Skip to main content
x

मराठे, उषा बापू

उषाकिरण

     चित्रपटसृष्टीतील व्यक्तीने नगरपालपद भूषवण्याचा पहिला मान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे उषाकिरण. त्यांचा जन्म वसईमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव राधा होते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असूनही त्यांच्या वडिलांनी-बापू मराठे यांनी आपल्या मुलीला लहानपणापासूनच नृत्यकलेचे शिक्षण दिले. त्यांच्या पदलालित्यावर खूश होऊन प्रसिद्ध नर्तक उदय शंकर यांनी उषा मराठे यांना ‘कल्पना’ (१९४८) चित्रपटात भूमिका दिली. हा चित्रपट मद्रास येथे तयार झाला. या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर उषाकिरण मुंबईत आल्यावर त्यांना मो.ग. रांगणेकर यांच्या ‘कुबेर’ या चित्रपटातील भूमिका मिळाली. ती त्यांनी उषा मराठे या नावानेच केली. पुढे त्याच नावाने त्यांनी ‘सीता स्वयंवर’, ‘मायाबाजार’, ‘माझा राम’, ‘चाळीतले शेजारी’ यासारखे चित्रपट केले. १९५० मध्ये त्यांना ‘गौना’ नावाच्या हिंदी चित्रपटात नायिकेची भूमिका मिळाली. त्या वेळेस अमिया चक्रवर्ती यांनी उषा मराठे यांचे ‘उषाकिरण’ असे नामकरण केले आणि पुढे त्या याच नावाने चित्रपटसृष्टीत ओळखल्या जाऊ लागल्या.

      विश्राम बेडेकर यांनी उषाकिरण यांना ‘क्रांतिवीर वासुदेव बळवंत’ या चित्रपटात तमाशात नाचणाऱ्या कोल्हाटणीची भूमिका दिली. त्यांनी साकारलेल्या या भूमिकेची खूपच प्रशंसा झाली आणि त्या मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या नायिका म्हणून एकदम प्रसिद्धीला आल्या.

       वि.वि. बोकील यांच्या ‘गाठीभेटी’ या कादंबरीवर आधारलेल्या ‘बाळा जो जो रे’ या चित्रपटातील उषाकिरण यांची भूमिकाही लोकप्रिय ठरली. मातृदेवोभव हा संदेश अभिनव पद्धतीने सांगणाऱ्या या चित्रपटाने रजत महोत्सव साजरा केला. मंगल पिक्चर्सच्या राम गबाले दिग्दर्शित ‘जशास तसे’ या चित्रपटात त्यांना पुन्हा एकदा कोल्हाटणीची भूमिका मिळाली. त्यांच्या सोबत बाबूराव पेंढारकरांसारखे कसलेले अभिनेते होते. त्यांच्या तोडीचा अभिनय करून उषाकिरण यांनी बाबूरावांची शाबासकी मिळवली. तर पु.ल. देशपांडे यांच्या ‘दूधभात’ (१९४२) या चित्रपटातील अभिनय सादरीकरणामुळे त्यांना पु.लं.कडून प्रशस्तीही मिळाली.

      ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ हा दत्ता धर्माधिकारी दिग्दर्शित चित्रपट उषाकिरण यांच्या अभिनयामुळे अत्यंत लोकप्रिय ठरला होता, त्यातील त्यांच्या अभिनयामुळे रणजित मुव्हीटोनने हिंदीत ‘औरत ये तेरी कहानी’ हा चित्रपट काढला. लता मंगेशकर यांच्या सुरेल चित्रच्या ‘कांचनगंगा’ (१९५४) या चित्रपटातील गोड गळयाची पण दिसायला कुरूप असणारी नायिका उषाकिरण यांनी आपल्या अभिनयाने जिवंत केली. बाबूराव पै आणि चुंबळे यांच्या ‘पोस्टातली मुलगी’ (१९५४) या चित्रपटातील मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील सुशिक्षित कमावत्या मुलीची होणारी कुचंबणा उषाकिरण यांनी आपल्या अभिनयकलेच्या आविष्कारातून यथोचितपणे साकारली. अनंत माने यांच्या ‘पुनवेची रात’मधली तमाशाच्या फडात नाचणारी नर्तिका, माधव शिंदे दिग्दर्शित ‘शिकलेली बायको’मधील डॉक्टर असणारी शेतकऱ्याची बायको, या व्यक्तिरेखा त्यांनी समर्थपणे साकारल्या. ‘शिकलेली बायको’ या चित्रपटावरून मोहन सैगल यांनी हिंदीत ‘डॉक्टर विद्या’ हा चित्रपट काढला.

