Skip to main content
x

मोहाडे , गुलाब गोंदूजी

गुलाबराव महाराज

     अमरावतीजवळ माधान येथे कुणबी जातीत जन्मलेल्या गुलाबरावांना चौथ्या महिन्यात अंधत्व आले व त्याच वर्षी आईचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या आजीने त्यांचा सांभाळ केला. त्यांचे आडनाव मोहाडे होते. माधान गावची पाटीलकी त्यांच्या घरात होती. त्यांना बालपणापासून ‘ज्ञानेश्वरी’त गोडी वाटू लागली. एका आख्यायिकेनुसार ज्ञानेश्वरांनी स्वप्नात येऊन त्यांना वैदिक धर्म व कृष्णभक्ती यांचा उपदेश करण्याची आज्ञा केली. तेव्हापासून ते स्वत:ला ‘ज्ञानेश्वरकन्या’ व ‘श्रीकृष्णपत्नी’ समजू लागले व म्हणून मंगळसूत्र, कुंकू व वेणी अशी सौभाग्यलेणी ते वापरू लागले. त्यांचे आचरण श्रौत परंपरेस धरून व अतिशय शुद्ध होते. ज्ञानेश्वरांच्या अनुग्रहानंतर त्यांना सांख्ययोग व वेदान्त या गहन विषयांचे ज्ञान प्राप्त झाले व तेच त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले. अशा ज्ञानप्राप्तीनंतर नाश पावत नाही, हा भक्तिसिद्धान्त मांडून त्यांनी मधुराद्वैत दर्शनाचा पुरस्कार केला. यासाठी त्यांनी शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाचा आधार घेतला होता.

     सांख्य, योग वगैरे षङ्दर्शने परस्परपूरक असल्याचे त्यांचे म्हणणे होते. सर्वधर्म समन्वयवादी भूमिका त्यांनी मांडली होती. त्या भूमिकेनुसार हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिस्ती, इस्लामी वगैरे धर्म व भारतातील नानाविध धार्मिक संप्रदाय हे वैदिक धर्माच्या एकेका अंशावर उभारले आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. २५०० वर्षांपूर्वी वैदिक धर्मच फक्त विश्वव्यापक होता, असे ते म्हणत.

     डार्विनचा उत्क्रांतिवाद, स्पेन्सरचे तत्त्वज्ञान इ. पाश्चिमात्य विचारांचे त्यांनी खंडन केले होते. आर्य बाहेरून येथे आलेला एक वंश आहे, हे मॅक्स म्यूलर व लोकमान्य टिळक यांचे मत त्यांना मान्य नव्हते. गणित, रेडियम, ध्वनिशास्त्र, ईथर, इलेक्ट्रॉन, उष्णता-गति-प्रकाश, विमानविद्या, विज्ञान इ. आधुनिक वैज्ञानिक विचार प्राचीन भारतीय ग्रंथांत आढळतात, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र खंडित परंपरेमुळे त्यांचा मुळातून अभ्यास विस्तार केल्यास नवीन भौतिक शोध लागून भारतीय भौतिकशास्त्राची परंपरा पुढे चालू राहील, असेही त्यांना वाटत असे. या रीतीने भारतीय शास्त्रातून अशी परंपरा प्रगत होऊ शकेल, असे गुलाबराव महाराज यांचे प्रतिपादन होते.

     गुलाबराव महाराजांनी जवळजवळ १२५ पुस्तके लिहिली. सूत्रग्रंथ, निबंध, प्रश्‍नोत्तर, पत्रे, आख्याने, नाटके, लोकगीते, (लावण्या), प्रकरणे, व्याकरण, कोश, आत्मचरित्र इ. प्रकारचे लेखन त्यांनी केले. त्यांनी जवळजवळ सहा हजार पृष्ठे लिहिली असून त्यात २७ हजार ओव्या, प्रत्येकी अडीच हजार अभंग व पदे, तीन हजार श्लोकादी रचना आहेत. ‘अलौकिक व्याख्याने’ (१९१२), ‘साधुबोध’ (१९१५), ‘कुंज’ (१९१८), ‘संप्रदाय सुरतरु’ (१९९१) हे त्यांचे अधिक महत्त्वाचे ग्रंथ आहेत. त्यांच्या निधनानंतर १९६४ पर्यंत हा संप्रदाय श्री बाबाजी महाराज पंडितांनी चालवला. मात्र नंतर या संप्रदायाला अधिकारी लाभला नाही; तथापि उत्सवादी कार्यक्रम मात्र अमरावतीला चालतात. अमरावतीतील श्रीज्ञानेश्वर मधुराद्वैत सांप्रदायिक मंडळ हे काम करते. कात्यायनी व्रत, शिवरात्र, श्रीकृष्णजन्म वगैरे उत्सव या मंडळातर्फे साजरे करतात. तसेच या संप्रदायाच्या ग्रंथालयाचे जतन करणे आणि पुस्तके प्रकाशित करणे ही कामेही हे मंडळ करते.

संपादित

मोहाडे , गुलाब गोंदूजी