Skip to main content
x

नामले शेष

    १९४० मध्ये डॉ. माँटेसोरी भारतात येऊन राहिल्या होत्या. त्यांनी चेन्नई जवळील अड्यार येथे घेतलेल्या प्रशिक्षण वर्गात शेष नामले यांनी तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. त्यापूर्वी विलेपार्ले, मुंबई येथे ते स्वतंत्र बालमंदिर संस्था चालवित होते. तेथेच बालशिक्षणाची साधने निर्माण करण्याचे काम त्यांनी आपल्या काही मित्रांच्या सहाय्याने सुरू केले होते. नामले यानी भावनगरला दक्षिणामूर्ती संस्थेत राहून गिजुभाईंकडून बालशिक्षणाचे तंत्र प्राप्त केले होते. दादर भगिनी समाजाच्या वतीने ताराबाई मोडक यांनी दादरच्या हिंदू कॉलनीत १ जुलै १९३६ रोजी शिशुविहारची स्थापना केली. १ जुलै १९३८ पासून तेथे रीतसर अध्यापन मंदिराची सुरवात झाली. पुढच्याच वर्षी नामले शिशुविहारमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. अध्यापनाचे काही कार्य करून ते लिपीकाचे कामही करीत असत म्हणून त्यांना अधीक्षकाचा हुद्दा मिळाला होता. काही महिन्यानंतर दुसरी चांगल्या पगाराची नोकरी मिळाली म्हणून त्यांनी संस्था सोडली. १९४७ मध्ये ते पुन्हा शिशुविहारमध्ये आले व काही वर्षांनी मुख्याध्यापक झाले. १९६५ मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर नामले यांनी तेथेच १९७५ पर्यंत अध्यापन केले. त्याचवेळी नूतन बालशिक्षण संघाची मुख्य चिटणीसपदाची जबाबदारी त्यांनी १९५३ ते १९७३ पर्यंत समर्थपणे पार पाडली. संघाचा विस्तार अनेक अंगांनी त्यांनी केला. संघांच्या कार्याची व्याप्ती फार मोठी होती. नामले यांनी ताराबाईंच्या शिक्षणपत्रिकेच्या संपादनाचे कामही सुमारे २० वर्षे केले. या पत्रिकेचा दर्जा प्राप्त करून देण्यात व तिची उपयुक्तता टिकविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. शिक्षण पत्रिकेत नामले यांनी सातत्याने लेखन केले. बालकेंद्री शिक्षण, बालशिक्षणाचा भारतीय इतिहास, बालशाळांतील साधने, बालशिक्षण क्षेत्रातील विचारवंत अशा विषयांवर त्यांचे लेख प्रसिद्ध झाले. राज्य पाठ्य पुस्तक समितीचे ते सदस्य होते. नामले प्रयोगशील व उत्साही शिक्षक होते.

- वि. ग. जोशी

नामले शेष