Skip to main content
x

मसोजी, विनायक शिवराम

             विनायक शिवराम मसोजी यांचा जन्म कोल्हापुरात, एका ख्रिस्ती कुटुंबात झाला. त्यांचे वडील रेव्हरंड शिवराम मसोजी स्थानिक चर्चमध्ये काम करीत. विनायक सहा वर्षांचा असताना मातु:श्री रामकुंवर-बाई ख्रिस्तवासी झाल्या. वडिलांच्या छत्राखाली साध्या, धार्मिक वातावरणात विनायक मसोजींचाही स्वभाव साधा, आध्यात्मिक व काहीसा अंतर्मुख बनला.

कोल्हापूर येथे बालपण, बंगालमध्ये रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतन येथे कलाशिक्षण, फुललेले कलाजीवन व नागपुरात कलातपस्येत घालवलेली आयुष्याची संध्याकाळ हा थोडक्यात विनायक मसोजींचा जीवनपट. आपल्या आयुष्यातील तीन सर्वोत्तम दशके बंगभूमीत सार्थक केलेल्या मसोजींचा ‘बंगाल स्कूल’च्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा आहे.

आपल्या मुलाचा चित्रकलेतील कल लक्षात घेऊन रेव्हरंड मसोजींनी विनायकला मुंबईत सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे शिक्षण घ्यावयास पाठवले. त्यांनी तेथे १९१९ ते १९२१ या काळात पाश्‍चिमात्य पद्धतीचे कलाशिक्षण घेतले.

१९२०-२१ हे ब्रिटिशांशी असहकाराचे वर्ष होते. महात्मा गांधी व त्यांचा सत्याचा आग्रह, एकादश व्रते, प्रार्थना हे सर्व बघून आपण बाह्य जगात अधिक रममाण होऊ लागलो आहोत, अशी जाणीव त्यांना होऊ लागली. याच काळात ख्रिश्‍चन असोसिएशनच्या कॅनन जोशी व बडोदा स्थित बंधू सॅम्युअल जोशी यांच्या ते सहवासात आले. त्यांनी ‘आता देशी काहीतरी शीक व देशाला उपयोग होईल असे काहीतरी कर’, अशी प्रेरणा दिली. पाश्‍चिमात्य शैलीतील जे.जे.मधील शिक्षणाऐवजी कलकत्त्याजवळ असलेल्या रवींद्रनाथांच्या आश्रमात जाण्यास त्यांनीच सुचविले. याच वेळी सॅम्युअल जोशींच्या जवळ असलेली  काही मुगल, रजपूत इ. शैलींची चित्रे बघण्याचा योग मसोजींना आला व यात काहीतरी भारतीय आहे याची त्यांना जाणीव झाली. सॅम्युअल जोशींचे स्नेही, दीनबंधू अँड्र्यूज यांचे सहकार्य व मसोजींचे थोरले बंधू डॉ. यशवंत यांच्या आर्थिक पाठबळामुळे शांतिनिकेतन येथे शिक्षण घेण्याचे मसोजींचे स्वप्न १९२१ मध्ये साकार झाले. गुरुदेवांच्या आश्रमशाळेतील वेगळ्या वातावरणाशी ते लवकरच समरस झाले.

शांतिनिकेतनात टागोरांद्वारे प्रस्थापित कलाभुवनाचे प्रेरणास्रोत म्हणजे अवनीन्द्रनाथ टागोर व नंदलाल बोस हे होते. याखेरीज तिथे असितकुमार हलधर, क्षितींद्रनाथ मुजुमदार, ए.आर. चुगताई, रामकिंकर बैज, बिनोद बिहारी मुखर्जी यांसारख्या प्रतिभावंत चित्रकर्मींची उपस्थिती होती. कलकत्त्याच्या आर्ट स्कूलमध्ये ब्रिटिश पठडीतले शिक्षण घेतलेल्या अवनीन्द्रनाथ टागोरांनी रजपुत व मुगल लघुचित्रांपासून प्रेरणा घेऊन ‘वॉश’ शैलीत चित्रे काढावयास प्रारंभ केला होता. त्यावेळी भारतीय कलातत्त्वांबद्दल जागृती करण्यात ई.बी. हॅवेल व डॉ. आनंद कुमार स्वामी या विचारवंतांचा सिंहाचा वाटा होता. बंगाल पुनरुत्थानवादी शैलीचा झेंडा फडकविणारे नंदलाल बोस गुरुदेव टागोरांच्या आग्रहामुळे कला भुवनात रुजू झाले होते. या वातावरणात व अशा प्रतिभावंतांच्या मार्गदर्शनाखाली मसोजींचे व्यक्तिमत्त्व फुलू लागले. परिणामी मसोजी हे नंदलालांच्या शिष्यांपैकी एक प्रतिभाशाली शिष्य म्हणून प्रसिद्धीस आले.

