Skip to main content
x

नाईक, अनिल नरहरी

              लरंगातील व्यक्तिचित्रणा-साठी प्रसिद्ध असलेले चित्रकार अनिल नरहरी नाईक हे त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत चित्रकलेच्या विविध अंगांना समर्थपणे हाताळताना दिसतात. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत असताना रेषेवर प्रभुत्व असलेला आणि जलरंगलेपनाने, छाया-प्रकाशाचा खेळ दाखवीत,  हुबेहूब व्यक्तिचित्रण करणारा विद्यार्थी अशी त्यांची ख्याती होती. 

              नाईक यांचा जन्म अलिबाग येथे झाला. चित्रकलेचा वारसा त्यांना आजोबा व वडील यांच्याकडून मिळाला. त्यांचे आजोबा हे माळी मास्तर, रावसाहेब धुरंधर यांचे समकालीन होते. पुढे त्यांची मुले व नातवंडांनी हा वारसा जोपासला. नाईक यांचे शालेय शिक्षण चेंबूर येथे झाले. त्यांच्या आई शीला यांना कलेची चांगली जाण होती.

              त्यांचे वडील नरहरी गोविंद नाईक यांनी व्ही. शांताराम व प्र.के.अत्रे यांच्याबरोबर व स्वतंत्रपणे कलादिग्दर्शनाचे काम केले. अनिल नाईकांचे शालेय शिक्षण चालू असताना व्यावसायिक चित्रकार असलेल्या वडिलांची छोटी कामे ते मन लावून करीत असत.  त्यांंच्या वडिलांनी कलादिग्दर्शनासोबतच व्यक्तिचित्रण व निसर्गचित्रणाचीही कामे केली. ते अनिलकडून छोटीछोटी चित्रे काढून घेत, चुका समजावत, स्वतः नीट काढून दाखवत. मोठमोठाली व्यावसायिक कामे करताना नाईक यांना या अभ्यासाचा उपयोग झाला.

              पुढे १९८१ मध्ये जी.डी. आर्ट हा पदविका अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत, प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यावर नाईक यांना सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधील फेलोशिप मिळाली. त्यांनी १९८४ साली कलाशिक्षण पदविका (डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन) मिळवली. त्यांचे व्यक्तिचित्रण १९८१ नंतर अधिकच संपन्न होत गेले. महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनात पारितोषिक (१९८१), आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ‘हळदणकर’ पारितोषिक (१९८२), बॉम्बे आर्ट सोसायटीच्या अखिल भारतीय व्यक्तिचित्रण स्पर्धेत प्रथम पारितोषिक (१९८४) अशी त्यांनी अनेक पारितोषिके मिळवली. कोरियन त्रिनालेचे ते १९९१ मध्ये निमंत्रित कलाकार होते. त्यांना १९९१ च्या बॉम्बे आर्ट सोसायटीच्या शतकीय महोत्सवात व्यक्तिचित्रणाचे प्रथम पारितोषिक मिळाले. कला आणि कलाशिक्षण या दोन क्षेत्रांतील योगदानाबद्दल सन २००० मध्ये त्यांना कोल्हापूर येथे ‘चंद्रकांत मांढरे’ पारितोषिक मिळाले. अनिल नाईक यांचा १९९५ मध्ये जयश्री दिनकर राउळ हिच्याशी विवाह झाला.

              उत्कृष्ट आरेखन व विविध माध्यमे आणि तंत्रांवर प्रभुत्व असलेल्या अनिल नाईक यांचा प्रवास नंतर मूर्ताकडून अमूर्ताकडे सुरू झालेला दिसतो. त्यांनी १९८३ पासून अनेक एकल प्रदर्शने, तसेच वेगवेगळ्या समूह प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांच्या प्रदीर्घ चित्रप्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या शैलीत होत गेलेला उल्लेखनीय बदल होय. केवळ वास्तवदर्शी शैलीत अडकून न पडता वेगवेगळ्या माध्यमांद्वारे ते चिंतनशील चित्रनिर्मिती करीत आहेत.

