Skip to main content
x

मुक्तिबोध, शरच्चंद्र माधव

     मार्क्सवादी जाणिवेचे मराठी-तील एक प्रमुख साहित्यिक शरच्चंद्र मुक्तिबोध यांचा जन्म इंदूरला झाला. त्यांचे शिक्षण एम.ए., एलएल.बी.पर्यंत झाले आणि नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयामध्ये त्यांनी अध्यापन केले. मार्क्सवादी वैचारिक आणि सैद्धान्तिक अधिष्ठानावर ललित लेखन आणि समीक्षात्मक / वैचारिक लेखन करून शरच्चंद्र मुक्तिबोधांनी मराठी साहित्यविश्वात स्वतःचे आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे.

     ‘नवी मळवाट’ हे त्यांचे कवितेचे पहिले पुस्तक १९४९मध्ये प्रकाशित झाले. पहिली कादंबरी ‘क्षिप्रा’ ही १९५४ मध्ये प्रकाशित झाली आणि पहिले समीक्षात्मक पुस्तक ‘काही निबंध’ १९६२ मध्ये प्रकाशित झाले.

     आपल्या लेखनाच्या पूर्वपर्वातच शरच्चंद्र मुक्तिबोधांनी कविता, कादंबरी आणि समीक्षा या प्रांतांत आपला अधिकार प्रस्थापित केला होता. ह्या तिन्ही वाङ्मयात मुक्तिबोध एकाच वेळी लेखन करीत होते. मुक्तिबोधांच्या कवितेची आणि वाङ्मयीन प्रकृतीची जातकुळी तपासून पाहायची झाल्यास पुढील कविता अधिक अर्थघन म्हणून दाखविता येईल.

     ‘फाडीन या तमाचे मी पटावरी पट

      गिळीन या विषाचे मी घटावरी घट

      या तमपटाआड विश्वसुंदरी उदास

     तिच्या पदचुंबनेच ज्वराचा निरास’

     (‘नवी मळवाट’, पृ.७)

     किंवा

     ‘फोडा ते घुमट खुले निंच खुल्या क्षितिजाचे

     राख करा श्यामसूर्य गेल्या जुन्या जमान्याचे

     पेटवा पेटवा सारी उरातली अडगळ

     चेतवा चेतवा उरी जीवनाची तळमळ’

     (‘नवी मळवाट’, पृ.७६)

     या कवितेतून व्यक्त होणारी क्रांतिप्रवणता, मार्क्सवादी विचारांशी असलेली बांधीलकी हा त्यांच्या पुढील कवितेत विकसित होणारा धागा होता.

    ‘नवी मळवाट’ नंतर त्यांचा ‘यात्रिक’ हा दुसरा कवितासंग्रह १९५७ मध्ये प्रकाशित झाला. हा काळ म्हणजे मर्ढेकरांच्या कवितेने भारावलेला आणि नवसाहित्याच्या उभारीचा असा काळ होता. विशेष म्हणजे, मार्क्सवादी कवितेशी ज्या कवीचे नाते सांगितले जाते, त्या विंदा करंदीकरांच्याही काव्यलेखनाचा हाच काळ होता.

      ‘सत्याची जात’ (१९९८) हा मुक्तिबोधांचा तिसरा व अखेरचा कवितासंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. मुक्तिबोधांच्या एकूणच कवितेसंबंधीचे आकलन समोर ठेवत रा.भा.पाटणकर म्हणतात - ‘मुक्तिबोधांचे स्वाभाविक क्षेत्र साहित्याचे. बांधीलकी मानणारे एक ध्येयनिष्ठ लेखक हेच त्यांचे समर्पक व पर्याप्त वर्णन ठरेल. वाङ्मयात प्रतीत होणारे त्यांचे व्यक्तित्व एकमार्गी व मनस्वी असे आहे. अशा मनस्वी साहित्यिकाचा इतर प्रकारच्या साहित्यिकांशी विनिमय होणे कठीणच. म्हणून त्यांनी शेवटी शेवटी या प्रकारच्या साहित्यिकांपासून स्वतःला हद्दपार करून घेतले आहे.’ (मुक्तिबोधांचे साहित्य, पृ.१७०)

