Skip to main content
x

मोघे, सुधीर राम

     वितेची उत्तम जाण असणाऱ्या आणि कवितेलाच आपला प्राण मानणाऱ्या सुधीर मोघे यांचे शब्दमाध्यमावरचे प्रेम नितांत होते, याचा प्रत्यय त्यांच्या

     ‘शब्दांना नसते दु:ख     शब्दांना सुखही नसते

     ते वाहतात जे ओझे      ते तुमचे माझे असते’ या शब्दांतून सहज येतो.

     पुढच्या काळात कवी, गीतकार,  संगीतकार, पटकथालेखक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणार्‍या सुधीर मोघे यांचा जन्म किर्लोस्करवाडी येथे झाला. वडील राम गणेश मोघे किर्लोस्करवाडीतच नोकरीला होते. बी.ए.पर्यंत शिक्षण झाल्यावर सुधीर मोघे यांनी किर्लोस्करवाडीतच किर्लोस्कर ब्रदर्समध्ये नोकरी केली. पण नोकरीत मन न रमल्यामुळे ते १९६८-६९ मध्ये पुण्यात दाखल झाले. आता काय करायचे? हा प्रश्‍न मनात सतत उमटत असतानाच त्यांचा त्यांनाच शोध लागला आणि ते निवेदक झाले. स्वरानंदच्या ‘आपली आवड’ या मराठी गाण्यांच्या रंगमंचीय कार्यक्रमात त्यांनी निवेदक म्हणून स्वत:ची खास ओळख निर्माण केली. त्यानंतर त्यांनी ‘स्वतंत्रते भगवती’, ‘मंतरलेल्या चैत्रबनात’, ‘नक्षत्रांचे देणे’, ‘स्मरणयात्रा’, ‘माडगूळ्याचे गदिमा’, ‘मी विश्‍वाचा’, ‘कविता पानोपानी’ असे कवितांचे कार्यक्रम सादर केले.

     पुण्यात आल्यावर निवेदक म्हणून घडू लागलेली कारकिर्द बहरत असतानाही त्यांच्यातल्या कवी मनाने कधीही स्वत:ला स्वस्थता लाभू दिली नाही. कवी मनाच्या सुधीर मोघे यांना चित्रपटांसाठी गीते लिहिण्याची संधी मिळाली ती, ‘राजा छत्रपती’ या चित्रपटामुळे. या चित्रपटातील गाण्यांच्या माध्यमातून लोकांच्या मनात प्रवेश केलेल्या सुधीर मोघे यांनी पुढील काळात अनेकानेक उत्तमोत्तम गाणी रसिकांना दिली.

     ‘रात्रीस खेळ चाले या गूढ सावल्यांचा’, ‘फिटे अंधाराचे जाळे’, ‘सांज ये गोकुळी’, ‘एकाच या जन्मी जणू’, ‘सखी मंद झाल्या तारका’, ‘दयाघना’, ‘मनमनास उमगत नाही’, ‘गोमू संगतीने माझ्या तू येशील का?’, ‘आला आला वारा’, ‘बारा पुण्यक्षेत्रे झाली बारा ज्योतिर्लिंगे’, ‘दिसलीस तू फुलले ऋतू’, ‘मायभवानी तुझे लेकरू’, ‘एक झोका चुके काळजाचा ठोका’, ‘ओंकार अनादि अनंत अथांग’, ‘काजल रातीनं ओढून नेला’, ‘कुण्या देशीचे पाखरू’, ‘गुज ओठांनी ओठांना’, ‘झुलतो बाई रास-झुला’, ‘त्या प्रेमाची शपथ तुला’, ‘दिस जातील दिस येतील’, ‘देवा तुला शोधू कुठं’, ‘दृष्ट लागण्याजोगे सारे’, ‘मी सोडुन सारी लाज’, ‘विसरू नको श्रीरामा’, ‘शंभो शंकरा करुणाकरा’, ‘सूर कुठूनसे आले अवचित’, ‘सांग तू माझाच ना’, ‘हे जीवन सुंदर आहे’ या गीतांतील शब्दांना चित्रपट कथानकाच्या चौकटीत बसवतानाही त्यांनी आपल्यातला उपजत कवी कधी मरू दिला नाही. त्यामुळेच त्यांच्या गीतलेखनाचे नाते गीतकार ग.दि. माडगूळकर आणि शांताबाई शेळके यांच्याशी जोडता येते. चौकटीत राहूनही चौकटीबाहेरचे, सहज-सुंदर, पण वास्तव जग सुधीर मोघे यांच्या गीतांतून साकार झालेले दिसते. त्यांच्या गीतांनी मानवाच्या मनातील नानाविध भावनांचा सहजाविष्कार सातत्याने केलेला दिसतो. म्हणूनच ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटातील ‘गोमू संगतीने’ हे उडत्या चालीचे गीत ते ज्या ताकदीने लिहू शकले, त्याच ताकदीने त्यांनी ‘रात्रीस खेळ चाले’ हे गूढार्थभाव व्यक्त करणारे गाणेही शब्दबद्ध केले. ‘भावनांचा सहजाविष्कार’ हे त्यांच्या गीतलेखनाचे एक प्रमुख वैशिष्ट्य असलेले दिसते. गीतलेखनातील या वैशिष्ट्यामुळेच त्यांची गीते अभिजात सौंदर्यमूल्य लाभलेले, या शतकातील श्रेष्ठ भावप्रकटीकरण ठरते, असे वाटते. तेच वैशिष्ट्य त्यांच्या काव्यलेखनामधूनही तितक्याच सहजपणे अभिव्यक्त झालेले आहे. म्हणूनच त्यांच्या कविता सौंदर्यगर्भतेची आणि त्यातून निर्माण होणार्‍या अर्थगर्भतेची कलात्मक उंची गाठतात, हे ‘आत्मरंग’, ‘गाण्याची वही’, ‘पक्षांचे ठसे’, ‘लय’, ‘शब्दधून’ या कवितासंग्रहातून प्रत्ययाला येते. तसेच त्यांचे ‘अनुबंध’, ‘गाणारी वाट’, ‘निरांकुशाची रोजनिशी’ हे गद्य लेखनही सर्वपरिचित आहे.

