Skip to main content
x

मुळे, कृष्णराव गणेश

         कृष्णराव गणेश मुळे हे आधुनिक काळातील एक महत्त्वाचे भारतीय संगीतशास्त्रकार होते व त्यांचे योगदान तत्कालीन व नंतरच्याही अनेक शास्त्रकारांनी आदरणीय मानले आहे. कृष्णराव गणेश मुळे यांचा जन्म एका निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात झाला व त्यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. पुण्यातील गायन समाजाचे संस्थापक सदस्य, बीनकार, सतारवादक शास्त्रकार असणार्‍या पुरुषोत्तम गणेश तथा अण्णा घारपुरे (१८४२-१९२०) यांनी मुळे यांना दहा वर्षे बीन व सतारीची तालीम दिली. नंतर ते ग्वाल्हेरला गेले व तेथे गणपतराव कृष्णराव आपटे (उस्ताद हद्दू खाँचे शिष्य असणार्‍या बाबा दीक्षित यांचे शिष्य) यांच्याकडे मुळ्यांनी बारा वर्षे ग्वाल्हेर घराण्यातील धृपद व ख्यालगायन, तबला वादनाची तालीम घेतली.

        पुढे पुण्यात विख्यात बीनकार बंदे अली खाँ व त्यांची पत्नी चुन्ना यांचा दोन वर्षे सांगीतिक सहवास लाभल्याने कृष्णराव मुळे बीन हे वाद्यही उत्तम वाजवू लागले. या प्रदीर्घ सांगीतिक व्यासंगाने त्यांचे व्यक्तित्व समृद्ध झाले. गायनात बंदिशीच्या अर्थाच्या अंगाने उपज, तसेच बीनवर सुरेल मुलायम आलापचारी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. उपजीविकेसाठी मुळे मुंबईत स्थिरावले. शेठ गोकूळदास या संगीतप्रेमी रसिकाने आपल्या माधवजी धरमसी मिलमध्ये त्यांना नोकरी दिली. तसेच त्यांनी दादर येथे ‘वीणावादन संगीत विद्यालया’द्वारे संगीताचा प्रसार केला. शरच्चंद्र आरोलकर, ब्रह्मे, जोगळेकर, तसेच चित्रकार अंबिका धुरंधर हे त्यांचे काही शिष्य होते.

        कृष्णराव मुळे वाद्यांची बनावट व दुरुस्तीही उत्तम करीत. ‘पेटीतंबोरा’ हे सूरसोट्यापेक्षा अधिक गुंजनयुक्त आधारस्वर देणारे, चौकोनी आकाराचे, चलसुलभ वाद्य त्यांनी बनवले होते. (१९८० च्या दशकानंतर या तर्‍हेचे तंबोरे बनवले व वापरलेही गेले, मात्र मुळ्यांच्या काळात ही कल्पना नवी होती.)

        ते व्यावसायिक कलावंत नव्हते व त्यांनी संगीतावर उपजीविका केली नाही, तरीही त्यांचा संगीतातील अधिकार तत्कालीन अनेक कलाकार मानत असत. गायकीची उत्तम जाण असणारे शास्त्रकार म्हणून त्यांचा लौकिक होता. रावसाहेब देवल, लक्ष्मणशास्त्री द्रविड, धुंडिराजशास्त्री बापट, गं.भि. आचरेकर, आबासाहेब मुजुमदार, इ. अशा समकालीन शास्त्रकारांशी मुळ्यांचे वैचारिक आदान-प्रदान चाले. 

         मुळे यांचे ‘सतारशिक्षण - पुस्तक पहिले’ हे सतारवादनाची सांगोपांग माहिती देणारे पुस्तक १९२७ साली प्रसिद्ध झाले. प्रसिद्ध गीतकार स.अ. शुक्ल यांच्या ‘संगीतिका’ (१९३७) या पदसंग्रहासाठी त्यांची लोकप्रिय पदे मुळ्यांनी संगीतलिपिबद्ध केली होती. ‘स्त्री-गीते’ या पुस्तकात त्यांनी महाराष्ट्रातील स्त्रियांच्या ओठी खेळणार्‍या, प्रचलित असणार्‍या पारंपरिक गीतांचे स्वरलेखन प्रसिद्ध करून एका प्रकारे ‘संस्कृतिसंगीतशास्त्रा’च्या संदर्भात मौलिक कार्य केले.

         भरतमुनीकृत नाट्यशास्त्रासारख्या प्राचीन व मध्ययुगीन संस्कृत शास्त्रग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला होता आणि सामवेदकालीन संगीतापासून आधुनिक काळापर्यंत संगीतात झालेल्या स्थित्यंतराबाबत त्यांनी बरेच संशोधन व चिंतन केले होते. त्यांनी ‘भारतीय संगीत भाग १’ (१९३९) या आपल्या ग्रंथात ‘प्राचीन भारतीय संगीतातील मूलतत्त्वे व त्यांचे आजच्या संगीत प्रणालीतही दिसणारे औचित्य’ हा विषय साक्षेपाने मांडला होता. भारतीय संगीतातील प्राचीन संकल्पना आजवर कशा टिकून आहेत व आज अस्तित्वात असणारे संगीत जरी बाह्यरूपाने बदलले असले, तरी त्याचा गाभा अजूनही कसा टिकून आहे याचे उत्तम विश्लेषण त्यांनी केले होते.

          भारतीय संगीताच्या राग-ताल-काव्य या मूलतत्त्वांच्या त्रयीचा मूलगामी असा एकत्रित विचार त्यांनी या ग्रंथात मांडला होता व या सिद्धान्ताचाच क्रियात्मक पाठपुरावा पुढे शरच्चंद्र आरोलकरांनी केलेला दिसतो. या ग्रंथाचे पुढचे दोन भागही ते प्रसिद्ध करणार होते, मात्र त्यांचा मृत्यू झाल्यामुळे हे कार्य अपुरे राहिले.

         शेठ गोकूळदास व त्यांचे पुत्र मथुरादास, पुरुषोत्तमदास यांच्या आर्थिक साहाय्यानंतर वृद्धापकाळात रावबहादूर धुरंधर, डॉ. मोघे या चाहत्या मित्रांनी मुळ्यांना मदत केली. अखेरीस बिलीमोरा येथे उद्योगपती सरदेसाई यांच्याकडे ते आश्रयास राहिले व तेथेच ते मृत्यू पावले. अमेरिकेतील ‘एन्सायक्लोपीडिया ऑॅफ ग्रेट पीपल ऑॅफ दी वर्ल्ड’मध्ये त्यांचे संगीतशास्त्रविषयक कार्य व संक्षिप्त चरित्र प्रकाशित झाल्याने पाश्चात्त्य जगतातही त्यांना प्रसिद्धी मिळाली.

चैतन्य कुंटे

मुळे, कृष्णराव गणेश