Skip to main content
x

नाईक, मनोहर श्रीधर

               नोहर श्रीधर नाईक यांचा जन्म धुळे येथे झाला. त्यांचे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील खानोली हे आहे. त्यांचे सर्व शिक्षण पुण्यात झाले. ते १९४१ मध्ये पुणे येथील भावे विद्यालयातून प्रथम वर्गात मॅट्रिक झाले. त्यांनी १९४५मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातून  रसायनशास्त्रातील  बी.एस्सी. (कृषी) पदवी मिळवली. त्यांनी पुण्याच्या कृषी महाविद्यालयात कृषि-रसायनशास्त्र विभागात १९४६मध्ये संशोधन साहाय्यक म्हणून कामास सुरुवात केली. कृषी विभागाच्या नोकरीत असतानाच त्यांनी जीव-रसायनशास्त्रात या विषयात संशोधन करून एम.एस्सी. (१९५४) व पीएच.डी. (१९५८) या पदव्या प्राप्त केल्या. एम.एस्सी.साठी त्यांचा संशोधनाचा विषय ‘पाकक्रियांचा कडधान्यांच्या पोषणमूल्यांवर परिणाम’ असा होता, तर पीएच.डी.साठी ‘जीवनसत्त्व ‘ब’-२ रिबोफ्लेविनचे जीवरासायनिक संश्‍लेषण’ असा होता. दिल्ली येथील भा.कृ.सं.सं.त त्यांची १९५९ मध्ये संशोधक व व्याख्याता म्हणून निवड झाली. नंतर त्यांनी साहाय्यक प्राध्यापक व प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी जीव-रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख या नात्याने १९७२मध्ये कार्यभार स्वीकारला. या कार्यकाळात ‘गहू व भाताच्या नवीन जातींची जीव-रासायनिक वैशिष्ट्ये व नायट्रेट अन्नघटकांचे सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने करण्याची विकारांची कार्यक्षमता’ या विषयावरील त्यांचे संशोधन सर्वत्र गाजले. ते १९६४ मध्ये अ‍ॅडलेड (ऑस्ट्रेलिया) येथे पदव्युत्तर संशोधनासाठी गेले. प्रसिद्ध जीव-रसायनशास्त्रज्ञ डॉ.जे.डी. निकोलस यांच्याबरोबर त्यांनी ‘अझोटोबॅक्टर’ ही सूक्ष्म वनस्पती वातावरणातील नत्र स्थिरीकरणासाठी रिडक्टेज या विकराचा कसा वापर करते, यावरही संशोधन केले. त्यानंतर पुढील दोन दशके या दोन शास्त्रज्ञांचे सहयोगी संशोधन चालू राहिले व जगप्रसिद्ध ‘नेचर’ व ‘जर्नल ऑफ प्लँट फिजिऑलॉजी’ या नियतकालिकांतून त्यांचे संशोधन प्रसिद्ध झाले. त्यांचे १००पेक्षा अधिक संशोधनपर लेख आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना १९७८मध्ये भारत सरकारतर्फे संशोधन कार्याबद्दल रफी अहमद किडवाई पारितोषिक मिळाले. त्यांनी १९८४-८६ दरम्यान फिलिपिन्समधील आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत संशोधन केले. त्या वेळी डॉ. स्वामिनाथन त्या संस्थेचे संचालक होते.

                विसाव्या शतकाच्या सहाव्या व सातव्या दशकांत भारतात हरितक्रांती झाली व अन्नधान्य उत्पादनात विक्रमी वाढीची आशा पल्लवित झाली. मेक्सिकोमधून गव्हाच्या बुटक्या व अधिक उत्पादन देणाऱ्या जाती आल्या व त्यापासून भारतीय जातींचा विकास सुरू झाला. अधिक उत्पन्न देण्यामागे त्यांच्या अंतर्गत पेशीतून चालणाऱ्या जीव-रासायनिक प्रक्रिया कोणत्या याचा सखोल अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांत डॉ. मनोहर नाईक यांचे नाव शिरोभागी शोभेल. डॉ.स्वामिनाथन यांचे विश्‍वासू जीव-रसायनशास्त्रज्ञ मदतनीस म्हणून भारताच्या हरितक्रांतीमध्ये महत्त्वाचे  योगदान आहे. त्यांनी दिल्लीतील २५ वर्षांच्या वास्तव्यात एम.एस्सी. व पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांसाठी जीव-रसायनशास्त्राचे अध्यापन व संशोधनासाठी मार्गदर्शन केले. दरवर्षी महाराष्ट्रातून भा.कृ.सं.सं.त अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जात असत व त्यांना डॉ.नाईक यांचा मोठा आधार मिळत असे. ते १९८४ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी राहुरीच्या म.फु.कृ.वि.त जीव-रसायनशास्त्र विभाग सुरू करण्यासाठी विद्यापीठाला मार्गदर्शन व मदत केली. ते स्वतः ६ वर्षे म.फु.कृ.वि.त येऊन संशोधकांना मार्गदर्शन करत असत. दिल्लीतील भारत सरकारचे ‘शास्त्र व तंत्रज्ञान खाते’ व अन्य केंद्रीय संस्थांकडून त्यांनी अनेक संशोधन प्रकल्प मंजूर करून आणले आणि विद्यापीठाच्या जीव-रसायनशास्त्र विभागाला आर्थिक व गुणवत्तेचे स्थैर्य मिळवून दिले. संशोधन हा त्यांच्या जीवनाचा ध्यास होता व शेवटपर्यंत त्यांनी शास्त्रीय वाचन चालू ठेवले होते.

                - डॉ. श्रीपाद यशवंत दफ्तरदार

 

 

नाईक, मनोहर श्रीधर