मसोजींनी ‘वॉश’ शैलीवर लवकरच प्रावीण्य मिळवले. अवनीन्द्रनाथ व नंदलाल यांच्याप्रमाणे त्यांनी ग्रमीण आशयाची चित्रे रंगवली. ‘वॉश’ तंत्रातील तरल परिणाम व आल्हाददायक सौम्यता, त्यांनी हाताळलेल्या भावपूर्ण ख्रिस्ती विषयांकरिता उपयुक्त ठरली. या माध्यमातले त्यांचे सर्वांत गाजलेले चित्र म्हणजे ‘मिडनाइट अरेस्ट’. महात्मा गांधींना १९२९ मध्ये साबरमती आश्रमात अटक झाली. या घटनेमुळे उमटलेले दु:ख मसोजींनी कुंचल्यावाटे मोकळे केले. मसोजींचे हे चित्र नंतर काँग्रेसच्या अधिवेशनात ठेवण्यात आले, ते पंडित जवाहरलाल नेहरूंसह अनेक थोरांच्या प्रशंसेचा विषय बनले.

विनायक मसोजींना आंतरिक प्रेरणा देणार्‍या येशू ख्रिस्ताच्या जीवनावरील त्यांच्या चित्रात येशू ख्रिस्त व त्यातील इतर मानवाकृती धोतर-कुडता व उपरणे अशा वेषात मसोजींनीसादर केल्या आहेत. ‘वर्ल्ड एन्काउंटर’ व ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’ या मासिकांच्या मुखपृष्ठांवरही त्यांची ही चित्रे छापली गेली. परदेशातील काही चर्चमध्ये या प्रकारची मसोजींची चित्रे विराजमान आहेत. नागपूरच्या ‘ऑल सेंट्स कॅथेड्रल’मध्ये येशूच्या जीवनावरील ‘लास्ट सपर’ नावाचे चित्र असून यातील येशूचा परिवेष तर भारतीय ढंगाचा आहेच; पण पार्श्‍वभूमीतील वास्तुचित्रणही शांतिनिकेतनामधील आश्रमवास्तूपासून प्रेरित आहे.

वुडकट माध्यमाला शांतिनिकेतनामध्ये सर्जनात्मक भावाविष्काराचे एक प्रमुख माध्यम म्हणून महत्त्व होते. १९२३ साली फ्रेंच प्रिंटमेकर मॅडम अँद्रे कारपेलेस यांच्या शांतिनिकेतन भेटीनंतरमहत्त्व आले. कागदावर व रेशमी वस्त्रावर छापलेल्या महात्मा गांधी, येशू ख्रिस्त, विनोबा भावे आणि गुरुदेव टागोर यांच्या व्यक्तिरेखा त्यांनी वुडकटमध्ये साकारल्या. याशिवाय शांतिनिकेतनात असताना मसोजींनी भुवनेश्‍वर, कोणार्क, नालंदा, बोधगया अशा ठिकाणी प्रवास केला. या स्थळांची विविध वैशिष्ट्ये पेन अ‍ॅण्ड इंक, जलरंग, ग्वॉश इ. माध्यमे मोजक्या रेषा व सीमित रंगछटा वापरूनही परिणामकारकरीत्या टिपली. मसोजी यांचे शिक्षक नंदलाल बोस व बिनोद बिहारी मुखर्जी हे जपानचा प्रवास करून आल्यावर त्यांच्यावर तेथील निसर्गचित्रणशैली व ब्रशतंत्राचा प्रभाव पडला. साहजिकच मसोजींच्याही चित्रनिर्मितीवरही असा प्रभाव दिसून येतो.

