Skip to main content
x

मोल्सवर्थ, जेम्स टी.

     द्य मराठी शब्दकोशकारांपैकी एक असलेल्या जेम्स टी. मोल्सवर्थ यांचा १५ जून १७९५ रोजी बाप्तिस्मा येथे  झाला. एक्झीटर (डेव्हन) येथे त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर लष्करात भरती होऊन ते भारतात आले. १८१४मध्ये मराठी आणि हिंदुस्थानी या दोन भाषांची परीक्षा दिली. संस्कृत, फार्सी, लॅटिन, ग्रीक या भाषाही त्यांना अवगत होत्या. नेटिव्ह इन्फन्ट्रीच्या नवव्या रेजिमेंटमध्ये भाषाभिज्ञ म्हणून त्यांची निवड झाली. १८३७मध्ये ते लष्करी सेवेतून मुक्त झाले.

मोल्सवर्थ यांचे महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे त्यांनी १८३१मध्ये ‘ए डिक्शनरी ऑफ मराठी अँड इंग्लिश’ या नावाने तयार केलेला मराठी—इंग्रजी शब्दकोश हे होय. या कोशापूर्वीच्या शब्दकोशरचनेचा साक्षेपाने उपयोग करून घेऊन, तसेच सामूहिक कार्यपद्धतीचा अवलंब करून मोल्सवर्थ यांनी हा कोश तयार केला. संस्कृत, फार्सी, अरबी, हिंदुस्थानी तसेच ग्रमीण व अश्‍लील शब्दही या कोशनिर्मितीसाठी त्यांनी विचारात घेतले आणि सुमारे ४० हजार शब्द पहिल्या आवृत्तीसाठी निवडले. सुमारे सहा वर्षांच्या परिश्रमानंतर हा शब्दकोश पूर्ण झाला. या कामी त्यांना जॉर्ज आणि टॉमस या कँडी बंधूंचे, तसेच तत्कालीन काही विद्वान शास्त्री मंडळींचे साहाय्य लाभले. शब्दसंख्या, शब्दार्थ, अधिकृतता इत्यादी दृष्टींनी हा कोश महत्त्वाचा आहे. तथापि, मराठी शब्दांचे अर्थ व माहिती त्यात इंग्रजीतून दिलेली असल्याने निव्वळ मराठी भाषा जाणणार्‍यांसाठी मात्र त्याचा तितकासा उपयोग नाही. मात्र या कोशामुळे महाराष्ट्रात शब्दकोशरचनेचा पाया घातला गेला, हेही तितकेच खरे. १८५७मध्ये या कोशाची दुसरी आवृत्ती निघाली. त्यासाठी १८३५मध्ये इंग्लंडला परत गेलेले मोल्सवर्थ मुद्दाम भारतात आले होते. या आवृत्तीत सुमारे ६० हजार शब्द आहेत.

इंग्रजी—मराठी शब्दकोशाचे कामही मोल्सवर्थ यांनी हाती घेतले होते. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते पूर्ण करणे त्यांना शक्य झाले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर टॉमस कँडी यांनी तो पूर्ण केला. ‘पापपीडितास शांती’ (१८२९) आणि ‘ज्ञानमार्गाची सूचना’ (१८४९) या दोन ख्रिस्तिधर्मपर पुस्तिका त्यांनी लिहिल्या आहेत.

संपादित

संदर्भ
१. अर्वाचीन चरित्रकोश; संपादक, चित्राव सिद्धेश्‍वरशास्त्री
मोल्सवर्थ, जेम्स टी.