मोटे, कृष्णाबाई हरी
कृष्णाबाई मोटे यांचे माहेरचे नाव मनोरमा अनंतराव खरे. ‘काळाची पावले’ ओळखून ‘दृष्टीआडच्या सृष्टीत’ काय चालले आहे याचा वेध घेत लालित्यपूर्ण, चिंतनशील आणि संशोधनात्मक लेखन करणार्या कृष्णाबाईंचे प्राथमिक शिक्षण शिरूर येथे झाले. १९२२ साली त्यांनी कर्वे युनिव्हर्सिटीची ‘गृहिंतागमा’ ही पदवी मिळवली. समाजकार्य करण्याच्या उद्देशाने शिक्षणक्षेत्रात नोकरी केली. वयाच्या तिसाव्या वर्षी ‘लंडन स्कूल ऑफ सोशिऑलॉजी’ येथून समाजशास्त्राची पदविका मिळवण्यासाठी त्यांनी लंडनला प्रयाण केले. तेथील वास्तव्यात कामगार क्षेत्राचा अभ्यास करून परतल्यावर प्रकाशक, संपादक हरिभाऊ मोटे यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला. त्यांनी १९३४ साली रजिस्टर्ड लग्न केले हे विशेष. त्यांनी मुंबईला समाजकल्याण खात्याच्या रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरी केली. कृष्णाबाईंचा समाजकार्यात सक्रिय सहभाग होता. गिरणी कामगारांच्या मुलांसाठी पाळणाघर, नोकरी करणार्या स्त्रियांसाठी वसतिगृह यांसारख्या योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
१९३०सालापासून त्यांनी नियतकालिकांमधून लेखनाला सुरुवात केली. ‘मीनाक्षीचे जीवन’ (१९४२) या कादंबरीतून पारंपरिक नातेसंबंध आणि स्वत्वाची जाणीव यांमध्ये स्त्री-जीवनाची होणारी घुसमट व्यक्त होते. ‘दृष्टीआडच्या सृष्टीत’ (१९३९) या पुस्तकातील निरीक्षणपर लेख आणि ‘काळाची पाउले’मधील (१९७६) संशोधनपर लेख यांमधून झोपडपट्टीतील दारिद्य्राने भरडली गेलेली स्त्री, समाजात मातृत्वाची रुजलेली दुटप्पी मूल्यव्यवस्था, स्त्रीच्या नोकरीसंबंधी लावले जाणारे दुहेरी मापदंड, विज्ञान युगाचा कुटुंबसंस्थेवर होणारा परिणाम, घटस्फोटित स्त्रीचा एकटेपणा, यांसारख्या अनेक मूलभूत प्रश्नांना त्यांनी हात घातलेला आहे. ‘शार्लटचे जाळे’ (१९५२), ‘असे आहे आपले मन’ (१९८५), ‘प्राचीन माणसे’ (१९६७), ‘सामाजिक मानवजातीचा यथायोग्य अभ्यास’ (१९६७) ही त्यांची अनुवादित पुस्तके आहेत. ‘माझी गुणाची पोर अथवा हरितालिकेची पूजा’ (१९४९) या नाटकातून मुलीला प्रेमविवाहाचा अधिकार देताना जुन्यानव्या विचारांची सांगड हलक्याफुलक्या पद्धतीने घातली आहे.
‘लग्नानंतरचे पहिले वर्ष’ (१९६८) यामध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’ने आयोजित केलेल्या स्पर्धेतील ७०० लेखांचे संपादन आणि संकलन केलेले आहे. त्यामधून खेडे आणि शहर यांमधील स्त्रियांच्या विचार-पद्धतीतील पिढीगणीक होत गेलेला बदल अधोरेखित होतो. याखेरीज मुलांसाठी त्यांनी चार पुस्तके लिहिलेली आहेत.
कृष्णाबाईंच्या लिखाणाचे महत्त्व म्हणजे, त्या प्रचलित समाजव्यवस्थेचा फक्त आढावा घेत नाहीत, तर त्यावर उपाययोजनाही सुचवतात. त्या योजना राबविण्यासाठी त्यांनी स्वतः केलेली धडपड त्यांच्या जबाबदार व्यक्तिमत्त्वाची आणि दूरदृष्टीची साक्ष देतात.