     सुधीर मोघे यांनी ‘जानकी’, ‘पुढचं पाऊल’, ‘शापित’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘कळत-नकळत’, ‘चौकट राजा’, ‘आत्मविश्वास’, ‘एक डाव भुताचा’, ‘लपंडाव’, ‘सूर्योदय’ या चित्रपटांसाठी केलेले गीतलेखन वैशिष्ट्यपूर्ण आहे, यात वादच नाही. त्यांनी शब्दबद्ध केलेल्या गीतांना लाभलेल्या हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, विश्वनाथ मोरे, मीना खडीकर, अनिल-अरुण, प्रभाकर जोग, आनंद मोडक या संगीत दिग्दर्शकांनी योग्य तो न्याय दिलाच; पण त्याचबरोबरीने श्रीधर फडके, लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुधीर फडके, सुरेश वाडकर, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे, डॉ. सलील कुलकर्णी या आवाजांनीही लालित्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण साथ दिली.

     कवी-गीतकार म्हणून सुधीर मोघे जेवढे आणि जसे श्रेष्ठ होते, तेवढे आणि तसेच ते संगीतकार म्हणूनही मोठे होते, याची प्रचिती त्यांनी संगीत दिलेल्या ‘रंगुनि रंगात सार्‍या, रंग माझा वेगळा’ या गीतावरून सहज येते. त्यांनी संगीत दिलेल्या ‘कशासाठी प्रेमासाठी’ या मराठी चित्रपटाची गाणी जशी गाजली तशीच ‘सूत्रधार’ या हिंदी चित्रपटाचीही गाजली. ‘स्वामी’, ‘अधांतरी’, ‘नाजुका’ या दूरदर्शनवरील मालिकांना त्यांनी दिलेले संगीत प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. त्यांनी ‘हसरतें’, ‘डॉलर बहू’, ‘शरारतें’ या हिंदी मालिकांनाही संगीत दिले. त्यांनी व्यावसायिक माहितीपटांची केलेली निर्मितीही त्यांच्यातील सर्जनशीलतेची ग्वाही देते.

     महाराष्ट्र राज्य पुरस्कार - सर्वोत्कृष्ट गीतकार (४ वेळा), सूरसिंगार पुरस्कार - सर्वोत्कृष्ट गीतकार (२ वेळा), गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन पुरस्कार, सर्वोत्कृष्ट गीतकार - मटा गौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट गीतकार - अल्फा गौरव पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कविवर्य ना.घ. देशपांडे पुरस्कार (२००६), दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा - शांता शेळके पुरस्कार (२००७), साहित्यकार गो. नी. दांडेकर स्मृती - मृण्मयी पुरस्कार (२००८), केशवसुत पुरस्कार (२०११) हे आणि यांसारख्या अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत.

     पुणे येथे प्रदीर्घ आजाराने निधन पावलेल्या सुधीर मोघे यांचे रसिकांच्या मनातील ‘एक संवेदनशील मनाचा कवी-गीतकार’ म्हणून असलेले स्थान अढळ राहील, हे त्यांच्या यशस्वी कारकिर्दीवरून निश्‍चितपणे म्हणता येते.

     - संपादित

मोघे, सुधीर राम