Skip to main content
x

मुळे, स्वयंज्योती महाराज

     मर्थ रामदासांचे विचार, कार्य पुढे चालविणारे संतसज्जन, स्वयंज्योती मुळे यांचा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. घराण्याचा पिढीजात वस्त्र निर्मितीचा व्यवसाय त्यांच्या वडिलांपर्यंत चांगला चालवला गेला होता. श्री स्वयंज्योतींनीही आपल्या कौटुंबिक व्यवसायात काही वर्षे छान रस दाखविला. व्यवसाय वाढवण्यास वडिलांना मदत केली. परंतु, पौगंडावस्थेत त्यांना ईश्वरभक्तीची, त्यातून समर्थ विचारांची ओढ लागू लागली होती. त्यांचे लग्न झाले होते, तरी त्यांनी दोनच वर्षांत घराला रामराम ठोकला व ते तपाचरणासाठी निघून गेले. गुलाब महाराज, सीताराम महाराज यांच्या सान्निध्यात त्यांना मिळालेल्या मार्गदर्शनातून त्यांची घर सोडण्याची मानसिक तयारी झाली. धर्मभूषण चौंढे महाराज यांनी दीक्षा दिल्यानंतर त्यांनी समर्थसेवेला वाहून घेण्याचा संकल्प दृढ केला आणि घर सोडले. भूगर्भशास्त्राच्या अभ्यासातून कोणत्या भागात पाणी लागेल त्यानुसार ते शेतकऱ्यांना विहिरी खणण्यास सुचवत. जमिनीचा कस कसा ओळखावा याचे ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत. जंगलातील औषधी वनस्पती वापरून ते मनुष्य आणि जनावरांवरही उपचार करीत असत.

घर सोडल्यानंतर त्यांनी प्रथम अंजनगिरी, गौतम या नाशिक येथील पर्वतांवर पाच वर्षे साधना केली. तेथील औषधी वनस्पतींचा अभ्यास, हवामान, भूगर्भशास्त्र, विज्ञान, तसेच आध्यात्मिक अभ्यास केला. समर्थ रामदासांच्या विचारांचा अभ्यास केला. समर्थ रामदासांचे विचार, कार्य आणि लेखन जनसामान्यांपर्यंत पोहोचवायचे हाच ध्यास घेऊन त्यांनी आयुष्यभर अनेक ठिकाणी भक्तिमंदिरांची स्थापना केली. १९३७ साली सातारा जिल्ह्यात पहिले भक्तिमंदिर उभे राहिले. या मंदिरात श्री समर्थ रामदास, हनुमान, श्रीपाद श्रीवल्लभ, त्रिपुरासुंदरी यांच्या मूर्ती आहेत. मंदिरातील तळघरात नवग्रहांचे अधिष्ठान आहे.

१९३८ साली बांधलेले आंध्र प्रदेशातील अनंतपूरचे ‘निर्गुण मंदिर’ तर ‘श्री मुळे महाराज विठोबा मंदिर’ याच नावाने प्रसिद्ध आहे. श्री स्वयंज्योतींनी सहा वेळा भारत परिक्रमा केल्या. पाँडेचेरी (पुदुच्चेरी) स्थित योगी अरविंद यांच्यासह भारतवर्षातील अनेक ठिकाणच्या साधुसंत पुरुषांशी महाराजांचे मैत्र जुळले होते. त्यातूनच त्यांचे हजारो अनुयायी शिष्य तयार झाले, ज्यांनी मुळे महाराजांचे कार्य पुढे नेले. महाराजांनी दीक्षा दिलेले त्यांचे अनेक शिष्य महंत या उच्चपदापर्यंत पोहोचले आहेत. या महंत शिष्यगणांमध्ये काही भगिनींचादेखील समावेश आहे. महंतपदापर्यंत पोहोचलेल्या इंदूताई शेजवलकर यांनी महाराजांच्या अनंतपूरच्या आश्रमाची जबाबदारी व प्रसारकार्य आठ-नऊ वर्षे केले. त्यांच्याच मार्गाने अनेक भगिनी या सेवाकार्यात मग्न आहेत.

संदीप राऊत

मुळे, स्वयंज्योती महाराज