              त्यांचे ‘शक्ती’ हे २००१ मधील एकल प्रदर्शन म्हणजे स्त्री-शक्तीचा अंतःप्रेरणेवर झालेला आत्मिक परिणाम होय. भोवताली असलेल्या कर्तबगार महिलांचा, त्यांच्या आंतरिक शक्तीचा घेतलेला शोध त्यांच्या चित्रांमध्ये दृश्यरूपाने उलगडतो.

              त्यांना भावणाऱ्या व्यक्तींचा मूर्त-अमूर्त रूपात घेतलेला शोध त्यांनी २००३ मधील ‘अॅपिअर/ रिअॅपिअर’ या प्रदर्शनात दृश्यरूपात मांडला. पुढे २००८ मध्ये म्यूझियम आर्ट गॅलरी, मुंबई येथे, बॉम्बे आर्ट सोसायटी, केकू गांधी आणि निताई गौराज आर्ट गॅलरी यांच्यातर्फे रेट्रोस्पेक्टिव्ह शो करण्यात आला. त्यात अनिल नाईक यांचा मूर्ताकडून अमूर्ताकडे झालेला प्रवास, व्यक्ति चित्रणातील वेगळ्या वाटा,  मानवी देहाचे ओघवत्या रंगातील अंतर्बाह्य चित्रण ही वैशिष्ट्ये जाणवली.

              त्यांनी २००९ मधील प्रकाशित झालेल्या ‘निवडक चिन्ह’ च्या रेखाचित्रांचे काम केले. ‘व्यक्तीची ठळक वैशिष्ट्ये अधोरेखित करण्यासाठी रेषा व छटा यांचा सुसंवाद साधणारे अवकाशातील प्रकटीकरण’ असे या व्यक्तिचित्रांचे स्वरूप आहे. व्यक्तिचित्रण आणि इलस्ट्रेशन यांचा योग्य मेळ त्यांत दिसतो.

              फेब्रुवारी २०११ च्या जहांगीरमधील एकल प्रदर्शनात कोरलाई येथील रेवदंड्याजवळील एका प्राचीन गावाची चित्रभाषा व्यक्ती, वास्तू आणि वस्तू या संदर्भांत त्यांनी मांडली होती. 

              अनिल नाईक हे गेली पंधरा वर्षे बॉम्बे आर्ट सोसायटीच्या समितीवर, तर गेल्या दहा वर्षांपासून जहांगीर आर्ट गॅलरीच्या व्यवस्थापकीय समितीवर कार्यरत आहेत. १९८४ पासून ते सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये अध्यापक म्हणून कार्यरत आहेत

              त्यांनी अनेक शासकीय व खाजगी संस्थांसाठी व्यावसायिक व्यक्तिचित्रे रंगविली असून त्यांनी रंगविलेली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील दोन प्रसंगचित्रे महाड येथील चवदार तळ्याच्या स्मारकात लावली आहेत. याशिवाय त्यांची गोंदवलेकर महाराजांच्या जीवनावरील प्रसंगचित्रे गोंदवले येथील संग्रहालयात आहेत. सुलतान काबूस यांच्या जीवनावरचे त्यांनी काढलेले भव्य भित्तिचित्र मस्कत येथे आहे. त्यांची सागरी जीवनावरील आधारित चित्रे अमेरिकेत शिपिंग कार्पोरेशनच्या संग्रहात आहेत. स्वतःचा शोध घेताना त्यांनी मूर्त, अमूर्त शैलीत केलेले काम पाहायला मिळते. उमेदीच्या काळात व्यक्तिचित्रणासाठी त्यांना अनेक सन्मान मिळाले. पण त्यांत अडकून न पडता, त्यापुढचा प्रवास त्यांनी अधिक समृद्ध केला.

- मीरा दातार

नाईक, अनिल नरहरी