Skip to main content
x

मोरे, खंडेराव अप्पाजी

मोरेदादा

मोरेदादा

मोरे, खंडेराव अप्पाजी

स्वामी समर्थ (अक्कलकोट) संप्रदाय

२१ मे १९२२ २८ एप्रिल १९८८

दिंडोरी, नाशिक येथील अप्पाजी मोरे यांची पिढी त्यांच्या घराण्यातील शंकरराव मोरे यांची समाजसेवेची परंपरा पुढे चालवीत होती. याच अप्पाजी आणि सौ. चंद्रभागाबाई यांच्या पोटी खंडेराव म्हणजेच पुढे प्रसिद्ध पावलेले श्री मोरेदादा यांचा जन्म झाला. ते जन्मल्यानंतर काही महिन्यांतच त्यांचे वडील अप्पाजी यांचा मृत्यू झाला आणि लहानग्या खंडेरावांची जबाबदारी त्यांच्या आईवर पडली. शाळेत शिकता-शिकताच त्यांना त्यांच्या गावात नेहमी येणारे रामदासांचे भक्त रामदासी गुरुजी यांच्या विचारांची आवड निर्माण झाली. त्यामुळे वयाच्या आठव्या वर्षीच श्री रामरक्षा, श्री मद्भगवत्गीता, विष्णुसहस्रनाम, दासबोध, हरिविजय, पांडवप्रताप असे ग्रंथ त्यांना मुखोद्गत झाले. खंडेराव यांच्या या आकलनाने कामकोटीचे श्रीशंकराचार्यदेखील संतोष पावले होते व त्यांनी लहान खंडेरावांची प्रशंसा केली होती. शाळेतील अभ्यास करता करताच खंडेरावाने धार्मिक ग्रंथांबरोबरच इतिहास, कृषी, विज्ञान या विषयांचाही अभ्यास केला. विशेषत: शेतीसंबंधीची माहिती बारकाईने करून घेतली. शेती करता करताच शेतीत नवनवीन प्रयोग केले. 

१९४२ साली भारतीय स्वातंत्र्यसंग्रम निर्णायक वळणावर आला होता. त्याच वर्षी खंडेरावांचा विवाहही झाला होता. परंतु, उण्यापुर्‍या वीस वर्षांच्या खंडेरावाने त्या स्वातंत्र्यसंग्रमात उडी घेतली. खर्‍या अर्थाने ते स्वातंत्र्यसैनिक होते. तरीही पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांसाठीच्या म्हणून सरकारी सवलती, फायदे मात्र स्वीकारले नाहीत. आपले हे कर्तव्यच होते असे ते मानीत. भारतीय स्वातंत्र्यानंतर जेव्हा देशाने लोकशाही राज्यपद्धत स्वीकारली, त्या वेळी १९५२ ते १९६२ या दहा वर्षांच्या काळात ते दिंडोरी ग्रमपंचायतीचे सरपंच होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक ग्रामसुधारणाही केल्या आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेला मूर्त स्वरूप दिले. तो आदर्श अन्य गावांना घालून दिला. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. त्या वेळी त्यांनी आपली विहीर सर्वांसाठी खुली केली होती. पुढे त्यांनी शासकीय सेवेतही काम केले. होमगार्ड कमांडर या पदापर्यंत ते पोहोचले. शासकीय सेवेतील या पदावर असताना त्यांनी जिल्ह्यातील हजारभर तरुण-तरुणींना नेमबाजीत प्रवीण केले.

याच काळात खंडेराव अप्पाजी मोरे हे ‘मोरेदादा’ या नामाभिधानानेही लोकप्रिय झाले आणि ओळखले जाऊ लागले होते. त्यांना घरात मात्र ‘भाऊ’ म्हणत. दैनंदिन जगरहाटीमध्ये आधुनिक जगाशी जुळवून घेताना त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले; परंतु त्यांचे मन मात्र अध्यात्म आणि समर्थ विचारांकडे झुकलेले होते. त्यासाठी ते जाणीवपूर्वक गुरूच्या शोधात होते. या प्रयत्नांत असतानाच त्यांना एका गावकर्‍याने नाशिक मधील एक योगी पिठले महाराज यांच्याबद्दल सांगितले व त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जाण्यासही सुचविले. पिठले महाराज हे सिद्धपुरुष होते. त्यांनी आपल्या साधनेने मोरेदादा त्यांंना भेटावयास येणार हे ओळखले होते. त्यानुसार त्यांनी ओळखदेख नसतानाही अचानक आलेल्या मोरेदादांचे स्वागत त्यांचे नाव घेऊन केले. समर्थ विचारांनी भारलेल्या मोरेदादांच्या भक्ती आणि निष्ठेवर समाधान पावून पिठले महाराजांनी त्यांना लवकरच दत्तजयंतीच्या दिवशी गुरुदीक्षा दिली.

प्रपंच, सामाजिक कार्य करता करताच मोरेदादांनी पिठले महाराजांच्या सहवासात सव्वीस वर्षे कार्य केले. या कार्यकाळात पिठले महाराजांच्या मार्गदर्शनाखाली दादांनी महाराष्ट्रभर अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्या  विचारांचा प्रसार केला. या काळात नाशिक येथील पिठले महाराजांच्या मठात मोरेदादांचे स्थान अग्रक्रमाचे झाले होते. त्यांनी शेकडो प्रचारक तयार केले. सव्वीस वर्षे या मठात म्हणजे दरबारात सेवा केल्यानंतर दादांनी दरबार १९७४ साली दिंडोरी म्हणजे आपल्या गावाशेजारीच हलवला. दिंडोरी येथे प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली.

‘मानवी जीवनातील दु:खांचा शोध व त्यावरून बोध घेण्यासाठी मानवाकडे पुरेसे बळ असावे लागते. माणसाची आध्यात्मिक पातळी तिथवर पोहोचली पाहिजे,’ असे दादांचे म्हणणे होते. म्हणूनच त्यांनी एकूणच ‘मानवी जीवन’ या विषयावर संशोधन केले, चिंतन केले व त्यानुसार समाजप्रबोधन केले. आत्मकेंद्रित होत चाललेल्या नवीन पिढ्यांना विवेकपूर्ण विचार करण्यासाठी प्रवृत्त करतानाच त्यासाठी सामुदायिक प्रार्थना, सप्ताह, प्रवचने आदी कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यांनी दिंडोरीप्रमाणेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रशिक्षण केंद्रांची स्थापना केली. बालके आणि विद्यार्थ्यांसाठी स्तोत्र, मंत्रपठण ज्या योगे त्यांची वाणी शुद्ध होईल, त्याचप्रमाणे त्यांनी माता, पिता, गुरू, बुजुर्गांबद्दलचा आदरभाव जोपासण्यासाठी संस्कार शिबिरांचे आयोजन केले.

दादांनी साहित्य लेखनही विपुल केले आहे. श्री गुरुचरित्र, दुर्गासप्तशती, मराठी संस्कृती, नित्य व्यवहारातील ज्योतिष, क्षात्रधर्म, नित्यसेवा स्तोत्र, हिंदुधर्म अशा कृतींनी आपले मौलिक विचार व्यक्त केले आहेत. १९८८ साली दिंडोरी यथे त्यांनी देह ठेविला. त्यांच्या कार्याचा वारसा त्यांच्या कुटुंबियांनी आता पुढे चालता ठेवला आहे.

संदीप राऊत / आर्या जोशी

संदर्भ :

१. http://www.dattamaharaj.com/node/110

मोरे, खंडेराव अप्पाजी