     केवळ कविताच नव्हे, तर एकूणच वाङ्मयीन व्यक्तित्वाविषयीचे हे आकलन मुक्तिबोधांच्या संदर्भात अधिक बोलके ठरते. क्रांतिप्रवणता आणि मार्क्सवाद ही तत्त्वे त्यांच्या कवितेतून एकजिनसी स्वरूपात व्यक्त होताना दिसतात. त्यांच्या केवळ तीन कवितासंग्रहांनी मुक्तिबोधांना मराठी कवितेत अमर केले आहे.

      त्यांच्या कवितेच्या संदर्भात हे विधान जसे खरे आहे, तसेच ते त्यांच्या कादंबर्‍या व समीक्षेच्या संदर्भातही खरे ठरते. ‘क्षिप्रा’ (१९५४), ‘सरहद्द’ (१९६१) आणि ‘जन हे वोळतु जेथे’ (१९६९) या तीन कादंबर्‍या-कादंबरीत्रयीच्या स्वरूपात लिहून मराठी कादंबरीला त्यांनी एका वेगळ्या वळणावर आणून ठेवले. मराठीतील रोमँटिक प्रकृतीच्या कादंबर्‍यांना फाटा देऊन ज्यांनी या कादंबरीला वास्तववादाच्या, वैचारिकतेच्या बैठकीवर उभी करण्याचे कार्य केले, त्यात शरच्चंद्र मुक्तिबोधांचा मोठा वाटा आहे.

     मार्क्सवादाचे वैचारिक अधिष्ठान ज्या काही मोजक्या मराठी कादंबर्‍यांना प्राप्त झाले, त्यांपैकी मुक्तिबोधांच्या कादंबर्‍यांचा अव्वल म्हणून विचार करावा लागतो. याचबरोबर मराठीतील पहिली अशी कादंबरीत्रयी म्हणूनही सार्थपणे या कादंबर्‍यांचा विचार करावा लागतो. बिशू आणि मधू या दोन भावांच्या उमलत जाणार्‍या, विकसित होणार्‍या व्यक्तिमत्त्वाचा आलेख ‘क्षिप्रा’, ‘सरहद्द’ आणि ‘जन हे वोळतु जेथे’ या कादंबर्‍यांमध्ये चितारला आहे. मध्यप्रदेशातील इंदूर-उज्जैन या परिसरातील स्वातंत्र्यपूर्व काळातील समाजजीवन, या समाजजीवनाचे बदलते रंग या कादंबरीत्रयीमध्ये मुक्तिबोधांनी रेखाटले आहेत.

      या कादंबर्‍यांचा लेखनकाळ हा जरी १९५४ ते १९६९ या पंधरा वर्षांतला असला, तरी यात येणारी वर्णने, कालिक मांडणी ही स्वातंत्र्याची चळवळ, दुसरे महायुद्ध या दरम्यानची आहे. तत्कालीन व्यक्ती आणि समष्टीच्या नात्याचा कलात्मक पातळीवरचा वेध मुक्तिबोधांनी या त्रयीच्या निमित्ताने घेतलेला आहे. मुक्तिबोध फक्त या तीन कादंबर्‍यांवरच थांबले. कदाचित, त्यांनी आणखी पुढे हे कादंबरीलेखन सुरू ठेवले असते तर त्यांनी गुणवत्तेने आणि वैचारिकदृष्ट्या संपन्न अशा कादंबर्‍या निश्चितच मराठीला दिल्या असत्या.

