Skip to main content
x

मुसळगावकर,गजाननशास्त्री सदाशिवशास्त्री

        हामहोपाध्याय डॉ. गजाननशास्त्री सदाशिवशास्त्री मुसळगावकर हे भारतातील विख्यात संस्कृत पंडितांमधील एक होत. त्यांचे पिता म.म.पं. सदाशिवशास्त्री मुसळगावकर हे ग्वालियर राजदरबारात प्रधान पंडित होते. त्यांनी आजीवन संस्कृतची सेवा केली. त्यांची शिष्यसंख्या विपुल होती. त्यामध्ये भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, लालबहादूर शास्त्री, अमरनाथ झा, श्यामा नेहरू इत्यादी होते. पंडित गजाननशास्त्री यांचे एक काका ज्योतिर्विन्मणि पं. पुरुषोत्तमशास्त्री हे ग्वालियर दरबारातील राजज्योतिषी होते. त्यांचे दुसरे काका पं. वेदमूर्ती गंगाधरशास्त्री हे वैदिक घनपाठी होते. मुसलगावकर यांचे शुक्ल यजुर्वेद माध्यंदिनीय शाखा (संहिता व पद), कर्मकांड, तंत्रशास्त्र, न्यायशास्त्र, धर्मशास्त्र, भारतीय राजनीतिशास्त्र, न्याय-वैशेषिक, मीमांसा-वेदान्त, सांख्य-योग तसेच वेदभाष्ये इत्यादींचे शिक्षण अनुवांशिक पद्धतीने झाले. त्यांनी विद्यालयातही शिक्षण घेऊन मीमांसाचार्य, वेदान्ताचार्य, साहित्याचार्य, साहित्यरत्न, एम.ए., पीएच.डी. आदी पदव्या संपादन केल्या. गजानन मुसळगावकरांनी ३६व्या वर्षापर्यंत वेगवेगळ्या संस्थांमध्ये अध्यापन केले. त्यांनी प्रवक्ता, रीडर, विभागाध्यक्ष- काशी हिंदू विश्वविद्यालय, वाराणसी; यु.जी.सी. व्हिजिटिंग प्रोफेसर- एम.एस. युनिव्हर्सिटी, बडोदा, गुजरात; शास्त्र चूडामणी प्रोफेसर गंगानाथ झा रिसर्च इन्स्टिट्यूट, इलाहाबाद अशा विविध संस्थांमध्ये विविध पदांवर काम केले. १९७७ साली पंडित गजाननशास्त्री काशी हिंदू विद्यापीठातून बाहेर पडल्यावर त्यांनी निरंतर विविध शास्त्रांचे नि:शुल्क विद्यादान करून संस्कृत वाङ्मयाच्या सेवेत ते मग्न होते. पंडित गजाननशास्त्री शास्त्रमर्मज्ञ तर होतेच परंतु ते वैदिक पंडितही होते. आपल्या देशावरील भक्तीमुळे त्यांनी महर्षी महेशयोगींद्वारे वॉशिंग्टन विद्यापीठात सन्माननीय वेतनासहित भारतीय दर्शन शिकविण्यासाठी केलेला आग्रह त्यांनी नम्रतापूर्वक नाकारला. पंडित गजाननशास्त्रींची मातृभाषा मराठी असूनही संस्कृतच्या प्रसाराबरोबर हिंदीचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी संस्कृतमधील शास्त्रीय ग्रंथ राष्ट्रभाषा हिंदीमधून लिहिले.

      पंडित गजाननशास्त्रींनी लिहिलेले ‘मीमांसा दर्शन का विवेचनात्मक इतिहास’, ‘वैदिक साहित्य का इतिहास’, ‘मीमांसापदार्थ संग्रह’ (संस्कृतमध्ये प्रस्तावित) इत्यादी प्रमुख ग्रंथ आहेत. तसेच त्यांचे पूर्वमीमांसा-मीमांसा परिभाषा व्याख्या, शाबर भाष्य, शास्त्रदीपिका (तर्कपाद); वेदान्त : उपदेशसाहस्री, तत्त्वानुसंधान, वेदान्त परिभाषा, वेदान्तसार, तत्त्वदीपिका की भूमिका; सांख्य : सांख्यतत्त्वकौमुदी, सांख्य प्रवचन भाष्य; न्याय : सिद्धान्तमुक्तावली, तर्कभाषा; साहित्य : काव्यप्रकाश; वेद : वेदार्थपारिजात, शुक्लयजुर्वेद भाष्य की हिंदी व्याख्या; पुराण : चंद्रलाम्बामाहात्म्य (११ हजार श्लोकांची व्याख्या व संपादन) नीतिशास्त्र : मित्रलाभ, सुहृद्भेद, संस्कृत कुसुमावली; शैवागम : अनुभव सूत्र हे व्याख्याग्रंथ प्रसिद्ध आहेत.‘संस्कृत वाङ्मय का बृहद् इतिहास’ (उ.प्र. संस्कृत अकादमी, लखनऊ, दर्शन खंड) आणि ‘चित्सुखी की बृहद् भूमिका’ या ग्रंथांचे त्यांनी संपादन केले आहे.  त्यांना राष्ट्रपती पुरस्कार- सर्टिफिकेट ऑफ ऑनर-१९९०; विश्वभारती पुरस्कार- उत्तर प्रदेश संस्कृत संस्थानद्वारे- संस्कृत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार- १९९९; आद्यशंकराचार्य- सांस्कृतिक पुरस्कार (करवीर पीठ-कोल्हापूर); महर्षी वेदव्यास पुरस्कार- महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान अलंकारणी आदी पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांना वैदिक तिलक (विश्वसंस्कृत मंडळ, ग्वालियर), १९७८; मीमांसा भूषण (सामवेद विद्यालय, वाराणसी), १९८९ या उपाधींनीही सन्मानित करण्यात आले आहे.

राजेश्‍वरशास्त्री मुसळगावकर

मुसळगावकर,गजाननशास्त्री सदाशिवशास्त्री