Skip to main content
x

नाईक, माणिक मनोहर

माणिकप्रभू

     संत माणिकप्रभू यांना भाविक भगवान दत्तात्रेयाचा चौथा अवतार मानतात. सर्व धर्मांतील उत्तमोत्तम तत्त्वांचा समन्वय करीत माणिकप्रभू यांनी ‘सकलमत संप्रदाय’ स्थापन केला. या संप्रदायाचे उपास्य दैवत म्हणजे प्रत्येक प्राणिमात्राच्या अंत:करणातील चैतन्य. मधुमती नामक शक्तिदेवतेसह भगवान दत्तप्रभूंची मूर्ती या संप्रदायात पूजनीय मानली जाते; पण आग्रह कोणताच नाही. कोणत्याही विशिष्ट देव-देवतेचा मंत्र संप्रदायात आग्रहाने दिला जात नाही. ‘अद्वैती विचारधारा’ हेच या सकलमत संप्रदायाचे अधिष्ठान मानले जाते.
     माणिकप्रभू यांचा जन्म सध्याच्या कर्नाटक राज्यातील ऐतिहासिक बसवकल्याण जवळील ‘लाडवंती’ येथे मंगळवारी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मनोहर नाईक-हरकुडे होते, तर आईचे नाव बयाम्मा होते. पूर्वी हे नाईक घराणे ‘हरकुडे’ येथे खूप काळ वास्तव्य करून होते, त्यामुळे त्यांच्या नाईक आडनावापुढे हरकुडे हे उपनाव जोडले गेले. देशस्थ ऋग्वेदी वत्स गोत्री असलेले हरकुडे घराणे हे पिढ्यान्पिढ्या एक धर्मपरायण घराणे म्हणूनच ओळखले जात होते. केशव नाईक हे या घराण्याचे ज्ञात मूळपुरुष. ते बिदर जवळच्या ‘झरणी नृसिंह’चेे परमभक्त होते. तसेच, या घराण्यात प्रभू रामचंद्र व हनुमंताची उपासनाही परंपरेने चालत आलेली होती. हाच वारसा माणिकप्रभूंना लाभलेला होता. माणिक हे मनोहर नाईक यांचे द्वितीय सुपुत्र. वडील मनोहरपंत यांचे अकाली निधन झाले व आई बयाम्मांनी कल्याणमध्ये राहून तिन्ही मुलांचे मोठ्या कष्टाने संगोपन केले. अशा प्रकारे छोट्या माणिकप्रभूंना वडिलांचे छत्र फार काळ लाभले नाही. आई व मामा हेच त्यांचे पालक बनले.
     माणिकप्रभूंच्या नशिबी शालेय शिक्षण नव्हते. मामा भालचंद्र दीक्षित यांनी त्याला आपल्या हळ्ळीखेडी गावी शिक्षणास नेले. पण छोटा माणिक तेथे रमला नाही. तो कल्याणला परत आला; पण मामाच्या भीतीने घरी गेला नाही. लौकिक शिक्षण काही झाले नाही तरी त्याच्या सर्व लीला त्याच्या ठायी असलेल्या अवतारी शक्ती दर्शविणाऱ्या होत्या.
     लोकांना चमत्कार वाटाव्यात अशा अनेक गोष्टी माणिक सहजी करीत असे. त्यामुळे प्रथमपासूनच सर्व लोक त्याला मान देत होते. कानडी, मराठी या दोन मातृभाषांशिवाय संस्कृत, उर्दू, फारशी या भाषांवर माणिकचे विलक्षण प्रभुत्व होते. त्यांना ईश्वरदत्त दैवी शक्ती लाभली होती, तसेच कवित्वही लाभले होते. ते मराठीत, कानडीमध्ये उत्तमोत्तम पदे रचत असत आणि उत्तम प्रकारे गात असत. त्यांना उपजत गायनकलाही प्राप्त होती. श्रीमंत-गरीब, हिंदू-मुसलमान असा कोणताही भेदभाव माणिकप्रभूंना मान्य नव्हता. त्यामुळे सर्व धर्म-पंथांचे लोक त्यांच्या दैवी शक्तीने त्यांच्याकडे आकर्षित झालेले होते.
    १९४५ साली ते कर्नाटकातील ‘हुमणाबाद’ येथे येऊन स्थायिक झाले. त्यालाच पुढे माणिकप्रभूंमुळे ‘माणिकनगर’ असे नाव देण्यात आले. सिद्ध राजयोगी, प्रासादिक कवी म्हणून त्यांच्याकडे हजारो लोक श्रद्धेने येऊन त्यांचे अनुयायी झाले. मराठीप्रमाणे हिंदीतही त्यांची दत्त व श्रीकृष्णपर अनेक पदे प्रसिद्ध आहेत. त्यांना संगीताची उत्तम जाण व आवड होती. त्यामुळे त्यांच्या दरबारात गायनाच्या मैफली सतत होत असत. लिंगायत जंगमाचा संक्रांत उत्सव, मुसलमानांचा मोहरम आणि हिंदूंची दत्तजयंती हे तीन उत्सव त्यांच्या दरबारात थाटामाटाने व धार्मिक पद्धतीने साजरे होत. सकलमत संप्रदाय हा त्यांचा विचार नव्हे, तर प्रत्यक्ष व्यवहार होता. त्यामुळे धर्मपंथांचा भेदाभेद न करता सर्व धर्मांचे भाविक माणिकप्रभूंच्या दरबारात मुक्तपणे येत होते.

         श्रुतिधर्म रक्षुनी सकलमताने वंदा ।

         सर्वांतरी आत्मा नको कुणाची निंदा ॥

     ही त्यांच्या सकलमत संप्रदायाची मुख्य शिकवण होती. सर्व धर्मांचे मूलतत्त्व एकच आहे. देशकालपरिस्थितीनुरूप जो भेद दिसतो, तो जाणून दूर करा व ईश्वर एक आहे हे तत्त्व अनुभवा, आचरणात आणा. माणिकप्रभूंची कीर्ती ऐकून हैद्राबादचे निजाम ‘नासिरुद्दौला’ याने साठ हजाराची जहागिरीची सनद देऊन खास माणूस पाठविला तेव्हा, ‘‘आम्ही फकीर, आम्हांस या जहागिरीचा उपयोग काय?’’ असे म्हणत माणिकप्रभूंनी ती सनद परत पाठविली. तरीपण माणिकप्रभूंचे वैभव राजयोग्याचे वैभव होते. स्वत: माणिकप्रभू एखाद्या महाराजासारखे ऐश्वर्यात राहत होते. उंची वस्त्रे, दागिने घालत, पण त्यांचे मन पूर्ण विरक्त होते.
      आपली निर्वाण तिथी त्यांनी सहा महिने आधीच सर्वांना सांगून ठेवली होती. त्यानुसार त्यांनी विधिपूर्वक संन्यास घेतला आणि मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला (इ.स.१८६५) त्यांनी समाधी घेतली. पण त्यांच्या आदेशानुसार एकादशी ते पौर्णिमा ही वार्ता कोणा भक्तास कळू न देता पौर्णिमेला दत्तजयंती उत्सव पार पडल्यावर माणिकप्रभूंच्या समाधीचे वृत्त सर्वांना सांगण्यात आले. केवळ ४८ वर्षांच्या आयुष्यात माणिकप्रभूंनी महान कार्य केले. त्यांचे संस्थान, त्यांचे सकलमत संप्रदायाचे कार्य पुढे चालवीत आहे.

 

विद्याधर ताठे

नाईक, माणिक मनोहर