Skip to main content
x

मुंदडा, बंकटलाल सीताराम

           बंकटलाल सीताराम मुंदडा यांचा जन्म मराठवाड्यामध्ये झाला. कृषी पदवीधर नसतानासुद्धा चिकाटी व जिज्ञासू वृत्तीचे आधारे कृषी क्षेत्रामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अ‍ॅड. बंकटलाल सीताराम मुंदडा हे होय. कायदेविषयक पदवीधर व पेशाने वकील असले तरीदेखील शेतीची तळमळ व शेतकऱ्यांविषयीची कळकळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी स्वतःला शेती संशोधन कार्यात झोकून दिले. त्यांनी १९६४-६५ या काळात संकरित वाणांचा वापर करून कमीत कमी दिवसांत येणार्‍या व अधिक उत्पादन देणार्‍या वाणांच्या लागवडीसाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित केले आणि आर्थिक स्थैर्य मिळवून दिले. त्यांनी ज्वारीमधील सी.एस.एच-१ व कपाशीमधील एच-४ वरलक्षी आणि बटाटा-संकरित वाण यांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी अथक परिश्रम घेतले.

           मुंदडा यांनी १९६६मध्ये ब्राह्मणगाव येथे ३० एकर जमीन घेऊन त्यात नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली. तत्कालीन कृषि-संचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या  नेतृत्वाखाली २५ एकरांवर ज्वारीचा आणि २५ एकरांवर बाजरीचा एकात्मिक बीजोत्पादनाचा कार्यक्रम त्यांनी यशस्वी करून दाखवला. त्यांचा १९७२मध्ये परभणी कृषी विद्यापीठ स्थापन होण्यासाठी झालेल्या आंदोलनामध्ये सहभाग होता.

           महाराष्ट्रात बीजोत्पादनाचा पाया रोवणार्‍या महिको  कंपनीचे संस्थापक बारवाले यांच्या सल्यानुसार १९७८मध्ये परभणी येथे मुंदडा यांनी व्यंकटेश सिड्स कॉर्पोरेशन या नावाने बीजोत्पादनास सुरुवात केली. तसेच व्यंकटेश सिड्स या ब्रँडखालील बीजोत्पादने विदर्भ व गुजरात येथे विकण्याला प्रारंभ केला. नंतरच्या काळात बारवाले यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र सीड्स ग्रोअर्स असोसिएशनचे प्रथम सभासद होण्याचा मानही मुंदडा यांना प्राप्त झाला.

- मिलिंद कृष्णाजी देवल

मुंदडा, बंकटलाल सीताराम