Skip to main content
x

मुन्शी, अब्दुल रहमान

            शुवैद्यक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना स्वकर्तृत्वाचा ठसा जनमानसात खोलवर रुजल्यामुळे ज्यांच्यावर शाहिरांनी मानवंदना म्हणून पोवाडा रचला असे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे मुन्शी महंमद अब्दुल रहमान होय.

            मुन्शी हे मूळचे हैद्राबाद येथील, पण त्यांनी पशुवैद्यक पदवी घेतल्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळात १९३८मध्ये तत्कालीन निजाम राजवटीमधील बिदर जिल्ह्यातील उदगीर या गावी अश्‍वतज्ज्ञ या पदावर आपल्या सेवेची सुरुवात केली. त्या काळी जातिवंत घोड्यांचा वापर सरकारी सेवेमध्ये कायमस्वरूपी सर्वत्र होत असे. मुन्शी यांनी दैनंदिन कामाबरोबर स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद वाढवला, त्यांच्या पशुपालनामधील अडचणी समजून घेण्यास सुरुवात केली, तत्कालीन भौगोलिक परिस्थितीचा, पीक पद्धतीचा सलग ३ ते ४ वर्षे परिपूर्ण अभ्यास केला. ज्या शेतकऱ्यांना पशुधनाची गरज आहे आणि ज्यांच्याकडे पशुधनाची संख्या जास्त झाली आहे किंवा कौटुंबिक गरजेसाठी पशुधनाची विक्री करायची आहे, अशांसाठी या परिसरामध्ये निश्‍चित बाजारपेठ नसल्यामुळे खरेदीदार व विक्रीदार यांची सर्व बाजूने कुचंबणा होत आहे, हे जाणून मुन्शी यांनी सरकारदरबारी पत्रव्यवहार व सातत्याने पाठपुरावा करून हंडरगुळी येथे कायमस्वरूपी बैलबाजार सुरू केला. आजही या बाजाराचे महत्त्व संपूर्ण तालुक्याने जाणले आहे व शेतकरी आजही मुन्शी यांचे ऋण आवर्जून व्यक्त करतात.

            मुन्शी यांनीच प्रथमतः देवणी गोवंशाला भारतीय गोवंशामध्ये स्वतंत्र प्रजाती म्हणून दर्जा मिळवून दिला आणि शासकीय दप्तरी स्वतंत्र नोंदणीकृत गोवंशाचे स्थान मिळवून दिले. या कार्यासाठी त्यांनी सलग ८ ते ९ वर्षे अभ्यास केला. त्या काळी संपूर्ण जिल्हाभर फिरून हजारो जनावरांचा नोंदपूर्ण अभ्यास करून या गोवंशाची बाह्यवर्णनाची निश्‍चिती अधिकृत केली. या अभ्यासामधून त्यांनी वानेरा, काळाबांडा व देवणी वंशाच्या दोन उपजाती अधिकृत केल्या. त्यांनी १९३८मध्ये दिल्ली येथे आयोजित झालेल्या पशुप्रदर्शनामध्ये मराठवाड्यातील कुणकी येथील कुलकर्णी व गणपतराव पाटील यांच्या गाईंनाही प्रथम पारितोषिक मिळवून दिले. मुन्शी यांनी त्या काळी उदगीर भागामधील सर्व गायराने व डोंगरदऱ्यामधील प्रत्येक चराऊ कुरणाचा अभ्यास केला, तेथील गवतांचे निरीक्षण केले, नमुने गोळा केले व प्रयोगशाळेमध्ये प्रत्येक गवताचा अभ्यास केला व त्यातूनच मारवेल, पवना व काटेकरवेल या स्थानिक गवतांच्या वाणांची नोंद झाली. निजाम राजवटीत त्यांनी १९५२मध्ये देवणी-पैदास केंद्र प्रथम उदगीर जवळील निडेबन या गावी स्थापन केले. आज या केंद्राच्या १७ उपशाखा संपूर्ण मराठवाड्यामध्ये नावारूपास आल्या आहेत. या कार्याचे कौतुक म्हणून स्थानिक स्तरावर अब्दुल रहमान मुन्शी यांना भक्तमडी संस्थानचे मठाधिपती यांच्या हस्ते गोपालकृष्ण पदवी मिळाली. मुन्शी १९६८मध्ये महाराष्ट्र राज्याच्या पशु-संवर्धन खात्याच्या राज्य संचालक पदावरून सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतरही त्यांनी देवणी व लालकंधारी गोवंश, पंढरपुरी म्हैस व उस्मानाबादी शेळी या पशुधनाचा अभ्यास, पैदास व प्रसार करण्याचे काम आस्थेने केले. आजही त्यांच्या विद्यार्थ्यांनी, डॉ. कल्लूरकर, डॉ. पाचेगावकर, डॉ. देशपांडे यांनी, देवणी कॅटल ब्रिडर्स असोसिएशन स्थापन करून आपल्या गुरूंचे कार्य पुढे चालवले आहे.

- मानसी मिलिंद देवल

मुन्शी, अब्दुल रहमान