Skip to main content
x

मुक्तानंद,स्वामी

     ‘गुरुदेव सिद्धपीठ’ या गणेशपुरीतील स्वामी नित्यानंदबाबा यांचे उत्तराधिकारी म्हणून पुढे प्रसिद्धी पावलेल्या श्री मुक्तानंद स्वामींचा जन्म कर्नाटक राज्यातील नेत्रावती नदीकाठच्या एका निसर्गरम्य खेड्यात, कुसुमेश्वरी मातेच्या पोटी झाला.

कर्नाटक राज्यातील धर्मस्थळ येथील तीर्थक्षेत्रातील श्रीमंजुनाथाला तिने पुत्रासाठी साकडे घातले होते. बुद्धजयंतीच्या दिवशी मुक्तानंद यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव कृष्ण. कृष्ण शाळेत खूप हुशार होते; परंतु त्यांचे मन नेहमी वेगळ्याच विश्वात विहार करीत असे. घरातील गडगंज श्रीमंतीचेही त्यांना अप्रूप नव्हते. एकदा त्यांच्या आईने त्यांना गावाजवळील एका पर्वतावर एका मुस्लीम मौलवीच्या उत्सवासाठी नेले. तेथे कृष्णाला अचानक नित्यानंदबाबांनी दर्शन दिले, असे म्हणतात. नित्यानंदबाबांना लहान मुले प्रिय होती. त्यांनी कृष्णाला सोबत घेतले. या विलक्षण अनुभूतीने कृष्ण भारावून गेला. त्याच्या अंतर्मनात अद्भुत चैतन्याची लहर उमटली. तेव्हापासून त्याचे लक्ष शाळा, घर, खेळ, खाण्या-पिण्याची मौज या ऐहिक गोष्टींपासून उडू लागले.

आपण कोणीतरी साधू, योगी बनावे हा विचार त्याच्या मनात बळावला. एकट्यानेच जंगलात, देवळात राहणे, जे मिळेल ते खाणे या गोष्टींची तयारी ठेवून कृष्णा एक दिवस घराबाहेर पडला. वय होते आठ-नऊ वर्षांचे. त्याने प्रथम जंगलात वणवण केली. तेथून बाहेर पडल्यावर ट्रकवाल्याने त्याला म्हैसूरला आणून सोडले.

म्हैसूरला कित्येक दिवसांच्या भटकंतीनंतर त्याला कुणीतरी तेथील सिद्धारूढ स्वामींच्या मठात आणून सोडले. इथेच कृष्णाच्या आयुष्याला प्रयोजन सापडले. सिद्धारूढ स्वामींकडे प्रथम बुद्धीवान कृष्णाला संस्कृत शिकवले गेले. त्यानंतर सात वर्षे कृष्णाने वेद, योग, उपनिषद यांचा अभ्यास केला. वेदाभ्यास, योग आणि संपूर्ण नि:संग, त्यागी झाल्याची खात्री पटल्यानंतर सिद्धारूढ स्वामींनी कृष्णाला संन्याशाची दीक्षा दिली आणि नामाभिधानही केले, ‘मुक्तानंद’. त्या वेळी कृष्णाचे वय अठरा-एकोणीस असेल. संन्यास दीक्षा प्राप्त केल्यानंतर मुक्तानंदांनी सिद्धारूढ स्वामींचा मठ स्वामींच्या परवानगीने सोडला. तेथून त्यांनी कर्नाटकातच श्री मुप्पीन आर्यस्वामींच्या मठात चार वर्षे राहून आर्यस्वामींच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला. तो पूर्ण झाल्यावर पुन्हा तो आश्रम सोडून त्यांनी पायी भटकणे सुरू केले. या भ्रमणात त्यांनी कर्नाटकातील अनेक जंगले, डोंगर तुडवले. तेथील अपरिचित वनस्पतींचा अभ्यास केला. औषधी गुण हेरले. हा अनुभव घेऊन ते मराठवाड्यात म्हणजे महाराष्ट्रात प्रवेश करते झाले.