जपानी फोटोग्रफर हासेगावा, १९२९ मध्ये एका मोठ्या वैयक्तिक दु:खातून सावरण्यासाठी टागोरांच्या आश्रमात आले असता मन:शांतीसाठी टागोरांनी त्यांना मसोजींसोबत हिमालय-कैलास यात्रेसाठी पाठवले. या खडतर प्रवासात हिमालयाच्या असीम सौंदर्याने या द्वयींना भुरळ घातली. मसोजींनी निसर्गाच्या विविध छटा जलरंगात किंवा रेखाटनरूपात, तर हासेगावाने ते उदात्त रूप छायाचित्रांत उतरवले. हिमालय भेटीतील मसोजींचे सर्वांत गाजलेले चित्र म्हणजे ‘कैलास’. या प्रवासातील चित्रे इवल्याशा पोस्टकार्डवजा श्‍वेत-श्याम छटांतील निसर्गदृश्यांपासून ते मोठ्या, भव्य आकाराची आहेत. धुके पांघरलेला निसर्ग, काळेभोर पावसाळी ढग, सूर्यकिरणात चकाकणारे नदीचे पात्र, शुभ्र बर्फाच्छादित हिमशिखरे असे कित्येक क्षण त्यांनी समर्थपणे चित्रबद्ध केले. मसोजींच्या निरपेक्ष स्नेहभावामुळे भारावून मायदेशी परतल्यावर विनायक मसोजींवर जपानी भाषेतून लिहिलेल्या एका पुस्तकाद्वारे हासेगावांनी आपली कृतज्ञताव्यक्त केली.

तसेच १९३४ मध्ये मसोजींनी माराटोका उमेझुमी या जपानी व्यक्तीसोबत भारतातील बौद्ध धर्माशी संबंधित अनेक स्थळांना भेटी दिल्या व बौद्ध विषयांवर एक चित्रमालिकाही साकारली.

चीन-जपानादी पौर्वात्य देशांतील चित्रशैलीचा ठसा इतर बंगाल पुनरुत्थानवादी चित्रकारांप्रमाणे मसोजींवरही स्पष्टपणे दिसतो. मोजक्या आकाराच्या संकल्पना व ब्रशचे अतिशय ओघवते फटकारे त्यांच्या चित्रांमध्ये पौर्वात्य प्रेरणेतून आले. रंगवायला पृष्ठभाग म्हणून रेशमी वस्त्राचा वापर हा प्रभावही तिकडचाच. बंगाल शैलीतील अनेक चित्रकारांप्रमाणे चित्रात सही करावयास जपानी ठसा (सील) वापरून त्याच्याजवळ मसोजी स्वत:ची सही मात्र इंग्रजीत करत. विविध पशू-पक्षी, तसेच अजिंठा लेण्यांतील भित्तिचित्रांपासून महात्मा गांधी, विनोबा भावे, रवीन्द्रनाथ टागोरादी व्यक्तींची व ग्रमीण जीवन बायबल या विषयांवरची त्यांची रेखाचित्रे मोठ्या प्रमाणावर आहेत.

मसोजी सातत्याने कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवत राहिले. नंदलाल बोस यांना मसोजींनी बडोद्याच्या कीर्ती मंदिरातील, तसेच द्वारकेतीलभित्तिचित्र पूर्ण करण्यास साहाय्य केले. फैजपूर काँग्रेस अधिवेशनाची सजावटही मसोजींच्याच हातची. प्रख्यात इतिहासकार गं.दे. खानोलकर यांच्या ग्रंथासाठी मसोजींनी चित्रे रेखाटली.

शांतिनिकेतनामधील १९२१ ते १९५१ हा तीस वर्षांचा प्रदीर्घ कालखंड मसोजींच्या आयुष्यातील सुवर्णकाळ ठरला व संवेदनशील मनाच्या व हुन्नरी स्वभावाच्या या चित्रकाराने आपला ठसा शांतिनिकेतनामध्ये उमटवला. चित्रकलेव्यतिरिक्त धातुकला, चर्मपत्रांवरील कोरीव काम (एम्बॉसिंग), काष्ठ शिल्पकला अशा विभिन्न कलाही त्यांनी आत्मसात केल्या. आश्रमात ते इसराज वाजवायला शिकले. गुरुदेवांच्या भक्तिगीतांच्या अथवा कोणत्याही कार्यक्रमाला मसोजींच्या इसराजची सुमधुर साथ असे. सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक उत्सव, चिनी, जपानी अथवा राजकीय नेत्यांची भेट; प्रसंग कोणताही असो, रंगमंच सजवणे, पाहुण्यांची व्यवस्था पाहणे इ. कामांत व क्रीडा स्पर्धांतही त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग असे.