      कविता आणि कादंबरी या वाङ्मयप्रकारांसोबतच मुक्तिबोधांनी समीक्षात्मक / वैचारिक प्रकृतीचेही लेखन ‘काही निबंध’ आणि ‘सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य’ या दोन पुस्तकांच्या माध्यमातून केले आहे. प्राचीन भारतीय साहित्यातील रससिद्धान्त आणि मर्ढेकरांचा लयसिद्धान्त या दोन्ही वैचारिक प्रवाशांना खोडून काढत मुक्तिबोधांनी मानुषतेचा सिद्धान्त ‘सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य’ या ग्रंथातून मांडला आहे.

      समीक्षक म्हणून मुक्तिबोधांच्या एकूणच वाङ्मयीन पिंडाचा विचार करताना पुढील विधान अधिक अर्थपूर्ण असे आहे: ‘कोणत्याही कलाकृतीचा जन्म एका व्यक्तीच्या मनात होत असला तरी तिचा वाङ्मयकृतीपणा जो प्राप्त होतो, तो कोणाच्याही व्यक्तिगत संदर्भातील तिच्या स्थानावर अवलंबून नसून समाजजीवनात रूढ असलेल्या वाङ्मयीन व सांस्कृतिक परंपरा, संकल्पनाव्यूह इत्यादीमधील तिच्या स्थानावर अवलंबून असतो. एकूण वाङ्मयाची समाजाभिमुखता लक्षात घेतल्यास यापुढे जाऊन असेही म्हणणे योग्य ठरेल, की वाङ्मयकृतीला तिचा वाङ्मयकृतीपणा देणार्‍या वाङ्मयीन परंपरेलाच आकार देणार्‍या समाजजीवनाला, समाजरूपी विशिष्ट - संपृक्त सामान्याला वाङ्मयसमीक्षेत व्यक्तिजीवनापेक्षा जास्त महत्त्व मिळणे योग्यच आहे.’ (मुक्तिबोधांचे साहित्य: पृ.१८५) हे विधान मुक्तिबोधांच्या समष्टिप्रधान व्यक्तिमत्त्वाच्या संदर्भात अधिक बोलके आहे.

      मुक्तिबोधांची ही वैचारिक बैठक जरी समष्टीच्या संदर्भात महत्त्वाची असली, तरी कला व समष्टी यांचे द्वैत हे मुक्तिबोधांनी कधीच नाकारले नाही. सामाजिक बांधीलकीच्यापलीकडचा विचार मुक्तिबोध एका वेगळ्या पातळीवर जाऊन करतात. तो विचारही खुद्द त्यांच्याच शब्दांत समजून घेणे अधिक महत्त्वाचा ठरावा. ते म्हणतात -

     ‘जीवनपरिवर्तनाचे शास्त्र कळणे म्हणजे जीवन कळणे नव्हे. समस्येचे रूप कळणे म्हणजे माणूस कळणे नव्हे. मानवी जीवन हे चिरगतिशील, नित्यनूतन रूप धारण करणारे आहे. मानवी जीवनाचे व अनुभवाचे अनेक प्रकार व अनेक पातळ्या असू शकतात. कलावंतांचा संबंध मानवी जीवनाच्या सुखदुःखाशी असतो. तो जसा संकुचित असू शकणार नाही, तसाच तो प्रणालीपीडित व प्रणालीसीमितही असू शकणार नाही. उलट, कलावंताची साक्ष विचारप्रणालींनाही मोलाची व महत्त्वाची मानावी लागेल’. (नवी मळवाट : प्रस्तावना : पृ.३१)

     कविता, कादंबरी आणि समीक्षेच्या क्षेत्रांत आपल्या नावाचा अमीट ठसा उमटविणार्‍या या प्रतिभावंत लेखकाला त्यांच्या ‘सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य’ या समीक्षणात्मक ग्रंथासाठी १९७९ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार बहाल करण्यात आला. समष्टीला प्राधान्य देणार्‍या मुक्तिबोधांनी मात्र स्वतःला वाङ्मयीन संस्था, संमेलने, सोहळे यांपासून कटाक्षाने दूर ठेवले.

- डॉ. रवींद्र शोभणे

मुक्तिबोध, शरच्चंद्र माधव