मुक्तानंद मजल-दरमजल करीत चाळीसगाव येथे पोहोचले. तेथे एक पडका वाडा होता. लोक त्या वाड्यात जायला भीत असत. तेथे मुक्तानंदांनी वास्तव्य करून आश्रम उभा केला. त्या आश्रमात एकदा त्याच परिसरातील एक सिद्धयोगी लिंगानंद स्वामी मुक्तानंदांच्या भेटीला आले. त्या दिवशी लिंगानंदांंनी परिसरातील कुष्ठरोग्यांसाठी भंडाऱ्याचे  योजन केले. त्या वेळी त्यांनी मुक्तानंदांना एका कुष्ठरोग्यास अन्न भरविण्यास सांगितले. मुक्तानंदांनी मुश्किलीने त्या जखमा, दुर्गंधीने लिप्त झालेल्या रोग्याला भरवले. लिंगानंदांनी मग भरवताना खाली पडलेले अन्न मुक्तानंदांना खायला सांगितले. मुक्तानंदांना ते शक्य झाले नाही, तेव्हा लिंगानंदांनी ते उष्टे अन्न खाऊन टाकले आणि ते मुक्तानंदांना म्हणाले, ‘‘तो कुष्ठरोगी नव्हता. साक्षात विश्वकर्त्याने तुला दर्शन दिले आहे.’’ हे ऐकून मुक्तानंद लिंगानंदांच्या चरणी लीन झाले. 

चाळीसगावातील आश्रमातून काही काळाने बाहेर पडून मुक्तानंद भटकत भटकत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात आले. तेथील वज्रेश्वरी येथील वज्रगडावरच्या वज्रेश्वरी मातेचे दर्शन घेऊन ते जवळच्याच गणेशपुरी येथे स्वामी नित्यानंदांच्या आश्रमात गेले. ते वर्ष होते १९४७. तेथे स्वामी नित्यानंदबाबा त्यांची वाटच पाहत होते. मुक्तानंदांनाही लहानपणीची घटना आठवली. नित्यानंदांनी मुक्तानंदांना  शक्तिपाताची दीक्षा दिली. त्यानंतर पुन्हा तपभर मुक्तानंदांनी अभ्यास केला.  जवळच्या तुंगारेश्वर जंगलात जाऊन तेथील वनस्पतींचा अभ्यास केला. १९६१ साली स्वामी नित्यानंदबाबांनी समाधी घेतल्यानंतर गुरुदेव आश्रमाची जबाबदारी स्वामी मुक्तानंदांवर आली. अर्थात, ती योजना नित्यानंदबाबांचीच होती. त्यानुसार मुक्तानंद यांनी गणेशपुरी हेच आपले कायम वास्तव्यस्थान निश्चित केले आणि तेथूनच सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जर्मनी, इटली, इंग्लंड, फ्रान्स येथे विदेशवाऱ्या केल्या, त्या गुरुकृपा आणि शक्तिपात दीक्षा परदेशी साधकांना देण्यासाठी. ऐंशीच्या दशकात मुक्तानंद यांनी श्री गुरुदेव आश्रमाचा विस्तार भोवतालची जमीन खरेदी करून केला. गणेशपुरीच्या आसपासच्या आदिवासी बहुल खेड्यातील लोकांना घरे, मुलांना दूध, शाळा, वैद्यकीय सेवा, अन्नछत्रेे, कपडे वितरण आदी सेवा मुक्तानंद यांनी सुरू केल्या.

आसपासच्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. तेथील अकलोली, वज्रेश्वरी, गणेशपुरी येथील औषधी गरम पाण्याच्या कुंडांची पुनर्बांधणी करून लोकांना सुविधा पुरविल्या, रस्ते बांधले. मुक्तानंद स्वामींनी अध्यात्माद्वारे ‘धर्म’ समजावून दिला. त्यांच्या आश्रमात धर्म, जात, पंथ हे भेद नव्हते. मुक्तानंदांनी पुढे श्रीगुरुदेव आश्रमात श्रीनित्यानंदबाबांची पंचधातूची मूर्ती व पादुका प्रतिष्ठापित केल्या आणि ध्यान सभागृह बांधले. या आश्रमाचे ‘गुरुदेव सिद्धपीठ’ असे नामकरण झाले. आज जगभरातील अनेक शहरांत नित्यानंदांची मंदिरे व सिद्धपीठे आहेत. गुरुमाई चिद्विलासानंदजींच्या हाती सिद्धपीठाचा कारभार सोपवून, मुक्तानंदस्वामी अनंतात विलीन झाले.

  — संदीप राऊत

मुक्तानंद,स्वामी