कलाशिक्षण पूर्ण झाल्यावर मसोजींची १९२८मध्ये शांतिनिकेतन येथे कला भुवनात शिक्षक म्हणून नेमणूक झाली. पुढे १९३० मध्ये नंदलाल बोस यांच्या पुढाकाराने नंदलाल, मसोजी व प्रभात मोहन बंधोपाध्याय या त्रयींनी शांतिनिकेतनाजवळ जमीन खरेदी केली. तिथे नंदलाल यांनी ‘कारू संघ’ स्थापित केला. या कलाकार संघात मसोजींसह राम किंकर, सुधीर खास्तगीर आदी सभासद होते. ही मंडळी मोठ्या प्रमाणावर ग्रंथांसाठी रेखाटन व मुखपृष्ठे करीत व या सचित्र ग्रंथांच्या विक्रीची जबाबदारी प्रभात मोहन पार पाडत.

शांतिनिकेतनात मसोजी रमले होते; पण त्यांचे वैयक्तिक जीवन मात्र फुलायचा योग आलाच नाही. एका बड्या अधिकार्‍याची कन्या सोनाली सेन रॉय १९४८-४९ च्या दरम्यान शांतिनिकेतनाला शिक्षणासाठी आली असता तिचा जीव उंचपुऱ्या, देखण्या मसोजींवर जडला. परंतु या प्रलोभनापासून ते अलिप्त राहिले. त्या वेळी मसोजी पन्नास वर्षांचे होते, तर सोनाली अठरा वर्षांची. (पुढे ती प्रसिद्ध युरोपियन सिनेतारका इन्ग्रिड बर्गमन हिचा इटालियन नवरा व प्रसिद्ध दिग्दर्शक रोझॅलिनी याच्यासोबत युरोपमध्ये निघून गेली.) तसेच मसोजींचे नाव पंडित नेहरू यांच्या भगिनी कृष्णा हथीसिंह यांच्याशी, त्या रवींद्र संगीतावर आधारित नृत्य-नाट्याचे प्रयोग करीत असण्याच्या काळात जोडले गेले. परंतु मसोजी आजन्म अविवाहित राहिले.

अवनीन्द्रनाथांचे १९५१ मध्ये निधन झाले. टागोरांनी रूपाकार दिलेले शांतिनिकेतन व पुढे तिथे झालेले बदल यांत प्रचंड तफावत होती. एव्हांना मसोजी उपप्राचार्यपदावर पोहोचले होते. नंदलाल बोस निवृत्त झाल्यानंतर मसोजी हेच कला भुवनाचे प्राचार्य होणार होते. पण बंगाली राज्यात या परप्रांतीय मराठी माणसाला डावलण्यात आले. शासकीय कारभार, अंतर्गत मतभेदांना कंटाळून मसोजींनी पदाचा राजीनामा दिला व बंगभूमी सोडून ते १९५१ मध्ये महाराष्ट्रात नागपूरला आले.

नागपूरमधील आपल्या भावाच्या मायेच्या सावलीत राहण्यापेक्षा मसोजींनी गोपाळनगर येथे जागा भाड्याने घेऊन स्वावलंबी राहणे पत्करले. शांतिनिकेतनाच्या आठवणींची शिदोरी साथीला होतीच. मसोजींनी आपली चित्रसाधना अविरत सुरू ठेवली. त्यांनी बायबलवरील अनेक चित्रे, तसेच निसर्गदृश्ये या काळात रंगवली.

नागपुरात अनेक क्षेत्रांतील नामांकित व्यक्तींच्या सहवासात येऊनही मुळात एकांतप्रिय असलेले मसोजी समाजापासून काहीसे अलिप्तच राहिले. विनायक मसोजी ख्रिस्तवासी झाल्यावर १९७७ मध्ये राज्यकला प्रदर्शनात मसोजींच्या कलाकृती प्रदर्शित करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

जागतिक मराठी परिषदेतर्फे १९९० मध्ये आबालाल रहिमान व विनायक मसोजी यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले व त्या निमित्ताने ‘तपस्वी’ ही चित्रपुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली. डॉ. भांजीभाई पाटणकर यांनी लिहिलेले ‘विनायक मसोजी... एक समर्पित कलाजीवन’ हे चरित्र प्रकाशित झाले आहे.

- डॉ. मनीषा पाटील

 

मसोजी, विनायक शिवराम