मून, वसंत वामनराव
संपादन-संशोधनाला वाहून घेणारा सक्रिय कार्यकर्ता अशी वसंत मून यांची ओळख आहे. त्यांचा जन्म नागपूर येथे झाला. घरातील शैक्षणिक, संस्कारक्षम वातावरणात बालपण गेले. वाचनात गोडी निर्माण झाली. अभ्यासू वृत्ती मूळ होतीच. नागपूर येथेच शिक्षण झाले. एम.ए. झाल्यानंतर १९५५मध्ये शासकीय सेवेत प्रवेश केला. १९५६साली नागपूरला नायब तहसीलदार म्हणून काम केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा व बुद्ध धर्माचा अभ्यास व व्यासंग असल्याने त्यांच्या लेखनाचे व भाषणाचे खंड वसंत मून यांनी मोठ्या परिश्रमाने तयार केले. नायब तहसीलदार असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षाप्रसंगी एक शासकीय अधिकारी या नात्याने ते उपस्थित होते. नागपूर येथे त्यांच्या प्रयत्नातून ‘डॉ. आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट’ ही संस्था त्यांनी स्थापन केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्याच्या संपादन-संशोधन कार्याला वाहून घेणारा सक्रिय कार्यकर्ता अशी त्यांची ओळख सर्वश्रुत आहे.
वसंत मून यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख करून देणारे अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले ‘डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व’ (१९८६), ‘आंबेडकर आणि धम्मक्रांती’ (१९८६), ‘जातिसंस्थेचे उच्चाटन’ (१९८६), ‘मध्यप्रांत वर्हाडातील आंबेडकरपूर्व दलित चळवळ’ (१९८९), बुद्धधम्मातील अनात्मवाद’ (१९८५) इत्यादी याशिवाय महाराष्ट्र शासनातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयीचे, त्यांच्या भाषणाविषयीचे संकलन लेखन असे एकूण अठरा खंड प्रकाशित झाले त्यात वसंत मून यांचा सिंहाचा वाटा आहे. वसंत मून यांनी लिहिलेल्या लहान-मोठ्या लेख व पुस्तिकाही प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘वस्ती’ हे त्यांचे आत्मकथनही पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले आहे.