मुळीक, प्रताप रामचंद्र
पौराणिक, ऐतिहासिक व महापुरुषांच्या जीवनावरील चित्रांद्वारे व चित्रकथा (कॉमिक्स) या चित्रमालिकांद्वारे घराघरांत पोहोचलेले चित्रकार प्रताप मुळीक यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव इंदुमती होते. त्यांचे शालेय शिक्षण मॉडर्न हायस्कूल, पुणे येथे झाले. वडील व थोरले बंधू यांच्या प्रोत्साहनाने पुण्यातील अभिनव कलाविद्यालय येथे त्यांचे रेखा व रंगकला विभागात कलेचे शिक्षण झाले. १९५९ मध्ये त्यांना ‘जी.डी.आर्ट’ ही शासकीय कला पदविका मिळाली. विद्यार्थी असतानाच त्यांना बॉम्बे आर्ट सोसायटी, राज्य कला प्रदर्शन, नाशिक कला निकेतन या संस्थांची पारितोषिके मिळाली होती. त्यांचा विवाह डोंबिवलीच्या कमल भागवत यांच्याबरोबर झाला.
सुरुवातीपासून त्यांचा कल वास्तववादी शैलीकडे व प्रसंग साकार करणारी चित्रे काढण्याकडे होता. चित्रकार एस.एम.पंडित यांना ते गुरुस्थानी मानीत. शिक्षणानंतर सुरुवातीच्या काळात १९६२ मध्ये, त्यांनी चीनशी झालेल्या युद्धावर आधारित चित्रे रंगविली व त्याचे प्रदर्शन पुण्यात केले. त्यातून अर्थार्जन होत नाही हे लक्षात आल्यावर ते साहित्य-वाङ्मय सजावटीकडे वळले. त्यांनी मुख्यत्वे कथाचित्रे, चित्रकथा (कॉमिक्स), मुखपृष्ठे, दिनदर्शिका व प्रसंगचित्रे ह्या प्रकारांत आयुष्यभर कलानिर्मिती केली.
साहित्य सजावटीतील कामात पुस्तके, मासिके यांची मुखपृष्ठे, तसेच कथाचित्रे यांचा समावेश आहे. शालेय वाङ्मय या प्रकारातील विषय सामाजिक, वैज्ञानिक, भौगोलिक, अद्भुत, विनोदी असे अनेकविध होते. विषयाच्या प्रकृतिधर्मानुसार त्यांच्या चित्रांची शैलीही बदलायची. ‘इंडिया बुक हाउस’ या प्रकाशन संस्थेने १९६८ मध्ये लहान मुलांसाठी, पौराणिक व ऐतिहासिक विषयांवर आधारित ‘कॉमिक्स’ हा प्रकार सुरू केला. मुळिकांच्या जोशपूर्ण रेषेचे व रचनेचे विविध प्रयोग असणाऱ्या चित्रांनी ह्या चित्रकथा लोकप्रिय झाल्या. अनेक तरुण चित्रकार त्यांच्या शैलीचे अनुकरण करू लागले.
या चित्रमालिका १९७० ते १९८० च्या दशकांत अनेक भारतीय भाषांत प्रसिद्ध झाल्या. तसेच, भारताबाहेर स्पेन, युगांडा, सिलोन, इंडोनेशिया, फ्रान्स येथील भाषांतही त्यांचे भाषांतर झाले. असे होण्यात त्यांच्या चित्रांचे योगदान मोठे होते. ‘इलस्ट्रेटेड वीकली’ने ‘इन्स्पेक्टर विक्रम’ या चित्रमालिकेसाठी मुळिकांचीच निवड केली.
चित्रकथा या माध्यमाला अभिव्यक्तीच्या दृष्टीने मर्यादा आहेत असे जाणवल्यामुळे मुळिकांनी तेच विषय मोठ्या आकारात कॅनव्हासवर तैलरंग किंवा अॅक्रिलिक रंगात रंगविण्यास सुरुवात केली. पूर्वीची कथाचित्रे किंवा चित्रमालिकांतील चित्रे रेषाप्रधान होती, तर ही चित्रे रंगप्रधान असत. त्यांतून छाया-प्रकाशाचा मनोहारी खेळ व मानवी तसेच प्राण्यांच्या शरीराचा अभ्यास जाणवतो. ‘मराठ्यांनी मोगलांच्या छावणीवर केलेला हल्ला’ हे चित्र याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. रात्रीच्या वेळी हल्ला झाल्याने मोगल सैनिक सैरावैरा पळत सुटले असून, बेगमांची तिरपीट उडालेली चित्रात पाहायला मिळते. हा प्रसंग बर्याच उंचीवरून दिसत असल्याप्रमाणे दाखविला आहे. विविध कोनांतून चित्र रेखाटणे हे मुळिकांच्या चित्राचे वैशिष्ट्य! छावणीच्या आतील प्रकाश व बाहेरील अंधार यांचा सर्व परिसरावर झालेला परिणाम यांचा सुंदर खेळ चित्रात आढळतो. अभ्यासामुळे चित्रात कितीही व्यक्ती असल्या, तरी प्रत्येकाचे चित्रण ते अचूकच करीत. परंतु ह्या प्रकारच्या त्यांच्या सर्वच चित्रांवर ते आयुष्यभर करीत असलेल्या चित्रकथा व त्यांतील कथनपद्धतीचा परिणाम कायम राहिला.
त्यांची अशी चित्रे ‘किर्लोस्कर न्युमॅटिक्स’च्या दिनदर्शिकेवर १९८२ व १९८३ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यांची शिवाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रे पुण्याच्या लालमहालात लावली आहेत. स्वामी चिन्मयानंदांच्या न्यू जर्सी येथील मंदिरासाठी पौराणिक विषयावरील चित्रे काढण्यासाठी मुळिकांना आमंत्रित केले होते. त्यांच्या या चित्रांविषयी स्वामी चिन्मयानंदांनी म्हटले आहे, की आधीच्या आपल्या चित्रांकनपद्धतीत हाडांचा कणखरपणा आणि स्नायूंचे सौष्ठव दाखविणारी मानवी शरीराची रचना आली नव्हती. मुळीक यांनी त्यांच्या स्त्री-पुरुष व्यक्तिरेखांमधून शारीरिक हालचालींमधील अंतर्गत ऊर्जा आणि उपजत सौंदर्य प्रथमच चित्रबद्ध केले.आयुष्यभर त्यांचे कार्य व वास्तव्य पुणे येथे होते. तेथेच वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी त्यांचे निधन झाले.