Skip to main content
x

मुगवे, मधुकर गणपत

       धुकर गणपत मुगवे यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे शिक्षण विल्सन हायस्कूल, सेंट झेवियर्स हायस्कूल व एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये पार पडले. १९४० मध्ये महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाला असतानाच मधुकर व त्यांचे मोठे भाऊ दत्तात्रेय यांनी कलकत्ता (कोलकाता) येथे राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या दुहेरीची स्पर्धा जिंकून नेत्रदीपक यश मिळवले होते.

        मात्र इतिहास या विषयात पदवी घेतल्यानंतर १९४२ मध्ये मधुकर मुगवे तत्कालीन मुंबई प्रांताच्या पोलीस खात्यात दाखल झाले.

        १९४७ सालच्या मे महिन्यापासून ‘इंपीरियल पोलीस सर्व्हिस’ या ब्रिटिश व्यवस्थेच्या जागी ‘इंडियन पोलीस सर्व्हिस’ ही नवी प्रणाली अस्तित्वात आली. मधुकर मुगवे यांना या नव्या प्रणालीत ‘सुपरिन्टेंडंट ऑफ पोलीस’ या पदावर बढती देऊन १९४२ च्या वरिष्ठतेसह सामावून घेण्यात आले.

         त्यानंतर तत्कालीन मुंबई प्रांतातल्या (जो अहमदाबादपासून कारवारपर्यंत पसरलेला होता) सोलापूर, अलिबाग, मेहसाणा, सांगली, पुणे इत्यादी अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख म्हणजे डी.सी.पी. (डिस्ट्रिक्ट सुपरिन्टेंडंट ऑफ पोलीस) म्हणून उत्तम कामगिरी बजावली.

        १९५७ साली ते पुण्याचे जिल्हा पोलीस प्रमुख असताना संयुक्त महाराष्ट्र व गोवामुक्ती ही दोन्ही आंदोलने ऐन भरात होती. दोन्ही आंदोलनांचे मुख्य केंद्र पुणे हेच होते. केंद्र सरकार संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाकडे अनुदार दृष्टीने बघत असल्यामुळे आणि गोव्याचे पोर्तुगीज पोलीस मुक्ती आंदोलकांवर जबरदस्त दडपशाही करीत असल्यामुळे वातावरण अतिशय तंग होते. अशा स्थितीत मधुकर मुगवे यांनी कौशल्याने परिस्थिती हाताळून कायदा आणि सुव्यवस्था बिघडू दिली नाही.

        मे १९५७ मध्ये ‘डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस’ (डी.आय.जी.) या पदावर बढती मिळून त्यांची राजकोट येथे बदली झाली. तिथे त्यांनी हुसेन कोडिया नावाच्या कुख्यात गुंडाला ठार मारून पोलीस खात्याची शान एकदम उंचावली. हुसेन कोडिया हा गुंड पाकिस्तानातून अवैध मार्गाने भारतात पळून आला होता. तो जुनागडच्या परिसरात राहत असे आणि त्याने एका फौजदाराला ठार मारले होते. मधुकर मुगवे आणि त्यांच्या पोलीस दलाने जामनगर-जुनागड-राजकोट परिसरातील डोंगराळ भागात हुसेन कोडियाचा पिच्छा पुरवून सर्व बाजूंनी त्याला कोंडले. पोलिसांच्या शरणागतीच्या आवाहनाला उत्तर म्हणून त्याने बारा बोअर बंदुकीतून पोलिसांवर गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्याला गोळी घालून ठार करण्यात आले.

        १९६०मध्ये पोलीस अतिरिक्त उपप्रमुख (अ‍ॅडिशनल डी.आय.जी.) म्हणून मुगवे परत मुंबईला आले. १९६५ साली नागपूर येथे पोलीस आयुक्त (कमिशनर ऑफ पोलीस-सी.पी.) हे नवे पद निर्माण होऊन मधुकर मुगवे यांची तिथे नेमणूक झाली.

          १९६६ मध्ये पुन्हा ते मुंबईत सी.आय.डी. खात्याचे डी.आय.जी. इंटेलिजन्स या पदावर आले. ते १९७३ पर्यंत म्हणजे सात वर्षे तिथे होते. या अत्यंत महत्त्वाच्या पदावर इतका दीर्घकाळ टिकलेले ते पहिलेच अधिकारी होत.

         १९७३ ते १९७५ या काळात ते मुंबईचे पोलीस आयुक्त झाले. १९७५ ते १९७७ या कालखंडात महाराष्ट्र राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंध खात्याचे संचालक म्हणून काम केल्यावर, कारकिर्दीच्या अखेरीस ते इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस (आय.जी.पी.) या राज्यातील त्या वेळच्या सर्वोच्च पदावर विराजमान होऊन १९७८मध्ये निवृत्त झाले.

- दीपक राव

मुगवे, मधुकर गणपत