाणे शिकवायला सुरुवात केली आणि तैलबुद्धीच्या शांताबाईंनी पाहता पाहता अभिजात शास्त्रोक्त संगीत शिकून घेतले. त्यामुळे पुढच्या काळात त्यांनी ‘मानापमान’, ‘सौभद्र’, ‘स्वयंवर’ आणि इतर अनेक संगीत नाटकात नायिकेच्या भूमिका केल्या. दामूअण्णांच्या कंपनीच्या नाटकांतील त्यांच्या भूमिका व नानासाहेब फाटक यांच्याबरोबर ‘झुंझारराव’ या नाटकात त्यांनी केलेली कमळजाची भूमिकाही अत्यंत गाजल्या.

    मराठी रंगभूमीवर शांता मोडक हे नाव गाजत होते. अशा गाजत असलेल्या नावाला मराठी निर्माते थोडेच डावलणार! दिग्दर्शक बाळकृष्ण यांनी त्यांना ‘इन मिन साडेतीन’ या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा मराठी चित्रपटात आणले. पण श्रेयनामावलीमध्ये या वेळी बिंबा हे नाव न देता, शांता मोडक हेच त्यांचे मूळ नाव देण्यात आले.

     ‘इन मिन साडेतीन’ या चित्रपटात राजा परांजपे यांची प्रमुख भूमिका होती. त्यांनी आपल्या ‘ऊनपाऊस’ या चित्रपटासाठी शांता मोडक यांना बापू मास्तरांची थोरली सून या भूमिकेसाठी निवडले. त्या चित्रपटाद्वारे गजानन जागीरदार यांनी लो. टिळकांची छोटी भूमिका केली होती. शांताबाईंना जागीरदार यांनी ‘उमाजी नाईक’ या चित्रपटात भूमिका दिली. पण चित्रपटात भूमिका करून कालापव्यय होतो आहे, असे शांताबाईंना वाटू लागले. ठरलेले पैसे कोणीच देत नाही व काम तेवढे करून घेतले जाते असा अनुभव आल्यावर त्यांनी ‘उमाजी नाईक’मधील भूमिका सोडून दिली व चित्रपटसृष्टीला कायमचा रामराम ठोकला. पण त्यांच्या नाटकांमधील भूमिका चालूच होत्या. त्यांचा चरितार्थ व्यवस्थितपणे होत असे. त्यामुळे चित्रपटसृष्टीत फारसे नाव मिळाले नाही, तरी मराठी रंगभूमीवर त्यांनी चांगले नाव मिळवले.

     महाराष्ट्रात सरकारतर्फे १९८० साली मराठी संगीत नाटक शताब्दी महोत्सव साजरा झाला. त्या वेळी शांता मोडक यांना तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. याखेरीज पुणे महानगरपालिका व इतर संस्थांतर्फेही त्यांना अनेक पारितोषिकांनी गौरवण्यात आले. शांता मोडक या वयाच्या ९३ वर्षीही कार्यरत आहेत.

     - शशिकांत किणीकर

मोडक, शांता भास्कर