Skip to main content
x

मोरजे, गंगाधर नारायण

     लोकसाहित्याचे अभ्यासक-संशोधक गंगाधर मोरजे यांचा जन्म नवाबाग, वेंगुर्ले, जिल्हा सिंधुदुर्ग येथे झाला. त्यांचे शिक्षण बी.ए. (मराठी ऑनर्स), मुंबई विद्यापीठ, (१९५७), एम.ए. (मराठी, संस्कृत), मुंबई विद्यापीठ, (१९५९), बी.एड. (मराठी-भूगोल), गारगोटी विद्यापीठ, (१९६१) येथे झाले. पी.एच.डी. शिवाजी विद्यापीठचा विषय ‘मराठी लावणी वाङ्मय’ हा होता.

     लोकसाहित्य, संतसाहित्य, ख्रिस्ती-मराठी साहित्य या संदर्भात त्यांनी अभ्यासू वृत्तीने आणि चिकित्सक पद्धतीने लेखन केलेले आहे. ‘लोकबंध’ हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्या दृष्टीने इंग्लिश भाषेतील निबंधलेखनही याच विषयाच्या संदर्भात आहे. भाषांतरासाठी त्यांनी निवडलेल्या ग्रंथांचे स्वरूप याच प्रकारचे आहे. या संदर्भात रशियन लोकसाहित्यविषयक दोन ग्रंथांचा उल्लेख करता येईल. प्रस्तावना लिहिण्यासाठी त्यांनी निवडलेले ग्रंथही याच विषयाशी नाते सांगणारे आहेत.

     लोकवाङ्मय जुनेही नसते, नवेही नसते, ते सदैव वर्तमान असते. ते काळाबरोबरच मौखिक-लिखित-मौखिक या गतीने प्रवास करते ही डॉ. मोरजे यांची भूमिका आहे. त्याचबरोबर लोकसाहित्यविषयक पुस्तकी अभ्यास-संशोधनाला क्षेत्रीय अभ्यास, संशोधनाची जोड असली पाहिजे, असे त्यांचे मत होते. त्या दृष्टीने ‘माणकोजी बोधले’ यांच्यासंबंधी त्यांनी केलेल्या लेखनाचा उल्लेख या संदर्भात करता येईल. प्रत्यक्ष त्या-त्या ठिकाणी जाऊन माहिती गोळा करणे, त्या माहितीचे संकलन, संपादन करणे, वर्गीकरण-विश्‍लेषण करून निष्कर्ष काढणे हा लोकसाहित्य अभ्यास-संशोधनाचा कणा आहे या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचे लेखन केलेले आहे.

     लोकसाहित्याची व्याप्ती बरीच व्यापक आहे. लोकसाहित्यात लोककथा, लोकगीते, लोकभाषा, म्हणी, उखाणे, आहाणे, तमाशा, लळिते, भारुडे, गोंधळ, लोकविधी, चालीरीती, पेहराव, सण, उत्सव इत्यादी घटकांचा समावेश होतो. त्या दृष्टीने लोकवाङ्मय, त्याच्या प्रेरणा, त्याचे रचनाबंध, स्वरूप, आस्वाद प्रक्रिया, संहिता स्वरूप या सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास करून लोकसाहित्य हे एक स्वतंत्र अभ्यासक्षेत्र कसे आहे, त्याचे विवेचन डॉ.मोरजे यांनी लोकसाहित्यविषयक ग्रंथात केलेले आहे. लोकसाहित्याचे सादरीकरण हा डॉ. मोरजे यांचा प्रमुख निकष आहे. त्या दृष्टीने त्यांनी एक चित्रफीतही तयार केली आहे. त्यामध्ये प्रात्यक्षिकासह व्याख्यान देऊन लोकसाहित्याचे रंगस्वरूप स्पष्ट केलेले आहे. त्या दृष्टीने लोकसाहित्याचे स्वरूप आणि सादरीकरण या दोन्ही बाबींवर प्रकाश पडतो.

     डॉ. मोरजे यांची लोकसाहित्य-वाङ्मयविषयक एकूण सतरा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ‘रामजोशीकृत लावण्या’, ‘मराठी लावणी वाङ्मय’, ‘शाहीर वरदी परशराम’ (संपादन), ‘लोकसाहित्य कलाविचार’, ‘लोकसाहित्य: आकलन आणि आस्वाद’, ‘लोकसाहित्य: बदलते संदर्भ - बदलती रूपे’, ‘इतिहास आणि लोकसाहित्य’, ‘कूटकथेची कूळकथा’, ‘लोकरहाटीच्या वाटे, ‘कहाणी लोकसाहित्याची’ आदी ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत.

     तसेच ‘ख्रिस्ती-मराठी वाङ्मय’, ‘महाराष्ट्रातील सांस्कृतिक परिवर्तन आणि ख्रिस्तीधर्मीय’, ‘ज्ञानोदय लेखन सारसूची प्रकल्प’, ‘गोमंतकातील ख्रिस्ती-मराठी वाङ्मय : शोध आणि बोध’ इत्यादी उल्लेखनीय ग्रंथ आहेत. मराठी भाषेत नियतकालिकांची अशी वर्णनात्मक सारसूची (ज्ञानोदय लेखन सारसूची) ही पहिलीच आहे. याचे दोन खंड प्रकाशित झालेले आहेत.

     ‘मराठी दोलामुद्रिते’ या ग्रंथाच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. हा संपादित ग्रंथ म्हणजे अतिसंक्षिप्त वाङ्मयेतिहासच आहे. यामध्ये १९०० नोंदी आहेत.

     डॉ. गंगाधर मोरजे यांचे ३१ शोधनिबंध, १७ संदर्भ ग्रंथांत समाविष्ट लेख, ११ ग्रंथांना प्रस्तावना, असे वाङ्मयविषयक भरीव कार्य आहे.

     डॉ. मोरजे यांना विविध पारितोषिके प्राप्त झालेली आहेत:

     महाराष्ट्र शासन पारितोषिक (१९७५-१९७६) सौंदर्यशास्त्र आणि समीक्षा शास्त्रातील उत्कृष्ट निर्मितीबद्दल, ‘मराठी लावणी वाङ्मय’ या ग्रंथासाठी; महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, पुण, पारितोषिक १९८२, ‘अक्षरवेध’ या ग्रंथासाठी, तर विष्णुशास्त्री चिपळूणकर पारितोषिक, पुणे विद्यापीठ, १९८६-१९८७, ‘ख्रिस्ती मराठी वाङ्मय’ या ग्रंथासाठी मिळाले. तसेच प्रा.अ.का.प्रियोळकर स्मृती पारितोषिक, मुंबई विद्यापीठ, १९९९, एकूण संशोधन कार्यासाठी; महाराष्ट्र गौरव विशेष पुरस्कार, महाराष्ट्र फाउण्डेशन, यु.एस.ए, २००२, लोकसाहित्यविषयक कामगिरीबद्दल आणि महाराष्ट्र शासन उत्कृष्ट ग्रंथ पारितोषिक, २००२, ‘लोकरहाटीच्या वाटे’साठी इत्यादी पारितोषिके मिळाली आहेत.

    एकूणच मराठी वाङ्मयाच्या इतिहासात डॉ. गंगाधर नारायण मोरजे यांचे नाव लोकवाङ्मयामुळे सुवर्ण अक्षरांनी लिहिता येते. त्या दृष्टीने त्यांचे स्थान गौरवपूर्ण आहे.

- डॉ. मधुरा कोरान्ने

मोरजे, गंगाधर नारायण