      १९६० सालच्या ‘कन्यादान’ हा चित्रपट महादेवशास्त्री जोशी यांच्या ‘जगावेगळी गोष्ट’ या कथेवर बेतला होता. आपल्या विधवा सुनेचे लग्न लावून देणारा सासरा व सून यांच्यातील हृद्य कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली होती. यातील विधवा सून उषाकिरण यांनी उत्तमरीत्या साकारली. या चित्रपटाला १९६१ सालचे राष्ट्रपती रौप्यपदक मिळाले. ‘एक धागा सुखाचा’ (१९६१) या अत्यंत गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते दत्ता धर्माधिकारी. त्यातील उषाकिरण यांनी साकारलेली भूमिकाही महत्त्वपूर्ण होती.

      १९६२ मध्ये उषाकिरण यांचे ‘गरिबाघरची लेक’, ‘सप्तपदी’, ‘सूनबाई’ हे चित्रपट पडद्यावर आले. त्यांच्या अभिनयाने चित्रपट रसिकांना जिंकून तर घेतलेच, त्याचबरोबर यशस्वी ठरलेल्या या चित्रपटाने उत्तम व्यवसायही केला.

      उषाकिरण यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अत्यंत वेगळया धाटणीच्या भूमिका पार पाडल्या. पण त्यातही नृत्यनिपुणता, बोलका चेहरा, गोरा वर्ण असूनही त्यांनी कोल्हाटणीच्या पार पाडलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत. या भूमिका सादर करताना चेहऱ्यावरील शहरीपण जाणवू न देता त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर या भूमिकांना न्याय मिळवून दिला.

      या चित्रपटांव्यतिरिक्त उषाकिरण यांनी ‘मर्दमराठा’ (१९५१), ‘बेलभंडारा’ (१९५२), ‘प्रीतिसंगम’ (१९५७), ‘चाळ माझ्या पायात’ (१९६०), ‘सख्या सावरा मला’ (१९६०), ‘माणसाला पंख असतात’ (१९६१), अशा चित्रपटांमधून महत्त्वाच्या भूमिका पार पाडलेल्या आहेत. उषाकिरण यांनी मराठीबरोबरच हिंदी बोलपटही गाजवले. हिंदीतला नायिका असणारा त्यांचा पहिला बोलपट होता ‘गौना’ (१९५०). त्यानंतर त्यांनी ‘मदहोश’, ‘दाग’, ‘पतिता’, ‘मुसाफिर’, ‘औलाद’, ‘समाज’, ‘झांजर’ यांसारखे चित्रपट केले.

     उषाकिरण यांनी ‘चंबल की कसम’ (१९८०) या चित्रपटात चरित्र अभिनेत्री म्हणून भूमिका केली. पडद्यावरचे हे त्यांचे शेवटचे दर्शन. चित्रपटसंन्यास घेतल्यानंतर उषाकिरण यांनी समाजोपयोगी कामे करण्यास सुरुवात केली. पुढे त्यांचे काम पाहून महाराष्ट्र शासनाने त्यांना मुंबईचे नगरपालपद दिले. त्यांची कन्या तन्वी आझमी यांनी त्यांच्या अभिनयाचा वारसा चालू ठेवला आहे.

    आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात उषाकिरण यांनी आपल्या अनुभवांचा लेखाजोखा ‘उष:काल’ या आत्मचरित्राच्या रूपाने वाचकांना दिलेला आहे. मुंबई येथे कर्करोगासारख्या असाध्य रोगाने उषाकिरण यांचे निधन झाले.

- द. भा. सामंत

संदर्भ
१) उषाकिरण, ‘उष:काल’, श्रीविद्या प्रकाशन, पुणे; १९८९.
मराठे, उषा बापू